Bridge Collapse sakal
editorial-articles

अग्रलेख : कोण भरडले कुणासाठी?

युद्धात पहिला बळी जातो, तो सत्याचा, असे म्हटले जाते. रशिया-युक्रेन युद्धात त्याचा प्रत्यय वारंवार येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

युद्धाच्या झळा केवळ आशिया-आफ्रिकाच नव्हे, तर युरोपलाही बसू लागलेल्या असूनही युद्धाची धग विझू न देता भडकवत का ठेवली जात आहे? बड्यांच्या हितसंबंधांपुढे मानवतेच्या हितावरच घाला घातला जात आहे.

युद्धात पहिला बळी जातो, तो सत्याचा, असे म्हटले जाते. रशिया-युक्रेन युद्धात त्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. खरे तर, अगदी युद्ध जरी म्हटले तरी त्याला काही संकेत-नियमांची चौकट असते. कुठल्याच बाजूकडच्या सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले जाऊ नये, हा तर अगदी मूलभूत संकेत. पण अनेक मार्गांनी या लोकांनाच वेठीला धरले जात आहे.

सगळेच धाब्यावर बसवायचे म्हटल्यावर विधिनिषेध उरत नाही. परवाच एका ड्रोन हल्ल्यात रशियाला क्रिमियाशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलाची जबर हानी झाली. या हल्ल्यात दोन व्यक्ती मृत्युमुखी पडल्या, तर एक लहान मुलगी जखमी झाली. रशियाचा पूल उडवण्यासाठी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी युक्रेनने स्वीकारलेली नाही. त्यामुळे पुतीन यांनी हा ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचे म्हटले आहे.

या घटनेनंतर लगेचच पुतीन यांनी काळ्या समुद्रातून होणाऱ्या युक्रेनच्या अन्नधान्य वाहतुकीला अटकाव केला. त्यांनी यासंबंधीचा करार स्थगित करीत असल्याचे जाहीर करून टाकले. जसजसे हे युद्ध पसरत-चिघळत चालले आहे, तसतसे त्याचे अनिष्ट परिणाम तीव्रतेने जाणवत आहेत. ते केवळ लढाईत भाग घेतलेल्या देशांपुरते मर्यादित नाहीत.

अन्नधान्याच्या पुरवठ्याला आधीच फटका बसला आहे. पुरवठा साखळ्या विस्कळित झाल्या आहेत. आफ्रिकेतील अनेक गरीब देशांत सध्याच उपासमारीची स्थिती ओढवली आहे. पुतीन यांच्या या निर्णयामुळे त्यांची दुरवस्था आणखी गंभीर रूप धारण करेल. पुतीन यांच्या निर्णयावर संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि निषेध नोंदवला आहे आणि तो रास्तही आहे.

पण या घटनेनंतर अनेक बड्या देशाच्या नेत्यांनी गरीब देशांच्या नावाने गळे काढण्यास सुरवात केली आहे. त्यांची वक्तव्ये ऐकून-वाचून गरीब देशांमधील पोटे खपाटीला गेलेल्या नागरिकांची केवढी त्यांना काळजी असे कुणाला वाटेल. पण हा कळवळा खरा आहे का, हाच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

युक्रेनमध्ये गव्हाचे प्रचंड उत्पादन होते. जगाचे गव्हाचे कोठार, असेही युक्रेनला म्हटले जाते. तेथून आफ्रिका-आशियाई देशांना तो पाठवला जातो. युद्ध भडकल्यानंतर त्या पुरवठ्याला अडथळा आल्याने मोठाच प्रश्न उभा राहणार होता. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रे आणि तुर्कीये यांच्या पुढाकाराने एक समझोता करण्यात आला आणि काळ्या समुद्रातून होणाऱ्या धान्य पुरवठ्याला आडकाठी न करण्याचे रशियाने मान्य केले.

वर्षभरात या करारामुळे तीन कोटी टनांहून अधिक धान्याची युक्रेनमधून आफ्रिकी-आशियाई देशात निर्यात झाली. रशियावरील हल्ल्याच्या ताज्या घटनेनंतर पुतीन यांनी करारस्थगितीचा निर्णय घेतला. त्यामुळे आता धान्याच्या किंमती आणखी वाढतील.

गेल्या काही दशकातील सर्वांत भयंकर अशा दुष्काळाचा सामना करीत असलेल्या सोमालिया, इथियोपिया आणि केनया या देशांना या घडामोडीचा जास्त फटका बसणार आहे. आता या घटनेचा निषेध करून फक्त पुतीन यांना खलनायक ठरवणे हे पाश्चात्त्य देशांच्या सोईचे असले तरी परिस्थितीला ते एकटेच जबाबदार आहेत, असे म्हणता येईल का, याचाही विचार करायला हवा.

याचे कारण केवळ आशिया-आफ्रिकाच नव्हे तर युरोपलाही युद्धाच्या झळा बसू लागलेल्या असूनही युद्धाची धग विझू न देता भडकवत ठेवली का जात आहे? अमेरिकेकडून युक्रेनला शस्त्रपुरवठा आणि आर्थिक मदत सातत्याने सुरू आहे. सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांची विक्री चालू ठेवण्यात अमेरिकी हितसंबंध गुंतलेले आहेत.

युद्ध थांबविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा राजनैतिक पुढाकार घेण्याच्या मनःस्थितीत अमेरिका दिसत नाही. जगाचे पुढारपण करतो म्हणणाऱ्या महासत्तेला जर खरोखरच गरीबांची काळजी असती तर असा पुढाकार त्या देशाने घेतला असता. अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादले असून, त्याला उत्तर देण्यासाठी, त्यांचा परिणाम निष्प्रभ करण्यासाठी रशियाने हे पाऊल उचलले असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

थोडक्यात प्रत्येक जण आपापल्या स्वार्थापुरता विचार करीत आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये रशियातून युरोपला नैसर्गिक वायू पुरवठा करणाऱ्या नॉर्डस्ट्रीम गॅसवाहिन्यांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यामागे कोणाचा हात आहे, याविषयी अद्यापही मतमतांतरे आहेत.

परंतु ही घटना घडण्यापूर्वी जर्मनीला नैसर्गिक वायू पुरविणाऱ्या या वायूवाहिन्यांना आधी डोनाल्ड ट्रम्प आणि नंतर बायडेन यांनी सातत्याने विरोध केला होता. हे सगळे वास्तव लक्षात घेतले तर अशा हल्ल्यांमागे कोण असेल आणि त्याची कारणे काय, याचा कयास बांधता येतो. युरोपचे रशियावरील अवलंबित्व हे अमेरिकेला आर्थिक आणि राजकीय या दोन्ही दृष्टींनी खुपते.

रशियानंतर नैसर्गिक वायूचे निर्यातदारदेश म्हणजे अमेरिका, युक्रेन व ब्रिटन हे आहेत, हे वास्तवही बरेच बोलके आहे. त्यामुळे या संपूर्ण युद्धाच्या दरम्यान ज्या भूमिका जाहीरपणे घेतल्या जात आहेत आणि जे प्रत्यक्ष वर्तन होत आहे, त्यात मोठे अंतर आहे. एकूणच या युद्धात सत्यावर होणारा हल्ला हा चहूबाजूंनी आहे, हे लक्षात घ्यावे लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT