Drone 
editorial-articles

अग्रलेख >> आत्मघातकी हलगर्जी

ई सकाळ टीम

मुंबईत ड्रोनच्या वापरापासून ते विक्रीपर्यंतचे नियम व अटी कठोर असूनही परवानगीपेक्षा अधिक वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला ड्रोन कुठलीही शहानिशा न करता सहजपणे उपलब्ध होतो, हे ‘सकाळ’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाले. नियमपालनाला बगल देण्याची ही वृत्ती कमालीची घातक आहे. (editorial Sakal sting operation Suicidal negligence)

तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून जन्माला आलेली एक सामान्य; पण बहुपयोगी वस्तू, असे ड्रोनचे वर्णन करता येऊ शकते; पण अलिकडच्या काळातील काही घटनांनी, विशेषत: काहीच दिवसांपूर्वी जम्मू येथे झालेल्या हल्ल्यामुळे ही सामान्य वाटणारी तांत्रिक वस्तू दहशतीची टांगती तलवार भासू लागली आहे. सर्वसामान्यपणे ड्रोनचा वापर उंचावरून चित्रीकरण करण्यासाठी केला जातो. अलिकडच्या काळात तर लग्न समारंभांमध्येसुद्धा सर्रासपणे ड्रोन वापरला जात होता. त्यामुळे डोक्यावरून घोंघावणाऱ्या आवाजाचा ड्रोन गेला, की साहजिकच लोकांच्या चेहऱ्यावर हास्याची एक सहज लकेर यायची; मात्र तुमच्या चेहऱ्यावरची हास्यमुद्रा टिपणारी हीच वस्तू आता तुमच्या डोक्यावर बॉम्ब टाकून तुमचा जीवदेखील घेऊ शकते, ही कल्पनाच भीतिदायक आहे. ड्रोनचा वापर व्हायला लागल्यापासूनच संवेदनशील शहरामध्ये त्याच्या वापरावर मर्यादा आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाने मानवविरहीत विमान प्रणाली नियम २०२१ (अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टीम रुल्स २०२१) नुसार ड्रोनच्या वापरासंदर्भात अनेक अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. मात्र नियम असले, तरी भारतात स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार या नियमांमध्ये बदल झालेले जाणवतात. जम्मू-काश्मीरसारखे संवेदनशील प्रदेश किंवा मुंबई, दिल्लीसारख्या देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सतत उच्च दर्जाचे संरक्षण शिष्टाचार असलेल्या शहरांमध्ये ड्रोनच्या वापरासंदर्भातील नियम कठोर आहेत. नियम कठोर असले, तरीदेखील त्यातून पळवाटा काढल्या जातातच. परिणामी संरक्षण सज्जतेच्या आपल्या चौकटी मोडून अचानकपणे आपल्यापुढे एखादे मोठे संकट आदळू शकते. त्यामुळे अशा संभाव्य घटनेचा सामना करण्याची आपली तयारी नीट पारखून घेण्याची गरज आहे.

मुंबईत ड्रोनच्या वापरापासून ते विक्रीपर्यंतचे नियम व अटी कठोर आहेत; तरीही परवानगीपेक्षा अधिक वजन वाहून नेण्याची क्षमता असलेला ड्रोन कुठलीही शहानिशा न करता सहजपणे उपलब्ध होतो. ‘सकाळ’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ते उघड झालेच आहे. यावरूनच आपले नियम आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यातली तफावत सहजपणे अधोरेखित होते. शिवाय अशा प्रकारांमुळे आपल्या सुरक्षा उपाययोजनांचेही धिंडवडे निघतात ते निराळेच. जम्मूमध्ये ड्रोन वापरून केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांसमोर हे एक प्रचंड मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अशा हल्ल्यांमध्ये वापरण्यात येणारे ड्रोन हे मिलिटरी ड्रोन्स म्हणजेच अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असतात; तरीही साधे आणि व्यावसायिक वापराचे ड्रोन यासाठी वापरले जाणार नाहीत, याची खात्री मात्र देता येत नाही. मुंबईसारख्या शहरावर याआधी झालेल्या हल्ल्यांचा आलेख पाहिला तर दहशतवाद्यांनी अगदी कुकर वापरून तयार केलेले बॉम्बदेखील आपल्या हृदयाचा थरकाप उडवणारे ठरले आहेतच. साधे व्यावसायिक वापराचे ड्रोन्स वापरूनदेखील हवाई हल्ल्याचे प्रयत्न करण्यात आल्याच्या नोंदी आहेत. त्यातच या तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरिता फार खर्चही लागत नाही. हल्ला करणाऱ्या व्यक्तीला यात कुठलीही इजा पोहोचत नाही. त्यामुळे यापुढच्या काळात अशा प्रकारच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. गेली दीड-दोन वर्षे कोरोना महासाथीच्या संकटामुळे साहजिकच संरक्षण सज्जतेच्या उपाययोजनांकडे फारसे कुणाचे लक्ष नव्हते. वाढती महागाई आणि बेरोजगारीसारख्या समस्यांमुळे सर्वसामान्य बेजार आहे आणि अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकताना सरकारचे कंबरडे मोडले आहे. देशाची एकंदरीत सर्वच पातळ्यांवर बाजू कमजोर होत असताना अशा स्वरूपाची कुठलीही घटना आपल्या यंत्रणांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी परिणामकारक ठरू शकते. किंबहुना आपल्या अंतर्गत उणिवांचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो.

नागरी उड्डाण संचालनालयाच्या नियमांविषयी बोलायचे झाल्यास ड्रोनचा वापर, त्याची खरेदी-विक्री, आयात-निर्यात, भाडेपट्टी, परिचालनासाठीचा परवाना, वजनाप्रमाणे त्याचे केलेले वर्गीकरण, स्वामित्व यासंदर्भात केलेले नियम पुरेसे नेमके आणि स्पष्ट आहेत; पण अंमलबजावणीच्या पातळीवर मात्र या नियमांचा पुरता बोजवारा उडालेला दिसतो. तंत्रज्ञानाचा वापर हा नेहमीच ते वापरणाऱ्यावर बरा किंवा वाईट ठरतो. गर्दीच्या शहरांमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत तुमच्यापर्यंत औषधे पोचवण्याचे काम ड्रोन करतो. मानवाच्या शरीरावर विपरीत परिणाम करू शकतील, अशा रासायनिक खतांची फवारणी तो करू शकतो. ज्या भागात सहज जाणे शक्य नाही, अशा जंगलांमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी मदत यंत्रणेचा महत्त्वाचा साथीदार बनू शकतो. चुकीच्या हातांमध्ये असलेले हे तंत्रज्ञान कुणाचा जीवही घेऊ शकते. लंडन येथील ‘ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम’ ही संस्था २०१० पासून ड्रोन हल्ल्यांचा अभ्यास करते आहे. त्यांच्या अंदाजानुसार अमेरिकी ड्रोननी आतापर्यंत ७,५८४ ते १०,९१८ जणांना यमसदनी धाडले आहे. विशेष म्हणजे यात येमेन, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील ७५१ ते १,५५५ सर्वसामान्य नागरिकांचादेखील समावेश आहे. त्या तुलनेत अमेरिकेच्या सरकारने जाहीर केलेली आकडेवारी मात्र खूपच कमी आहे. एकीकडे जगातील सर्वात शक्तिमान देश अशा तंत्रज्ञानाचा हवा तसा वापर करत असताना आपण निदान सुरक्षेच्या दृष्टीने तरी तातडीने उपाययोजनांच्या भिंती बांधायला काय हरकत आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT