paris olympic 2024 sakal
editorial-articles

अग्रलेख : प्रेमनगरी पॅरिसचा पैगाम!

सकाळ वृत्तसेवा

‘जुने जाऊ द्या मरणांलागुनी’ हाच तर प्रेमनगरी पॅरिसचा पैगाम आहे.

नवलाख दीपांनिशी तळपणारे, प्यार-मुहब्बत-इश्काची मुक्तपणे उधळण करणारे, कलेचा देदीप्यमान वारसा अभिमानाने जपणारे महानगर पॅरिस सध्या वेगळ्याच अवतारात आधुनिक जगासमोर हसतमुखाने उभे राहिले आहे. निमित्त आहे ऑलिंपिक सोहळ्याचे. शंभर वर्षांपूर्वी याच पॅरिसनगरीत ऑलिम्पिक सोहळा दिमाखात भरला होता, तेव्हा निम्मेअधिक जग पहिल्या महायुद्धातल्या ओल्या जखमांवर मलमपट्टी करत उभे राहात होते.

जर्मनीला सपशेल मज्जाव करण्यात आला होता, आणि इतिहासातील भल्याबुऱ्या गोष्टी विसरुन इंग्लंडचे राजे उद्‌घाटनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यांच्यासमोरुनच नुकत्याच स्वतंत्र झालेल्या आयर्लंडचे पथक ध्वज उंचावत संचलन करत निघून गेले होते. शंभर वर्षांत पॅरिसची यमुनामाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीन नदीतून बरेच पाणी वाहून गेले आहे. दुसरे महायुद्ध होऊन गेले. अनेक सत्तांतरे झाली.

सारे जग नुसते बदलले नाही, तर बरेच पुढे गेले. शंभर वर्षांपूर्वी पहिल्यांदा ४४ देशांनी या महासोहळ्यात सहभाग नोंदवला होता. यंदा दोनशेहून अधिक देश मैदानात उतरले आहेत. १९२४ मधील ऑलिंपिक सोहळ्यासाठी पॅरिसनगरीने नवी संकल्पना आणली- ऑलिंपिक ग्रामची. त्यासाठी नव्याने क्रीडांगणे, इमारती, मैदाने निर्माण केली. ही संकल्पना आता रुढ होऊन गेली आहे.

काही शहरे मानवी इतिहासात फार मोठे योगदान देऊन गेली. रोम, पॅरिस अशी काही मोजकी नावे याबाबत घेता येतील. पॅरिसने पायंडा पाडावा, आणि जगाने तो डोक्यावर घ्यावा, हा एक सांस्कृतिक शिरस्ताच आहे म्हणा. यंदाच्या सोहळ्यात आणखी एक पायंडा पडण्याची शक्यता आहे. यावेळी खेळाडूंचे संचलन पहिल्यांदाच स्टेडियममध्ये न होता, खुल्या आभाळाखाली झाले. तेही थेट सीन नदीच्या पात्रात.

तब्बल शंभरेक बोटींमधून २०६ देशांच्या खेळाडूंची पथके, दुतर्फा बसलेल्या सहा लाख प्रेक्षकांना अभिवादन करत गेली. त्यात भारताचे पथकही दिमाखाने तळपले. यंदा हे पथक पदकांची चांगलीशी माळ घेऊन येईल, अशी अपेक्षा भारतीयांना आहे.

अर्थात पदकांची स्वप्न पाहायला मेहनत लागत नाही, नि पैसाही. चार वर्षांपूर्वी टोकियोत झालेल्या ऑलिंपिक सोहळ्यात भारताने सात पदके जिंकली होती. इतर देश पदकांची डझनांनी लूट करत असताना १४० कोटी लोकसंख्येचा भारत पाच-सात पदकांवर समाधान मानतो, ही बाब अनेकांना सलते. भारतात क्रीडासंस्कृती म्हणावी तशी रुजली नाही, हे त्याचे प्रमुख कारण.

इतर अनेक घटकही या पदक हलाखीला कारणीभूत असतात, आणि त्याची चर्चाही दरवेळी होत असते. मुळात आपले क्रीडाक्षेत्रासाठीचे खिसापाकिट कायम कडके. निधीअभावी खेळाडू तयार होत नाहीत, आणि निधी मिळालाच तर त्याभोवती राजकारणाचे भुंगे घोंघावू लागतात. भ्रष्टाचार हा तर आवडीचा खेळ!

धड ना प्रशिक्षण, ना सुविधा, ना संधी, ना प्रोत्साहन अशा नीरस चिखलात पदकांची कमळे कशी फुलणार? परंतु, यावेळी केंद्र सरकारने जवळपास ४७० कोटी रुपये आपल्या खेळाडूंच्या पूर्वतयारीवर केले आहेत, असे सरकारी आकडेवारी सांगते. बहुतेक खेळाडू गेले काही महिने युरोपाच सराव करत आहेत, आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेत आहेत.

पण पदकांची लयलूट अशी दोन-तीन वर्षांच्या तयारीने होत नसते. संपूर्ण हयात त्यात घालवल्यानंतर थोडेफार सुवर्ण हाताला लागते. तरीही यंदा भालाफेक, नेमबाजी, बॅडमिंटन, टेनिस, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती अशा काही क्रीडाप्रकारात भारताला पदकांची आस आहे. ॲथलेटिक्सचे तर मोठे भारतीय पथक पॅरिसमध्ये पोचले आहे.

स्टीपलचेस शर्यतीत मागल्या खेपेला मऱ्हाटी गडी अविनाश साबळेने चमकदार कामगिरी करुन दाखवली होती. यावेळी त्यात सुधारणा झालेली दिसेल ती पदकाच्या रूपानेच. कुस्तीमध्ये गेली दोन-तीन वर्षे भारतात राजकारणाचीच एवढी कुस्ती बघायला लागली की त्या खेळखंडोब्यात भारतीय कुस्तीगीरांना ऑलिंपिकची तयारी करायला किती वेळ मिळाला असेल, हा प्रश्नच आहे.

गेल्या वेळी सात पदकं आणणारे भारतीय खेळाडू यंदा दोन अंकी यश खेचून आणतील, अशी आशा आहे. भारताचे पथक ११७ जणांचे आहे, त्यांच्यासोबत १४० कर्मचारी आणि अधिकारीवर्गही आहे. या ११७ खेळाडूंमध्ये ॲथलेटिक्सचे २९, नेमबाजीचे २१ आणि हॉकीचे १९ यांचीच संख्या निम्म्याहून अधिक झाली.

ऑलिंपिकसोहळा पॅरिसनगरीत ११ ऑगस्टपर्यंत चालेल. जगात युद्धे चालू आहेत. शीतयुद्धे, छुपी युद्धेही रात्रंदिन लढली जात आहेत. यंदाचे वर्ष अनेक देशांमध्ये निवडणुकांचे असल्याने सत्तांतराच्या उलथापालथींमध्येही जग गढले आहे. तरीही ऑलिंपिकची मशाल दिमाखाने पेटती राहिली आहे, हेही नसे थोडके. चार वर्षांपूर्वी जपानच्या टोकियोत झालेला ऑलिंपिक सोहळा पूर्णत: कोरोनाच्या मृत्यूछायेत पार पडला होता.

खेळाडूंनी आपली प्रतिभा पणाला लावून पदके पटकावली, पण ती रिकाम्या खुर्च्यांसमोर. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि घोषणाही यंत्राद्वारे निर्माण केलेल्या होत्या. चेहऱ्यांवर मुखपट्ट्या होत्या. त्या खेळांना ‘भुताटकी खेळ’ (Ghost Games) असे म्हटले गेले. पॅरिसने मात्र कात टाकली आहे आणि ‘भव्य खेळा’चा (Gorgeous Games) घाट घातला आहे. ‘जुने जाऊ द्या मरणांलागुनी’ हाच तर प्रेमनगरी पॅरिसचा पैगाम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT