हवामानातील गंभीर बदलांची नोंद घेणारी यंत्रणाच जर आपली उपकरणे सदोष असल्याचे सांगत असेल, तर परिस्थिती कठीण आहे.
एकीकडे उन्हाळ्याच्या झळांनी अवघा देश भाजून निघत असताना दुसरीकडे मात्र केरळात पावसाचे आगमन झाल्याची आनंदवार्ताही आली आहे. तिचे मनापासून स्वागत केले पाहिजे. कारण पावसाळ्यासारखा हवाहवासा पाहुणा नाही. त्यातून यंदाचा भाजून काढणारा उन्हाळा पाहता, हा पाहुणा लौकरात लौकर येईल तर बरे, असे वाटू लागले आहे.
या उन्हाळ्यात तापमापकाच्या पाऱ्याने भलतीच ऊर्ध्व दिशा धरली. दिल्लीलगतच्या काही इलाख्यात तर ५२.३ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदले गेल्याने सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले. ५२.३ अंश सेल्सिअस. हा काही सामान्य आकडा नव्हे. सेल्सियसच्या मोजपट्टीवर तापमानाने पन्नाशी गाठली की सारे काही आपोआप ठप्प होऊन जाते. पन्नास अंशांच्या वर तापमान जाण्याचा अर्थ तो भूभाग मानवी वस्तीसाठी अनिष्ट मानावा लागतो.
कारण या तापमानात मनुष्यमात्र किंवा बव्हंशी सजीव दम टाकतात. मध्यंतरी एक व्हिडिओफीत समाजमाध्यमांवर फिरत होती. एक लष्करी जवान राजस्थानच्या वाळवंटात तप्त वाळूमध्ये पापड भाजतानाची ही चित्रफीत बरीच बघितली गेली. राजधानी दिल्लीतच तापमान वाढलेले दिसल्यामुळे सारेच चिंतित होणे स्वाभाविक होते.
अर्थात आपल्या हवामानखात्याने मात्र हा स्थानिक वातावरणीय बदल असावा किंवा नोंद तापमापकातील सेन्सरमधल्या दोषांमुळे झाली असावी, असा सावध निष्कर्ष काढला आहे. तसे असेल तर बाब अधिक गंभीर म्हणायला हवी. ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण बदलातील गंभीर बदलांची नोंद घेणारी यंत्रणाच जर आपली उपकरणे सदोष असल्याचे सांगत असेल तर परिस्थिती कठीण आहे.
पाऊसमान कसे आहे, आणि मॉन्सून कधी अवतरणार, याचे अंदाज -अडाखे हा विभाग देत असतो. उपग्रहांच्या साह्यामुळे हल्ली चक्रीवादळाचा तडाखादेखील नेमका कधी बसणार, याची अचूक वेळ सांगता येते. पण ही कामे करणाऱ्या विभागाची तापमान मोजणारी यंत्रणा मात्र चुकीच्या नोंदी करते, यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. दिल्लीनजीकच्या नजफगढ, नरेला आणि मुंगेशपूर भागात तापमानाने पन्नाशीचा आकडा गाठला किंवा ओलांडला.
बाकीच्या लगतच्या भागामध्ये मात्र हेच तापमान पाच-सहा अंशांनी कमी होते. एवढा फरक कशामुळे पडला, याचा शोध आता हवामानतज्ज्ञ घेत आहेत. या दिवसात दिल्लीची उन्हाने अक्षरश: तंदूरभट्टी होते, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. दिल्लीकर उन्हाळ्याला घाबरत नाहीत. किंबहुना, उत्तरेत या दिवसात उन्हाचा तडाखा असतो.
तथापि, ग्लोबल वॉर्मिंगचा धसका मात्र संपूर्ण जगानेच घेतला आहे, आणि त्याचेच चटके आता बसू लागले आहेत का, हा प्रश्न आहे. तापमान वाढले की देशाचे अर्थकारणही बिघडते. तापमानवाढीचे परिणाम ढोबळमानाने दीर्घकालीन आणि अल्पकालीन असतात. त्यामुळे या नोंदीही अचूक असायला हव्यात. २०२२ मध्ये उग्र उन्हाच्या तडाख्यामुळे भारताचे सुमारे ४.२ अब्ज डॉलरचे नुकसान झाले, आणि भारतात गव्हाचे उत्पादनही कमी झाले, अशी नोंद सापडते.
खरे नुकसानीचे आकडे कितीतरी पटीने अधिक असतील. दीर्घकालीन परिणाम अधिक भयावह आहेत. तापमानवाढीमुळे २०३०पर्यंत भारतातील कामाचे तास सरासरी ५.७ तासांनी घटतील, असा ‘आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटने’चा अंदाज आहे. हे नुकसान जवळपास साडेतीन कोटी रोजगारांच्या बरोबरीचे मानले जाते. शेतकऱ्यांनाही तापमानवाढीमुळे अपरिमित नुकसान सोसावे लागणार आहे.
यंदा दिल्लीच्या आसपासचे तापमान जसे विक्रमी नोंदले गेले, तशीच अवस्था थोड्याफार फरकाने देशात अन्यत्रही दिसली, आणि महाराष्ट्रातही. नागपूर-चंद्रपूर येथेही पारा चढाच राहिला. अकोल्यात तर उन्हाचा ताव पाहून जिल्हाधिकाऱ्यांना जमावबंदीचे १४४ कलम लावावे लागले. यंदाच्या उन्हाळ्यात एकट्या महाराष्ट्रात उष्माघाताची सुमारे पावणेतीनशे प्रकरणे नोंदली गेली. तर देशभरात हा आकडा सोळा हजाराच्या वर जातो.
देशभरात किमान साठ लोक उन्हाच्या तडाख्याने दगावल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. तप्त कढईतील लाह्यांसारखे फुटणारे असे जीवनमान सांभाळतानाच पाणीटंचाईचे संकट पाठोपाठ येऊन उभे राहाते. पाण्याचे स्त्रोत आटून गेलेले आणि पावसाची चाहूल नाही, अशा हतबल स्थितीत सध्या महाराष्ट्र सापडला आहे. महाराष्ट्रातल्या नद्या-धरणे पार आटून गेली आहेत.
मोठ्या प्रकल्पांमध्ये तर जेमतेम वीस टक्के पाणीसाठाही उरला नाही आणि लघु प्रकल्पांमध्ये २६ टक्के पाणी शिल्लक आहे. गावोगाव पाण्याचे टँकर धावू लागले आहेत. अशा परिस्थितीत मॉन्सूनचे ढग केरळापर्यंत येऊन पोचले, ही बातमीदेखील पावसाच्या पहिल्या धारेसारखी शीतल वाटते.
आठवडाभरात पाऊस महाराष्ट्रात येईल, तसा तो दिल्लीतही पोहोचेल. तेवढी कळ सोसणे भाग आहे. एकदा पावसाला सुरूवात झाली की, तापमापकाच्या चुका आणि दुरुस्त्यांचा विषय मागे पडेल, आणि सारे लक्ष लागून राहील, ते पर्जन्यमापकांच्या नोंदीकडे. समाजव्यवस्थेचे ऋतुचक्र असेच चालत असते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.