sea 
editorial-articles

या जगण्यावर : ‘अपना टाईम आयेगा’

सकाळ वृत्तसेवा

अथांग समुद्राकडे शांतपणे पाहत उभं राहिलं की, मनात काय येतं! निसर्गाचं अद्भुत रूप पाहून आपण स्तिमित होतो. त्याच्या विराटपणापुढे आपलं खुजेपण जाणवते. मग लक्ष जातं सागराच्या भरती-ओहोटीकडे. त्यात प्रतिबिंबीत होणाऱ्या सूर्याच्या उदय-अस्ताकडे. द्वैताच्या जगाकडे. आपल्याकडे रात्र अवतरु लागली तरी दुसऱ्या बाजूला दिवस उजाडतो आहे, या सत्याकडे. दृश्‍य बाजू हेच तात्कालिक सत्य वाटत असलं तरी तेव्हाही विरूद्ध बाजू अस्तित्वात असतेच. या दोन्ही बाजू एकमेकींना पूर्णत्व देतात. द्वैत हा निसर्गाचा स्वभाव आहे.खेळातसुद्धा एका पक्षाची हार ही विरोधी पक्षाची जीत असते. साधर्म्य म्हटले की, वैधर्म्य आलेच. आजार आणि आरोग्य, कटुता आणि गोडवा, दु:ख आणि आनंद, भीती आणि निर्भयावस्था, निर्मोह आणि मोह, पानगळ आणि पालवी, झोप आणि जाग ते अगदी मृत्यू आणि जन्म असं हे द्वैताचं अफाट जग आहे. नाणं एकच, बाजू दोन. प्रेम आणि द्वेष, मीलन आणि विरह, नायक आणि खलनायक या द्वैतभावाचा प्रत्यय व्यावसायिक चित्रपटसुद्धा देतात. नाहीतर फक्त चांगल्या माणसांनी भरलेल्या जगात बिचाऱ्या हिरोला करण्यासारखं काहीच उरलं नसतं. ‘द डार्क नाईट’ या गाजलेल्या चित्रपटात एक प्रसंग आहे. नायक बॅटमॅन आणि खलनायक जोकरची निकराची झुंज सुरू असते. निर्णायक क्षणी जोकर म्हणतो, ‘मी तुला कधीच संपवू शकत नाही. कारण तू नसशील तर मी करू तरी काय! You complete me.‘ जोकरचा हा प्रसिद्ध संवाद एक चिरंतन सत्य सांगतो. सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधला संघर्ष अनादि काळापासूनचा आहे. मग या दोन प्रवृत्ती दोन व्यक्तींमध्ये असोत की एकाच व्यक्तीच्या अंतरंगात. त्या एकमेकींविना अपूर्ण आहेत. एकीशिवाय दुसरीच्या अस्तित्वाला अर्थ नाही. जसा दु:खाशिवाय सुखाला नाही किंवा अपयशाशिवाय यशाला नाही.

जगभरात ही द्वैताची संकल्पना वेगवेगळ्या प्रतीकांद्वारे मांडली जाते. ‘अर्धनारीनटेश्वर’ हे भारतीय संस्कृतीतले प्रतीक. पुरूष आणि प्रकृती ही सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेतील दोन भिन्न पण परस्परपूरक तत्त्वं. ‘यिन-यांग’ हे उर्जेचं वर्तुळ म्हणजे द्वैताचं चिनी प्रतीक. त्यांच्या मान्यतेनुसार यिन हा भाग नकारात्मकतेचं, तर यांग सकारात्मकतेचं द्योतक. विश्वाचं वर्तुळ इंग्रजी ‘एस’सारख्या रेषेने विभागलेलं असून एका वेळी यापैकी एका बाजूचं वर्चस्व असतं, विरुद्ध तरीही परस्परावलंबी अशा या दोन्ही बाजू मिळून विश्वाची लय सांभाळतात, संतुलन राखतात, असं ते मानतात. यांग या सृजनाच्या, आशेच्या भागात विनाशाचं, निराशेचं तर यिन या विनाशाच्या भागात सृजनाचं, आशेचं एक सूक्ष्म बीज बिंदूरुपाने दर्शवलेलं असतं. अगदी अशीच प्रतिमा कुसुमाग्रजांच्या कवितेत ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल’ अशा तेजस्वी शब्दांत सामोरी येते.

द्वैताचा पूर्णत्वाशी म्हणजेच अद्वैताशी असलेला हा संबंध जसजसा उलगडत जाईल, तसतसं आपल्या आयुष्यातल्या उलथापालथींना आपण संयतपणे, अधिक समंजसपणे हाताळू शकू. भयभीत झालेल्या सभोवतालाला This too shall pass हे सांगू शकू. ज्या परिस्थितीला आपण बदलू शकत नाही तिचा स्वीकार करण्याचं आपल्याला बळ मिळो, जी परिस्थिती आपण बदलू शकतो ती बदलण्याचं धैर्य लाभो आणि या दोन्हीतला फरक समजून घेण्याची शहाणीव आपल्यात निर्माण होवो, ही चित्तशांती प्रार्थना आपल्या मनात रुजवू शकू. आपल्याला निवडीचा नसेल पण प्रयत्न करण्याचा अधिकार अवश्‍य आहे. पृथ्वीवर आपल्या बाजूला सध्या अंधार आहे, नंतर नियमानुसार प्रकाश येईलच, तो येतोच. पण म्हणून वाट बघत न बसता माणसाने विजेचा शोध लावलाच नं! नाणं आत्ता आपल्याला हव्या त्या बाजूला पडलं नाही तरी द्वैताच्या जगाच्या संकेतानुसार ‘अपना टाईम आयेगा’ हे नक्की. त्यासाठी प्रयत्नवादाच्या हाताने नाणेफेक मात्र करत राहावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची एकमताने निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

Ashok Chavhan : ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला.....अशोक चव्हाण यांची बाळासाहेब थोरात आणि देशमुखांवर खोचक टीका

Sangamner Result: संगमनेरमध्ये पराभवाचा बदला पराभवानेच! ४० वर्षांची कारकीर्द ४१ वर्षांच्या तरुणाने संपवली; नेमकं काय घडलं?

Zimbabwe beat Pakistan: यांना झिम्बाब्वेने हरवले... पाकिस्तानचे ६ फलंदाज ६० धावांत तंबूत, मोहम्मद रिझवाच्या संघाची गेली लाज

SCROLL FOR NEXT