Anil Deshmukh sakal
संपादकीय

अटकेचे ‘उत्तरा’यण

अटक टाळण्याचे सर्व मार्ग खुंटल्यानंतर अनिल देशमुख ‘ईडी’ला शरण आले आणि त्यांना अटक झाली.

सम्राट फडणीस - सकाळ वृत्तसेवा

अटक टाळण्याचे सर्व मार्ग खुंटल्यानंतर अनिल देशमुख ‘ईडी’ला शरण आले आणि त्यांना अटक झाली. या प्रकरणाचे राजकारण खूप झाले; आता मुक्त आणि कोणत्याही दबावविरहित वातावरणात चौकशीतून सत्य बाहेर कसे येईल, याची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे.

प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ गेल्या फेब्रुवारीत स्फोटकांनी भरलेली एक मोटर सापडल्यानंतर सुरू झालेली कहाणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेपर्यंत जाऊन पोचली आहे. हा अर्थातच या कहाणीचा शेवट नाही; कारण या अटकेनंतरच खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या या कहाणीचा तपास सुरू होणार आहे. मात्र, दरम्यानच्या आठ-नऊ महिन्यांत या कहाणीने वेगवेगळी वळणे घेतली. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळाही बराच उडाला. एक खरे की, देशमुख यांच्यावरील अत्यंत गंभीर अशा आरोपांची सत्यासत्यता पडताळून पाहणे बाकी असले तरी या अटकेमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दिवाळीच्या आनंदात मिठाचा खडा जरूर पडला आहे. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ ही मोटर सापडल्यानंतर या कहाणीत सचिन वाझे नावाच्या एका सहायक पोलिस निरीक्षकाचे पात्र प्रमुख भूमिका बजावू लागले. त्यानंतर महिनाभरातच मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून अत्यंत अवमानास्पद रीतीने उचलबांगडी झालेले ज्येष्ठ अधिकारी परमबीर सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुख यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. देशमुख यांनी १०० कोटींची भरभक्कम खंडणी जमा करण्यास सांगितले होते, या परमबीर यांच्या आरोपानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर राजीनामा देणे भाग पडले होते. मात्र, हा राजीनामा मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांच्यावरील या आरोपासंबंधात केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने (सीबीआय) १५ दिवसांत चौकशी सुरू करावी, असे आदेश दिल्यानंतरच दिला होता. आताही गेले चार-सहा महिने बेपत्ता असलेले देशमुख यांनी सोमवारी अचानक सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) शरणागती पत्करण्यास विविध स्तरांवरील न्यायालयांनी घेतलेली ठाम भूमिकाच कारणीभूत आहे. ही अटक चुकवण्यासाठी देशमुख हे ‘बेपत्ता’ राहून न्यायसंस्थेकडे दाद मागत होते. त्यात काही गैरही नव्हते. अशी दाद मागण्याचा अधिकार हा कोणालाही असतो. मात्र, सर्व मार्ग खुंटल्यानंतरच त्यांनी शरणागती पत्करली. अखेरीस जवळपास १२ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक झाली आहे.

देशमुख यांनी ‘ईडी’समोर शरणागती पत्करल्यापासूनच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वसुबारसेच्या दिवशीच दिवाळीचे फटाके फोडायला सुरुवात केली होती. एवढेच नव्हे, तर आता देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडीच्या आणखी कोणकोणत्या मंत्र्यास अटक होणार, याच्या याद्याही जाहीर केल्या जाऊ लागल्या! खरे तर देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा गंभीर आरोप झाला, तेव्हापासूनच भाजप नेत्यांचा जल्लोष सुरू होता. देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर तर आपल्या पदरात महाविकास आघाडीतील एक प्रमुख ‘विकेट’ अलगद येऊन पडल्याचेच चित्र उभे केले होते. आताही त्याची पुनरावृत्ती होत आहे. एक मात्र खरे की, आयुक्त पदावरील अधिकाऱ्याने केलेल्या इतक्या गंभीर आरोपानंतरही ते आपल्या पदास चिकटूनच राहिले होते. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी त्यानंतर ‘एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा की नाही, हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे’ अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता देशमुख यांच्या अटकेनंतर तरी सर्वच पक्षांनी यासंबंधातील राजकारण थांबवावे. जी काही चौकशी व्हायची असेल ती मुक्त वातावरणात आणि मुख्य म्हणजे कोणत्याही राजकीय दबावाविना व्हावी, अशी अपेक्षा करणे गैर ठरणार नाही. देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. दरम्यानच्या काळात गजाआड गेलेल्या निलंबित वाझे याने आर्केस्ट्रा बारमालकांकडून वसूल केलेल्या चार कोटी ७९ लाख रुपयांच्या खंडणीचा विनियोग हा काही शेल कंपन्यांकडून देशमुख यांच्या शैक्षणिक संस्थांसाठी केला गेला, असे तपासात आढळून आल्याचा ‘ईडी’चा दावा आहे. त्यामुळेच ही अटक झाली आहे. देशमुख यांच्या ‘पीए’ने वाझेकडून ही रक्कम घेतल्याचेही तपासात आढळल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे. सारेच आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्याची चौकशीही व्हायला हवी. मात्र, हे सारे कायद्यातील तरतुदींनुसार आणि त्या मार्गानेच व्हावे. अन्यथा, देशातील तपास यंत्रणांवरील जनतेचा विश्वास निश्‍चितच उडून जाईल.

महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीला याच महिन्यात दोन वर्षे होत असताना आणि ऐन दिवाळीच्या तोंडावरच देशमुख यांना झालेल्या अटकेचे राजकीय भांडवल होणे अपरिहार्य आहे. मात्र, दिवाळीच्या तोंडावर, सोमवारीच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साजरी केलेली धुळवड ही कोणालाच शोभा देणारी नव्हती. एकीकडे ‘एनसीबी’चे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही रोज आरोप होत असून, तेही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. त्याचवेळी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारा बडा पोलिस अधिकारीही बेपत्ता आहे. त्यामुळे तर आरोपांची शहनिशा करणे, ही आता ‘ईडी’ची कसोटी आहे, असे म्हणावे लागते. अर्थात, या चौकशीतून सत्य बाहेर येणार आहे. तूर्तास तरी ही गेल्या फेब्रुवारीत सुरू झालेली कहाणी निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT