- ललितागौरी कुलकर्णी
ह ळूहळू पण निश्चितपणे जग बॅटरीवर चालणारी वाहने वापरू लागले आहे. जगभरात सर्व वाहनकंपन्या आपापले पेट्रोल- डिझेल इंजिनकडून विजेवर चालणाऱ्या इंजिनचे नियोजन जाहीर करत आहेत. भारतही या बदलामध्ये मागे नाही. सर्व मोठ्या भारतीय कंपन्या आपल्या विजेवरील चारचाक्या आणि दुचाकी वाहने उत्पादन करू लागल्या आहेत.
एवढेच नव्हे तर भारतीय ग्राहकांमध्ये ही वाहने लोकप्रियही आहेत. कदाचित पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे की काय; पण भारतात वाहनक्षेत्रातील ‘हरितक्रांती’चे मुख्य कारण ग्राहकांकडून असलेला उत्तम प्रतिसाद असल्याचे मानले जाते.
२०२२-२३ मध्ये या विजेवरच्या गाड्यांचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा १५५ टक्क्यांनी वाढून १७ लाख झाले आहे. भारतीय वाहनउद्योग २०३० पर्यंत विषारी वायूउत्सर्जन ४५ टक्क्यांनी कमी करण्याच्या ध्येयाकडे आगेकूच करत असतानाच या बदलामुळे झलेल्या तंत्रज्ञानविकासाचा परिणाम वाहन दुरुस्तीक्षेत्रातल्या अनेक लघु उद्योग आणि सूक्ष्म सेवांवर होणार आहे.
सध्या वाहनउद्योगाशी संबंधित नानाविध उद्योग लघु-सूक्ष्म उद्योगक्षेत्रात रोजगार निर्माण करत आहेत. पुण्याच्या आजूबाजूला गाडीतील प्रत्येक भाग तयार करून बजाज, टेल्को इत्यादी मोठ्या कंपन्यांना पुरवणारी हजारो लघु- सूक्ष्म उद्योगांची पुरवठासाखळी आहे.
भारतात या क्षेत्रात परदेशी गुंतवणूक येत आहे; परंतु सध्यातरी विजेच्या गाड्यांसाठी लागणारे बहुतेक भाग हे व्हिएतनाम, चीन, जर्मनी इत्यादी देशांमधून आयात केले जातात. लौकरच या आयातीची जागा भारतात परदेशी गुंतवणुकीच्या साहाय्याने बनवलेली उत्पादने घेतील.
जसजशी परंपरागत वाहनांची जागा विजेवर चालणारी वाहने घेऊ लागतील, तसतशी वाहनउद्योगावर आधारित जुन्या भागांची आणि ते बनवणाऱ्या लघुउद्योगांसाठीची मागणी कमी होऊ लागेल. या परिस्थितीला या लघु उद्योगांनी कसे सामोरे जावे, याचे ठोस नियोजन कोणत्याही प्रकारे झाल्याचे दिसत नाही.
सेवाक्षेत्रात गाडीमध्ये हवा भरण्यापासून, तेल पाणी करणे, इंजिनाचे विविध भाग पुरवणे या व्यवसायांमधील गॅरेज मेकॅनिक आहेत. त्यांच्या सेवांसाठीची मागणीदेखील कमी होऊ लागेल. एकदा मॅकेनिकाकडे गेल्यावर गिअर बॉक्समधले तेल बदलणे, आरसा घट्ट करणे, ब्रेककेबल बदलणे अशा प्रकारची विविध कामे निघून मॅकेनिक रोजगार मिळवत असे.
आता नवीन वाहनांमध्ये तेल बदलणे, यासारखी कामे निघणारच नाहीत. एकीकडे जुन्या व्यवसायांवर गदा येण्याची भीती तर दुसरीकडे विजेच्या गाड्यांसाठी योग्य मॅकेनिक मिळणे दुरापस्त अशी परिस्थिती सध्या अमेरिका-ब्रिटनसारख्या काही पाश्चात्य देशांमध्ये दिसते.
या नवीन गाड्या दुरुस्त करण्यासाठी जी विशिष्ट साधने लागतात, त्यासाठी पैसे ओतणे या व्यावसायिकांना परवडत नाही. भारतातही ‘बॅटरीवरच्या गाडीला हात लावणार नाही’ असे सांगण्यात येते, त्यामुळे नवीन विजेवरची गाडी घेतली तर नेहमीच्या कोपऱ्यावरच्या जुन्या गॅरेजमध्ये सोडता येत नाही.
सरकार या नव्या ‘हरितक्रांती’वर भर देऊन विजेवरील वाहनांसाठी परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे. ग्राहकांनाही बऱ्याच राज्यांमध्ये विविध करांमधून सूट देण्यात आली आहे. परंतु विजेच्या गाड्या दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण दुर्मिळ आहे.
कारण काही राज्यांत सरकारने दोन वर्षांचा अभ्यासक्रम तयार केला आहे. या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणांसाठी तो उपयोगी पडेल. पण जे लाखो लोक परंपरागत वाहनदुरुस्ती करताहेत त्यांच्या भवितव्याचे काय?
देश प्रगतिपथावर असताना स्थित्यंतरे अटळ असतात; पण त्यातून आर्थिक विषमता तीव्र होऊ न देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. लघु- सूक्ष्म उद्योग व गॅरेज व्यवसायिक यांनी या स्थित्यंतराला सामोरे जाण्यासाठी काय करावे. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण त्यांना दिल्यास मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीत भर पडण्यापासून देश वाचू शकेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.