Education sakal
संपादकीय

शिक्षणदिशा : इंग्रजी भाषा- परकी की आपली?

मराठी भाषेत फक्त इंग्रजीला जितकी नावे, बिरुदे दिलेली आहेत, तितकी क्वचितच दुसऱ्या एखाद्या भाषेला दिली गेली असतील.

धनवंती हर्डीकर

मराठी भाषेत फक्त इंग्रजीला जितकी नावे, बिरुदे दिलेली आहेत, तितकी क्वचितच दुसऱ्या एखाद्या भाषेला दिली गेली असतील - इंग्रजी, इंग्लिश, आंग्लभाषा, साहेबाची भाषा, वाघिणीचे दूध, - शिवाय इंग्लिशमधील ‘लायब्ररी लँग्वेज’, ‘विंडो ऑन द वर्ल्ड’ ही बिरुदे अधूनमधून वापरली जातात.

माध्यमांची चर्चा सुरू झाली, की ‘मावशी’ (मराठीचा जहाल पुरस्कार करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने ‘पुतनामावशी’), शालेय अभ्यासक्रमात (जरी कालक्रमानुसार दुसरी असली, तरी कायम) ‘तृतीय भाषा’, वगैरे. या सगळ्या नावांना विशिष्ट ऐतिहासिक आणि भावनिक संदर्भ आहेत. हे इंग्रजीशी असलेल्या आपल्या जवळीकीचेच निदर्शक म्हणायला हवे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली, तरी इंग्रजी भाषा नाहीशी झाली नाही. भारताची राज्यघटना प्रथम इंग्रजीतच तयार झाली. आजही हिंदीबरोबर इंग्रजी ही आपली ‘सहयोगी अधिकृत भाषा -असोसिएट/ॲडिशनल ऑफिशियल लँग्वेज’ आहे. काही राज्यांची एकमेव, तर काही राज्यांची दुसरी राज्यभाषा आहे.

केंद्र-राज्य संपर्कासाठी, प्रशासनात, सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयांत प्रामुख्याने इंग्रजीच वापरले जाते. मोठे उद्योग, व्यापार, उच्चशिक्षण, वर्तमानपत्रे, रेडिओ, टीव्ही, डिजिटल माध्यमे आणि साधने यांसाठी इंग्रजीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. इतकेच नाही, तर इंग्रजीच्या वापराला अधिक प्रतिष्ठा आहे. लोकांच्या दृष्टीने उच्चशिक्षित, सधन, शहरी, सर्वत्र आत्मविश्वासाने वावरणाऱ्या उच्चभ्रू (या शब्दाचे highbrow हे मूळदेखील इंग्रजीच!) वर्गाचे वलय इंग्रजी भाषा आणि शिक्षण याभोवती आहे.

हेच शिक्षण आपल्या मुलांना मिळावे असे पालकांना वाटले, तर नवल नाही. परिणामतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे, आणि त्याचबरोबर थोडेफार, बऱ्यापैकी, तसेच अस्खलित इंग्रजी येणाऱ्या, समजू शकणाऱ्या लोकांची संख्याही वाढते आहे.

रोजच्या व्यवहारात सहज वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचे, वाक्प्रचारांचे प्रमाणही रोज वाढत आहे. राज्यघटनेच्या आठव्या सूचीत समावेश व्हावा म्हणून इतर भारतीय भाषांच्याबरोबर इंग्रजी भाषाही रांगेत उभी आहे. रांगेतील ही भाषा म्हणजे ब्रिटिश किंवा अमेरिकी इंग्लिश नक्कीच नाही. ती आहे, ‘इंडियन इंग्लिश’.

‘इंडियन इंग्लिश’ म्हणजे चुकीचे, थोड्या कमी दर्जाचे इंग्लिश असे मात्र मुळीच नाही. ‘इंडियन इंग्लिश’ म्हणजे भारतीय लोकांच्या गरजा, भाषिक, सांस्कृतिक आणि इतरही स्थानिक संदर्भ यांतून विकसित झालेला, अमेरिकी किंवा ऑस्ट्रेलियाच्या इंग्लिशसारखाच इंग्लिशचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार.

त्यात स्थानिक भाषांमधून जसेच्या तसे उचललेले शेकडो शब्द आहेत (नीम, धोती, गुरू, इत्यादी); भारतीयांनी स्वतः तयार केलेले पूर्णपणे नवे किंवा मिश्र शब्द आहेत. (प्रीपोन, लंच होम, ब्लाऊजपीस, फॉरिन-रिटर्न्ड इत्यादी); मूळ इंग्रजी पण थोड्या वेगळ्या अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत (हॉटेल, डाऊट, फिंगरचिप्स); वैशिष्ट्यपूर्ण वाक्यरचना आणि वाक्प्रचार आहेत; मिलियन-बिलियनपेक्षा वेगळी लाख, क्रोर अशी भारतीय संख्यानामेही आहेत.

इंग्लिशचा हा प्रकार जरी मुख्यतः भारतातच वापरला जात असला, तरी इतर देशांतील लोकांना समजू नये, इतकाही तो वेगळा नाही. किंबहुना बऱ्याच आशियाई देशांत ब्रिटिश/अमेरिका इंग्लिशपेक्षा ‘इंडियन इंग्लिश’ समजणे सोपे आहे.

इंग्रजी भाषेचा भारतातील प्रसार ही खरे तर आजच्या जगात आपली ताकद आहे. इंग्रजीचा वापर करणाऱ्या भारतीयांची संख्या आज काही कोटींच्या घरात आहे. इंग्रजी पुस्तके आणि इतर साहित्य यांची भारत ही सध्या जगात तिसरी बाजारपेठ आहे, आणि लौकरच सर्वात मोठी बाजारपेठ होईल. वेगवेगळ्या स्तरांवर इंग्रजी शिकवण्याच्या व्यवसायासाठीही इथे प्रचंड संधी आहे.

अलीकडेच ‘ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ने इंडियन इंग्लिशमधील शब्द, रचना, अर्थ आणि उच्चारांचीही दखल घेतली आहे, ती उगीच नाही. हे लक्षात घेता आता आपण इंग्रजीच्या बाजारपेठेतील सर्वात मोठे ग्राहक या नात्याने इंग्रजीचा विचार करण्याची, इंडियन इंग्लिशचे शिक्षण, संशोधन याबाबत आत्मविश्वासाने पावले टाकण्याची आणि त्याच अनुषंगाने इंग्रजीचा अभ्यासक्रम, शैक्षणिक साहित्य, अध्ययन-अध्यापनपद्धती, मूल्यमापन या सगळ्यांचे स्वरूप ठरवण्याची गरज आहे. आपल्या देशात एकविसाव्या शतकातील इंग्रजी शिक्षण इतरांच्या कसोट्यांना उतरणारे नाही, तर भारतीयांच्या गरजा आणि क्षमतांना पूर्ण न्याय देणारे हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT