पुण्याच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागातील रस्त्यावरून स्वयंचलित दुचाकीने जात असताना पतंगाच्या मांजाने गळा चिरला गेल्याने जखमी झालेल्या "सकाळ'च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांची दोन दिवस मृत्यूशी चाललेली झुंज रविवारी सकाळी संपुष्टात आली. रस्त्यावर हेलकावत आलेल्या मांजाने त्यांचा अखेर बळी घेतला. ही घटना कमालीची दुःखद तर आहेच; परंतु संतापजनकही आहे. रस्त्यावरच्या सुरक्षिततेला सर्वसामान्य नागरिक कसा पारखा झाला आहे, याचे पुरावे रोजच्या रोज आपल्या सगळ्यांच्या अंगावर अक्षरशः आदळत आहेत; पण त्यातून चडफड आणि त्रागा या व्यतिरिक्त काही निष्पन्न होत नाही. त्यामुळेच प्रश्न समोर येतो, की असे किती बळी गेल्यानंतर आपल्याकडच्या संबंधित यंत्रणांना जाग येणार आहे? रस्त्यांवरचे हे "अराजक' थांबणार की नाही ?
अनपेक्षितरीत्या उद्भवलेल्या संकटातून "अपघात' घडतात; परंतु अशा प्रकारच्या धोक्यांची जाणीव असूनही प्रतिबंधक उपाय योजले जात नसतील, कायदेकानू तयार होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसेल आणि बंदी घातलेल्या गोष्टींचीही सर्रास विक्री-खरेदी होत असेल तर अशा परिस्थितीत घडलेल्या दुर्घटनांना अपघात कसे म्हणणार? ढिसाळ आणि संवेदनशून्य अशा व्यवस्थेने घेतलेला हा बळी नव्हे काय? नॉयलॉनचा चिनी मांजा काय किंवा चुरडलेल्या काचेचे आवरण लावलेला साधा मांजा काय, त्याने अनेक पक्षी मरण पावतात किंवा जायबंदी होतातच; पण अनेक माणसेही दगावतात. त्यापैकी बहुतेकांच्या मृत्यूची नोंद "अतिरक्तस्रावा'ने एवढीच होत असल्याने पतंगांच्या मांजामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची सगळी आकडेवारी समोर येत नाही. तरीही दरवर्षी किमान शंभर जण अशा घटनांमध्ये मरण पावतात, असे उपलब्ध माहितीवरून आढळते. जखमींची तर गणतीच नाही, अशी स्थिती. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी "राष्ट्रीय हरित लवादा'ने चिनी नॉयलॉन मांजावर बंदी घातल्याचे जाहीर केले. न्यायालयांनीही वेळोवेळी यासंबंधी आदेश दिले. पण कायदे आणि नियम हे पाळण्यासाठी असतात आणि ते पाळले नाहीत तर अशांवर कारवाई करायची असते, हेच आपण विसरून गेलो आहोत काय, असा प्रश्न पडण्याजोगी सध्याची स्थिती आहे. मांजा विकणारे कोण आहेत, ते नेमकी कोठे विक्री करतात, हे आम्हाला कसे कळणार, असा प्रश्न जर पोलिसच विचारू लागले, तर सर्वसामान्यांनी पाहायचे कोणाकडे?
वास्तविक पर्यावरणवादी कार्यकर्ते या प्रश्नावर अनेक दिवस आवाज उठवत आहेत. पण हे त्यांचे अरण्यरुदनच ठरत आले आहे. मुक्या पक्ष्यांचे हाल थांबविण्याची त्यांची मागणी होती; परंतु जिथे मानवी जीविताची किंमतच हरवत चालली आहे, तिथे पक्ष्यांचा विचार कोण करतो! अशा दुर्घटना घडल्या की काही जण पतंग उडविण्याच्या खेळांवर बंदीची मागणी करतात आणि मग बंदीच्या विरोधात दुसरा एक गट बाह्या सरसावत पुढे येतो. सांस्कृतिक, धार्मिक परंपरांची ढालही त्यांच्या हाताशी असतेच. मग या वादालाही कमालीची धार चढते; मूळ समस्या तशीच राहते. खेळ आणि उत्सव यांचे स्थान मानवी जीवनात अनन्यसाधारण आहे. त्यामुळे कुठल्याच खेळांवर बंदीची कुऱ्हाड चालविण्याची गरज नसते. मुख्य प्रश्न आहे तो नियमपालनाच्या वृत्तीच्या अभावाचा. खेळातही नियम असतातच की. जर ते पाळले नाहीत तर खेळच होणार नाही. त्यामुळेच मैदानांवर पतंग खेळायला हरकत नाही. त्यातही साध्या दोरीचा मांजा वापरला, तर पतंग उडविण्याचा आनंद घेता येतो. पण तो घेण्यापेक्षा दुसऱ्याचा पतंग काटण्यात जास्त आनंद वाटू लागला, की अधिकाधिक धारदार मांजांना मागणी वाढू लागते. मागणी तसा पुरवठा करायला तत्पर असलेले काही व्यापारीही मग बिनदिक्कतपणे त्यांची विक्री करतात. यावर आता जनजागृती आणि कायदापालनाचा आग्रह या दोन मार्गांनीच मार्ग सापडू शकेल. रस्त्यावरील सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक हा नागरिकांचा हक्क आहे; पण तो डावलला जात आहे. रस्त्यावरील अराजकी परिस्थितीला अनेक घटक कारणीभूत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी रस्ते अडविणारे, नियम पायदळी तुडवून वाहने हाकणारे, अतिक्रमणे करणारे, क्रिकेटचे डाव रस्त्यातच मांडणारे किंवा गजबजलेल्या रस्त्यांवर खुशाल पतंग उडविणारे या सगळ्यांचा त्यात वाटा आहे. त्यांना रोखण्याच्या कर्तव्यात सरकारी यंत्रणा हतबल ठरताना दिसताहेत. या सगळ्यांनीच नियमपालनाच्या संस्कृतीचा "रस्ता' जर पकडला नाही आणि हे असेच चालू राहिले, तर सारी व्यवस्थाच दोरी तुटलेल्या पतंगासारखी भरकटेल. तो धोका टाळायचा असेल तर पुण्यातील दुर्घटनेचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा.
आणखी बातम्या :
मांजाने घेतला "सकाळ'च्या कर्मचाऱ्याचा बळी
‘नायलॉन’ मांजावर बंदीसाठी लोकशिक्षणासह जनजागृती हवी
नायलॉनचा मांजा कर्दनकाळ
आयुष्याचा 'दोर' तुटू नये...
मांजा महाग...माणसाचा जीव स्वस्त...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.