Future Wars and Navies sakal
संपादकीय

भविष्यातील युद्धे आणि नौदल

भारताचे व आपल्या शेजारच्या देशांचे आर्थिक स्थैर्य सागरी संपदेवर अवलंबून आहे. शेजारी देशांच्या ‘विशेष आर्थिक क्षेत्रा’मध्ये कारवाई करणे, बेकायदा मासेमारी अशी कृत्ये चीन करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

कारगिल विजय

भारताचे व आपल्या शेजारच्या देशांचे आर्थिक स्थैर्य सागरी संपदेवर अवलंबून आहे. शेजारी देशांच्या ‘विशेष आर्थिक क्षेत्रा’मध्ये कारवाई करणे, बेकायदा मासेमारी अशी कृत्ये चीन करत आहे. चीनच्या वाढत्या कुरापती, इंडो-पॅसिफिक भागाच्या संरक्षणासाठी ‘क्वाड’च्या माध्यमातून प्रयत्न करणे हे भारतीय नौदलासाठी महत्त्वाचे आहे.

कमोडोर एस. एल. देशमुख

(निवृत्त), संरक्षणतज्ज्ञ

भा  रत आणि सागराचे एक अतूट नाते आहे. ऐतिहासिक नोंदीवरून असे दिसून येते, की इसवीसन पूर्व ३२१ सालापासून भारताने आपले सागरी वर्चस्व गाजवले आहे. त्याकाळी चालुक्यांनी व्यापारी आणि लढाऊ अशा दोन्ही प्रकारच्या नौदलाची स्थापना केली. भारताची ही उज्ज्वल परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अत्युच्च शिखरावर पोहोचली. छत्रपतींची अष्टकोनी मुद्रा आज नौदलाचे ध्वज भूषविते. स्वातंत्र्यापूर्वी १९४६ दरम्यान भारतीय नौदलाने इंग्रजांविरुद्ध केलेल्या उठावाने आपल्या स्वतंत्र लढ्याला निर्णायक वळण दिल्याने मानले जाते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ‘रॉयल इंडियन नेव्ही’चे भारतीय नौदलामध्ये रूपांतर झाले, परंतु पुढची बरीच वर्षे भारतीय नौदलाकडे एक अलंकारिक सेना म्हणूनच बघण्यात येत होते. १९६५नंतर या दृष्टिकोनात बदल होण्यास सुरुवात झाली. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील अतुलनीय कामगिरी बघून नौदलाचे महत्त्व सरकारी यंत्रणा आणि भारतीय नागरिकांच्या मनावर ठसले. भारतीय नौदल केवळ देशाच्या सागरी सीमांचेच रक्षण करत नाहीत, तर तिची सभ्यता व संस्कृती देखील जपते. आज भारतीय नौदलाला जगातील अग्रगण्य नौदलांमध्ये गणले जाते, याचे कारण म्हणजेच नौदलाची बहुआयामी क्षमता.

भारतीय नौदल सागरी पृष्ठभाग जलांतर्गत, तसेच हवाई युद्धांसाठी सज्ज आहे. आधुनिक विमानवाहू, सुसज्ज लढाऊ, पाणबुडी विरोधी व रसद पुरवठा करणारे जहाजांबरोबरच विविध प्रकारची विमाने व हेलिकॉप्टर्स नौदलाच्या क्षमतेत भर घालतात. जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडींना पाहता सागरी सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरत आहे. अरबी समुद्र, लाल सागर (रेड सी), हिंद महासागर, बंगालचा उपसागर, दक्षिणी चिनी समुद्र तसेच इंडो पॅसिफिक भाग अशा या सगळ्या भागांमध्ये अशांतता आहे. चाचेगिरी, पुरवठा जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले, पाकिस्तानी नौदलाला चीनकडून होणारा आधुनिक जहाज व शस्त्रास्त्र पुरवठा, चीनच्या सागरी कुरापती या सगळ्यांचा आपल्या देशाच्या सुरक्षेबरोबरच राजकीय व आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. भारतीय नौदल या सगळ्या घडामोडींबद्दल सजग आहे आणि त्यांचे परिणाम कमीत कमी राहतील यासाठी कार्यरत आहे.

कारगिलमधील ‘ऑपरेशन तलवार’

कारगिलच्या युद्धादरम्यान भारतीय नौदलाने एक अतिशय महत्त्वाची आणि भारतीय सैन्य दलाच्या कारवाईला पूरक अशी भूमिका बजावली होती. या कामगिरीला ‘ऑपरेशन तलवार’ या सांकेतिक नावाने ओळखले जाते. या कामगिरीअंतर्गत नौदलाच्या पूर्वी आणि पश्चिमी आरमारांनी सक्रिय सहभाग घेतला होता. उत्तर अरबी समुद्रात गस्ती जहाजे पाठवून भारताने पाकिस्तान नौदलाच्या जहाजांना कराची बंदरातून कारवाई करण्यास पायबंद घातला. तसेच, पाकिस्तानच्या समुद्री व्यापारावर बंधने आणली. भारतीय नौदलाच्या कामगिरीचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर तसेच खनिज तेल साठ्यावर परिणाम झाला. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ या विषयावर एकदा म्हणाले होते, ‘‘त्यावेळी भारताबरोबर सर्व व्यापक युद्ध छेडले गेले असते, तर पाकिस्तानकडे फक्त सहा दिवस लढण्याइतपत इंधन साठा होता.’’ दरम्यान या वक्तव्यावरून भारतीय नौदलाच्या कामगिरीचा प्रभाव नक्कीच नजरेसमोर आला. ‘ऑपरेशन तलवार’ सुरू असतानाच भारतीय नौदलाने ‘समरेक्स’ नामक युद्ध अभ्यास सुरू केला व त्याची व्याप्ती वाढवली होती. याचा देखील परिणाम पाकिस्तानच्या इंधन सुरक्षिततेवर झाला होता. कारगिलमध्ये भारतीय नौदलाच्या ‘मार्कोस’ कमांडो दलानेही महत्त्वाचे योगदान दिले होते. भारतीय नौदलाच्या बहुआयामी क्षमतेचा व कार्यशैलीचा आढावा घेतल्यावर हे सहजपणे लक्षात येईल, की आज जगभरात भारतीय नौदलाचे एक महत्त्वाचे स्थान आहे.

नौदलाचे आधुनिकीकरण

भविष्याच्या अनुषंगाने पाहता चीनच्या हिंदी महासागरातील महत्त्वाकांक्षांचा, तसेच आपल्या शेजारच्या राष्ट्रांवर बेल्ट अँड रोडच्या नावाखाली भारताच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल अशी कृती करणे. उदाहरणार्थ कोको बेटांवर रडार प्रणाली लावणे, सर्वेक्षण जहाजे श्रीलंकेत आणणे आदी. दरम्यान या कारवाईला चीनचा ''स्ट्रिंग ऑफ पर्ल्स'' असे संबोधले जाते. याचा मुख्य हेतू भारताला त्याच्या मित्र देशांपासून दूर करणे आहे. भारताचे व आपल्या शेजारच्या देशांचे आर्थिक स्थैर्य हे बरेचसे सागरी संपदेवर अवलंबून आहे व आपल्या शेजारी देशांच्या ‘विशेष आर्थिक क्षेत्रा’मध्ये कारवाई करणे, बेकायदेशीर मासेमारी अशी कृती चीन करत आहे. यामुळे आपल्या व मित्रदेशांच्या नील अर्थव्यवस्थेवर होणारे संभाव्य परिणाम रोखणे, सागरी प्रदेशातून जाणाऱ्या व्यापारी मार्गांचे रक्षण हे सुद्धा आपल्या नौदलाचे कर्तव्य आहे, जे ती काटेकोरपणे पार पाडत आहे. चीनच्या वाढत्या कुरापती, पाकिस्तानच्या नौदलाचे आधुनिकीकरण, इंडो-पॅसिफिक भागाच्या संरक्षणासाठी ‘क्वाड’च्या माध्यमातून प्रयत्न करणे हे भारतीय नौदलासाठी महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून नौदलाचे आधुनिकीकरण गरजेचे आहे.

कारगिलबरोबरच इतिहासात घडलेल्या इतर युद्धातून घेतलेले धडे तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या युद्धांच्या अनुषंगाने नौदलाची भूमिका आधुनिकीकरणाचीच असायला हवी. सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडींचा तसेच पूर्व व पश्चिम आघाडीवर चीन आणि पाकिस्तानकडून असलेले धोके लक्षात घेता भविष्यातील युद्धसज्जतेसाठी सागरी सुरक्षेचा विचार केला पाहिजे. भारतीय नौदल या सगळ्या घडामोडींबद्दल सजग आहे आणि त्यांचे परिणाम कमीत कमी राहतील यासाठी कार्यरत आहे. भारतीय नौदल ‘सायलेंट वॉरिअर म्हणून नेहमी तत्पर असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT