women sakal
संपादकीय

भाष्य : जागर स्त्रियांच्या ‘बुद्धिसंपदे’चा

बुद्धिसंपदा हक्क मिळविण्यासाठी महिलांना प्रोत्साहन हे आशयसूत्र यंदाच्या जागतिक बुद्धिसंपदा दिनासाठी (ता.२६ एप्रिल) निश्‍चित करण्यात आले आहे.

गणेश हिंगमिरे

बुद्धिसंपदा हक्क मिळविण्यासाठी महिलांना प्रोत्साहन हे आशयसूत्र यंदाच्या जागतिक बुद्धिसंपदा दिनासाठी (ता.२६ एप्रिल) निश्‍चित करण्यात आले आहे.

बुद्धिसंपदा हक्क मिळविण्यासाठी महिलांना प्रोत्साहन हे आशयसूत्र यंदाच्या जागतिक बुद्धिसंपदा दिनासाठी (ता.२६ एप्रिल) निश्‍चित करण्यात आले आहे. महिलांमध्ये पेटंट किंवा तत्सम अधिकारांची जाणीव करून देणे, त्याच्या नोंदींसाठी त्यांना प्रवृत्त करणे, जगभरातल्या ज्या महिलांनी बौद्धिक संपदाहक्क मिळवून प्रगतीची झेप घेतली, त्यांची उदाहरणे समाजापुढे ठेवणे हा उपक्रम खूप उपयुक्त ठरेल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या विषयांना आणि घटकांना समोर ठेवून विशेष दिवस साजरा करण्याची एक चांगली प्रथा निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ, जागतिक महिलादिन किंवा जागतिक योगदिवस. सदर दिनविशेष निश्चित करताना जगासमोर या विषयाचे किंवा घटकाचे महत्त्व अभ्यासले जाते. त्याचा प्रचार-प्रसार होतो. संयुक्त राष्ट्रांच्या अखत्यारीत काम करत असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा संघटने’च्या माध्यमातून साजरा होणारा जागतिक बौद्धिक संपदा दिवस हाही त्यादृष्टीने महत्त्वाचा मानला पाहिजे. बौद्धिक संपदा आंतरराष्ट्रीय कराराचा स्वीकार २६ एप्रिल १९७०ला झाला होता.

बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीतून निर्माण झालेली संपत्ती; मग ती पेटंट असो कॉपीराईट असो किंवा ट्रेडमार्क असो. या संपत्तीला जगभराचे द्वार खुले व्हावे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक दुसऱ्या सदस्यराष्ट्रांच्या बुद्धीतून निर्माण झालेल्या संपत्तीसाठी जागतिक दालने खुली व्हावीत म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्लॅटफॉर्म निर्माण होणे आवश्यक असते. हेच लक्षात घेऊन जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची निर्मिती झाली. थोडक्यात भारतात निर्माण झालेले पेटंट हे अमेरिकेमध्ये सुद्धा उपयोगी पडावे आणि अमेरिकेत तयार झालेले कॉपीराईट हे भारतातही उपयोगी ठरावे, या आंतरराष्ट्रीय समन्वयासाठी सदर जागतिक स्तरावरील संघटना आवश्यक होती आणि त्याची निर्मिती ५२ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिपत्याखाली झाली.

दरवर्षी अशा एक प्रकारे समाजघटकाला जागतिक बौद्धिक संपदा दिवसाच्या माध्यमातून प्रकाशित केले गेले. मागील वर्षी तरुणांच्या सर्जनशीलतेला हा दिवस समर्पित करण्यात आला होता; तर यंदाचा दिवस हा महिलांमधील सर्जनशीलतेला मध्यवर्ती ठेवून साजरा करण्यात येत आहे. अनेक नवनव्या गोष्टी महिलांना सुचत असतात. त्यातून काही नवी उत्पादनेही तयार होतात. पण हे सुचणे, ही निर्मिती यांचे काहीएक ‘मूल्य’ आहे आणि ते आपल्याला मिळायला हवे, ही जाणीव मात्र महिलांना असतेच असे नाही. भारतात तरी त्याविषयी जागृती घडविण्याची गरज जाणवते आहे. त्यामुळेच समाजातील सर्वच घटकांना अधिकाधिक ‘बौद्धिक संपदा’ प्राप्त करण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर महिलांचे योगदान खूप मोठे असते. समोर येणारे अनेक प्रश्न त्या केवळ आपल्या बुद्धिमत्तेतून, कल्पनाशक्तीद्वारे सोडवत असतात. अनेकदा त्यांना जी सोल्यूशन सापडतात, किंवा त्यांच्या हातून जी नवनिर्मिती होते, त्याची नोंद मात्र होत नाही. त्यामागे एक तर बौद्धिक संपदेच्या नोंदींच्या प्रक्रियेविषयीचे अज्ञान असते किंवा एकूणच समाजात महिलांना पुढे येण्यात असलेले सामाजिक वातावरणाचे अडथळे असतात. या दोन्ही बाबतीत सामाजिक प्रबोधन करावे लागेल. त्यासाठी बुद्धिसंपदा दिनाच्या उपक्रमाचा उपयोग करून घेता येईल. अर्थात हे काम एका ‘दिवसा’ने होणारे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. महिलांमध्ये पेटंट किंवा तत्सम नवनवीन आविष्कारांची जाणीव करून देणे, त्याच्या नोंदीसाठी प्रवृत्त करणे, जगभरातल्या ज्या महिलांनी बौद्धिक संपदा हक्क मिळवून प्रगतीची झेप घेतली, त्यांची उदाहरणे समाजापुढे ठेवणे हा उपक्रम खूप उपयुक्त ठरेल.

काही यशोगाथा

यासंदर्भात महाराष्ट्रातील काही महिलांच्या बौद्धिक संपदाविषयक यशोगाथांचे उदाहरण समाजापुढे प्रकर्षाने यायला हवे. अशा काही यशोगाथा प्रसिद्धही झाल्या आहेत. पुण्यात वास्तव्यास असलेल्या जयश्री यादव नावाच्या एका महिलेने गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद निर्माण होतो, तर ‘गुलाबाची वाईन’ तयार होऊ शकेल का, या आपल्या मनात आलेल्या प्रश्नाचा शोध घेतला आणि त्या शोधातून त्यांनी खरोखरच गुलाबाची वाइन बनवली. नुसती ती बनवून त्या थांबल्या नाहीत, तर त्याचे पेटंट भारतात व भारताबाहेर घेतले आणि त्याच पेटंटच्या जोरावर गुलाबाच्या वाईननिर्मितीचा एक उद्योग पुण्याजवळ उभारला. त्याचबरोबर गुलाबनिर्मितीसाठी काही एकर जमीन घेऊन गुलाबाची शेती फुलवली. याच शहरातील शुभांगी पाटील यांनी पतीसाठी एका वेगळ्या प्रकारचे सूप बनविले. त्यांच्या पतीला अपघात झाल्याने उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारातून काही घटक पोटात जाणे आवश्‍यक होते.

मांसाहारी पदार्थ टाळून हा पर्याय शोधायचा होता. शुभांगीताईंनी घरातच एक प्रयोगशाळा तयार करून संशोधन केले. त्यातून त्यांना ‘वॉलनट रागी’ सुपाचा शोध लागला. त्याद्वारे त्यांनी केवळ आपल्या पतीलाच बरे केले नाही, तर भारतातील सीमांवर कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांसाठीसुद्धा हा पौष्टिक पदार्थ उपयुक्त ठरला. या पदार्थाचे त्यांनी पेटंट घेतले. थोडक्यात महिलांना बौद्धिक संपदेची माहिती व महती कळली तर त्यांच्या बुद्धीतून अनेक आविष्कार निर्माण होतील आणि पेटंटची संख्या वाढू शकेल.

यापूर्वी अनेक महिलांनी आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर अनेक कल्याणकारी पदार्थांना जन्म दिला आहे. केवळ स्वयंपाकापुरते हे नाही. अगदी आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. भारतात स्त्रीला आपण शक्तीचे स्वरूप मानतो. खरे तर शक्ती आणि बुद्धी या दोन्हींतही स्त्रिया सरस कामगिरी करतात. प्रश्न आहे तो या सुप्त शक्तीला जागे करण्याचा. तसे केल्यास त्याचा त्या त्या व्यक्तींना, समाजाला आणि देशालाही फायदा होणार आहे.

तसे पाहता भारतासारख्या अनेक देशांत महिलांमधील बौद्धिकसंपदा विषयक जागरूकता निर्माण होत चालली आहे; पण तरीही त्याचे प्रमाण खूप कमी आहे. गेल्या दहा वर्षांत भारतातील महिला पेटंटधारकांच्या संख्येत केवळ तीन टक्क्यांनीच वाढ झाली होती. जगाचा विचार केला तर महिला संशोधकांच्या पेटंटची संख्या वीस टक्क्यांहून अधिक नाही. ही संख्या वाढावी, यादृष्टीने आता जगभर प्रयत्न होतील. त्यादृष्टीने आजच्या दिवसाचे महत्त्व विशेष आहे.

भारत सरकारनेही महिलांचे पेटंटअर्ज लवकरात लवकर विचारात घेऊन त्यावर निर्णय द्यावा, अशी तरतूद केली आहे. साधारण वर्षभरात हे काम मार्गी लावले जाते. विकसनशील देशात महिलांच्या ‘बौद्धिक संपदा’ अत्यल्प आहेतच. पण लक्षात घेण्याची बाब अशी की, विकसित देशातही पुरुषांच्या बौद्धिक संपदेच्या तुलनेत महिलांच्या नोंदी कमी आहेत. थोडक्यात जगातील महिलांच्या बौद्धिक संपत्तीचा टक्का वाढवून त्यांना बुद्धिजीवी घटक म्हणून व्यापक प्रमाणात अधिमान्यता मिळावी यासाठी यंदाच्या ‘बौद्धिक संपदा दिना’पासून प्रयत्नांना सुरुवात करायला हवी.

(लेखक बुद्धिसंपदा हक्क या विषयाचे अभ्यासक व अध्यापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT