Dravidi Culture Sakal
संपादकीय

तमिळी अस्मितेचं कार्ड

दाक्षिणात्य राजकारणाचा आत्मा हा व्यक्तिकेंद्री मानला जातो. प्रांतीय अस्मितेच्या जोरावर उभं राहिलेलं व्यक्तिस्तोम हे तेथील राजकीय व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण.

गोपाळ कुलकर्णी

दाक्षिणात्य राजकारणाचा आत्मा हा व्यक्तिकेंद्री मानला जातो. प्रांतीय अस्मितेच्या जोरावर उभं राहिलेलं व्यक्तिस्तोम हे तेथील राजकीय व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण.

प्रांतीय व भाषिक अस्मिता हेच ज्यांचं राजकीय भांडवल असतं, अशा प्रादेशिक पक्षांना सध्या तरी एका व्यक्तीच्या करिष्म्यावर उभं राहता येणं शक्य नाही, कारण आताचा काळ अण्णादुराई, जयललिता अथवा करुणनिधी यांचा नाही याचं भान स्टॅलिन यांना आहे. त्यांनी ‘द्रविड कार्ड’ पुढे आणण्याचा प्रयत्न चालवला आहे.

दाक्षिणात्य राजकारणाचा आत्मा हा व्यक्तिकेंद्री मानला जातो. प्रांतीय अस्मितेच्या जोरावर उभं राहिलेलं व्यक्तिस्तोम हे तेथील राजकीय व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण. आता याच भूमीत केंद्रीय सत्तेच्या महत्त्वाकांक्षांना आव्हान देणारी प्रादेशिक अस्मितेची पालवी नव्यानं बहरू लागली आहे. स्टॅलिन हे याचे कर्तेधर्ते. तसंही विरोधी आघाडीवर तेलंगणच्या केसीआर यांनी त्यांचा आवाज आधीच बुलंद केलाय. केरळच्या पी. विजयन याचं डावं वळण अजूनही संघ परिवाराला ओलांडता आलेलं नाही. राहता राहिला प्रश्न तमिळनाडूचा. तेथे सत्ताधाऱ्यांनी वैचारिक आयुधे धारदार करायला सुरुवात केली आहे. त्यांनी मूळ तमिळ संस्कृतीचं राजकीय आणि सामाजिक उत्खनन सुरू केलं आहे. द्रमुकचे नेते ए. राजा यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात केलेला द्रविडनाडूचा उल्लेख देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला. काय आहे तमिळी अस्मितेचं दक्षिणायन? ते कसं आकाराला येतंय? भाजपसारख्या बलाढ्य केंद्रीय सत्तेला आव्हान देण्यात ते कितपत यशस्वी होऊ शकतं? असे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चेला आले आहेत.

केंद्रीय पातळीवर अधिसत्ता गाजविणाऱ्या भाजपचं धोरण (विशेषतः मोदी- शहा पर्वात) हे नेहमीच प्रादेशिक पक्षांना दुय्यम स्थान देणारं ठरलं. जे आले त्यांना आपल्याच नियमानं सोबत घ्यायचं, जे विरोधात गेले त्यांचा थेट काटा काढायचा, असा हा सरळ राजकीय व्यवहार. त्यामुळं १९९८ मध्ये आकाराला आलेली भाजपप्रणीत `एनडीए’ आजमितीस तरी केवळ ‘भाजप एके भाजपच’ अशी दिसते. दक्षिणेत पाय रोवण्यासाठी भाजपनं येथेही ध्रुवीकरणाचा आधार घेतलेला दिसतो.

कर्नाटकमधील हिजाब वाद, त्याहीआधी केरळच्या अय्यप्पा स्वामींच्या मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा ही त्याची काही उदाहरणे. तमिळनाडूमध्ये जयललितापर्वाचा अस्त होताच पलानीस्वामी विरुद्ध पनीरसेल्वम यांच्या संघर्षात अडकलेला अण्णाद्रमुक भाजपच्या प्रेमात पडला खरा; पण त्यांना स्थानिक तमिळी जनतेनं नाकारलं. परिणामी २०२१च्या विधानसभा निवडणुकीत स्टॅलिन यांना मुसंडी मारता आली. प्रांतीय व भाषिक अस्मिता हेच ज्यांचं राजकीय भांडवल असतं, अशा प्रादेशिक पक्षांना सध्या तरी एका व्यक्तीच्या करिष्म्यावर उभं राहता येणं शक्य नाही, कारण आताचा काळ अण्णादुराई, जयललिता अथवा करुणनिधी यांचा नाही याचं नेमकं भान स्टॅलिन यांना आहे. भाजपच्या ध्रुवीकरणाच्या आक्रमक प्रचारतंत्राला तितक्याच ताकदीनं उत्तर द्यायचं यासाठी ते आग्रही दिसतात. त्यांनी थेट द्रविड अस्मितेचं कार्ड पुढे केलंय.

पेरियार हेच प्रेरणास्थान

खरंतर या द्रविडनाडूचे मूळ उद्गाते हे ई. व्ही. रामास्वामी पेरियार हे होत. उत्तर भारतीय हिंदी भाषक प्रभुत्वाला नाकारण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम ‘तमिळींसाठी तमिळनाडू’ ही संकल्पना १९३७मध्ये मांडली. यामागे राजकीय आत्मसन्मानाचा मुद्दा होता. तमिळ, मल्याळी, तेलुगू व कन्नड भाषकांचा ‘द्रविडनाडू’ अशी ती मांडणी होती. त्यासाठी ‘द्रविड कळघम’ ही राजकीय चळवळ सुरू झाली. जात आणि धर्मविरोधाबरोबरच उत्तर भारतीय वर्चस्व झुगारून लावणं, हा त्यामागचा उद्देश होता.

पुढे यातून सी.एन.अण्णादुराई यांचं नेतृत्व आकाराला आलं. कालांतरानं अण्णादुराई यांनी द्रमुकची स्थापना करून राजकारणात प्रवेश केला. तर पेरियार यांनी ही वाट नाकारली. द्रमुक जसजसा मूळ प्रवाहामध्ये प्रस्थापित होत गेला, तसतशी ‘द्रविडनाडू’ची मागणीही मागे पडत गेली. १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर अण्णादुराई यांनी स्वतंत्र द्रविडनाडूचा अट्टहास सोडला. खरंतर भाषावर प्रांतरचना झाल्यानंतरच पेरियार यांनाही या मागणीतील फोलपणा लक्षात आला होता. पण यामुळंच पुढं तमिळ अस्मिता आणि प्रादेशिक राजकारण धारदार बनत गेलं. जयललिता असो किंवा करूणानिधी; यांच्यामागील राजकीय तेजोवलयामध्ये तमिळ अस्मितेचं स्थान मोठं आहे. कदाचित म्हणूनच असेल आतापर्यंत दिल्लीचं नेतृत्व त्यांच्यासमोर फिकं वाटायचं. करूणानिधींनी या द्रविडी राजकारणाचं नेतृत्व समर्थपणे सांभाळलं. त्यांच्याच मुशीत तयार झालेले स्टॅलिन तो वारसा पुढे नेताना दिसतात.

सांस्कृतिक उत्खनन

सध्या राजकीय व्यवहाराची गणितं बदलली आहेत. प्रबळ नेतृत्व, आक्रमक केंद्रीय सत्ता, ध्रुवीकरणाची रणनीती यामुळे प्रादेशिक पक्षांच्या गडांना तडे जाऊ लागले. आपली तटबंदी अधिक बळकट करावी लागणार हे स्टॅलिन यांच्यासारख्या मुत्सद्दी नेत्यानं ओळखलं. त्यांनी तमिळ संस्कृतीची साडेतीन हजार वर्षांपूर्वीची पाळंमुळं शोधायला सुरुवात केली.

गौरवशाली तमिळ संस्कृतीचं दर्शन घडविण्यासाठी तिरूनेलवेल्लीमध्ये पंधरा कोटी रुपये खर्च करून एक संग्रहालय उभं केलं जात आहे. यासाठीच परदेशात (इंडोनेशिया) आणि शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत उत्खनन करण्यात येणार आहे. यातूनच प्राचीन तमिळ ब्राह्मी लिपीचं इजिप्तपर्यंतचं कनेक्शन शोधून काढण्यात आली. संगम काळाच्या सुवर्णखुणा उगाचच स्टॅलिन यांना खुणावत नाहीत. हेच संशोधन पुढे राज्यकारभारामध्ये उतरविण्याचा त्यांचा विचार दिसतो. प्राचीन तमिळी मॉडेल हे राज्यकारभाराचं तंत्र बनविण्याचा त्यामागचा विचार आहे. यातूनच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अशी तिहेरी उद्दिष्टे गाठण्यासाठी स्टॅलिन आग्रही आहेत. त्याचा हेतू हा निव्वळ राजकीय सुडाची परतफेड असा राहता कामा नये; त्यातून संस्कृतीच्या पाऊलखुणा ठळक झाल्या तर मात्र ते स्वागतार्ह ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT