रंग माझा वेगळा... sakal
संपादकीय

रंग माझा वेगळा...

‘डॉ. रा.चिं.ढेरे संस्कृती संशोधन ट्रस्ट’ व ‘राजहंस प्रकाशन’ यांच्या सहयोगाने दिला जाणारा ‘श्रीगमा पुरस्कार’ यंदा राजीव साने यांना ३१ जुलै रोजी प्रदान करण्यात येणार आहे. हे औचित्य साधून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनकार्याची आणि वैचारिकतेची ही ओळख.

सकाळ वृत्तसेवा

वैचारिक क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल

‘डॉ. रा.चिं.ढेरे संस्कृती संशोधन ट्रस्ट’ व ‘राजहंस प्रकाशन’ यांच्या सहयोगाने दिला जाणारा ‘श्रीगमा पुरस्कार’ यंदा राजीव साने यांना ३१ जुलै रोजी प्रदान करण्यात येणार आहे. हे औचित्य साधून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनकार्याची आणि वैचारिकतेची ही ओळख.

- डॉ. अजय ब्रह्मनाळकर

विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले राजीव साने स्वेच्छेने विद्यापीठीय चौकटीत अडकले नाहीत. आयुष्यभर फ्री लान्स आंतरविद्याशाखीय अभ्यासक राहिले. आपल्या विचारात कुंठितता येऊ देणे उपयोगाचे नाही; वैचारिक परंपरा जाणून घेतल्या पाहिजेत; परंतु, आपले तत्त्वज्ञान हे आपणच घडवले पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता. त्याप्रमाणे त्यांनी आपले तत्त्वज्ञान घडवले आणि आपल्यापुढे मांडले. म्हणूनच तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्रा. मे.पुं. रेगे यांनी ‘राजीव फिलोसॉफी करतो’ असे प्रशस्तिपत्र त्यांना दिले होते.

राजीव साने

राजीव साने यांचा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास आहे. पन्नास वर्षांपूर्वी सर्वच विचारकांना मार्क्सवादाची गुटी पाजली जात असे. साने यांनाही ती बक्कळ मिळाली होती. ते त्या गटात काहीकाळ सक्रिय देखील होते. परंतु आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची कालसुसंगत उत्तरे शोधायची तर आपली विचार चौकटही कालसुसंगत असायला हवी, हा शोध त्यांना लवकरच लागला. त्यानंतर कुठल्याही गटात सामील न राहता, स्वतःची प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या साहाय्याने तात्त्विक, सामाजिक, आर्थिक प्रश्नांचा ते मागोवा घेऊ लागले. ‘साप्ताहिक सकाळ’ मधून १९९५ मध्ये ‘मर्मजिज्ञासा’ आणि १९९६ मध्ये ‘युगांतर’ या लेखमालेतून ते आपल्यासमोर आले. पुढे युगांतर, नवपार्थ हृद्गत, गल्लत गफलत गहजब ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली. या तीनही पुस्तकांना राज्यपुरस्कार मिळाले. नुकतेच ‘स्फूर्तिवादी नीतिशास्त्र’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

साने मानवी स्वातंत्र्याला सर्वोच्च मूल्य मानतात; आणि अहिंसा, समृद्धी व न्याय ही मूल्ये स्वातंत्र्याला अनुक्रमे समावेशकता, अवकाश आणि उत्तरदायित्व प्रदान करतात, असे त्यांचे म्हणणे. वास्तविक समता या मान्यताप्राप्त मूल्याचे बाळकडू साने यांना मिळाले होते. परंतु शासक आणि शासित हे कधीही समान असू शकत नाहीत. दमनकारी यंत्रणेशिवाय समता व्यवहारात शक्य होत नाही आणि समता हे मूल्य स्वातंत्र्य या मूल्याच्या मुळावरच येते, हे पेच त्यांच्या लक्षात आले. समृद्धीला मूल्य म्हणून प्रस्थापित केल्याशिवाय ना अहिंसा व्यवहारात शक्य आहे, ना न्याय, ही तर्कसंगत गोष्टदेखील त्यांच्या लक्षात आली. ते तशी मांडणी करू लागले. ती करताना मार्क्सवादाची झूल त्यांना अंगावरून उतरवावी लागली; त्यासाठी स्वतःशीही झगडावे लागले. हा झगडा वेदनादायक असतो, असे त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे. परंतु त्या वेदना त्यांनी सोसल्या आणि स्वतःस जे पटते, त्याची मांडणी करण्याची स्वतंत्र वाटचाल चालू ठेवली.

लोकाभिमुख तत्त्वज्ञान

जीएंनी तत्त्वज्ञानाला देहधारी केले, असे ग.प्र. प्रधान यांनी म्हटले होते. राजीव साने यांनी तत्त्वज्ञान लोकाभिमुख केले, असे म्हणता येईल. घटपटादी खटपटीत अडकलेले तत्त्वज्ञान साने यांनी आम जनतेसाठी मोकळे केले. फुटका तळ असलेला हौद भरण्याची गणिते बऱ्याच जणांना लहानपणी अप्रस्तुत वाटतात; तसेच तत्त्वज्ञान अप्रस्तुत वाटते. परंतु सान्यांनी रोजच्या जीवनातील प्रश्न घेतले, त्यांत दडलेल्या तात्त्विक मुद्द्यांवर खुसखुशीत शैलीत लिखाण केले, त्यामुळे दूरचे भासणारे तत्त्वज्ञान वाचकांच्या जवळ गेले. सान्यांच्या मते ‘विचारव्यूहांची शास्त्रीय परिभाषेत मांडणी करणे सर्वांना जरी जमले नाही, तरी अनेकांच्या डोक्यात विचारव्यूह असतात, त्याआधारे आपल्या परीने ते गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करत असतात’. आधुनिक काळात विचारव्यूह कलह वाढल्याने प्रश्नांची उकल साधणे सामान्यांसाठी दुष्कर होऊन जाते. परंतु साने आपल्या लेखनातून वाचकांच्या विचारव्यूहांतील कलह कमी करत नेतात. ते करण्याची त्यांची शैली खुसखुशीत आहे. त्यांच्या तात्त्विक लेखनालाही लोकप्रियता मिळाली हे त्यांचे मोठेच यश आहे. मात्र शैलीचा खुमासदारपणा राखताना मांडणीतील काटेकोरपणा, तर्ककठोरता ते कुठेही सोडत नाहीत. त्यामुळे त्यांचे लेखन वाचनीय झाले तरी आवश्यक ती गंभीरता राखते. शब्दांना अनेक छटा चिकटलेल्या असतात. आपले म्हणणे नेमके आणि टोकदार करण्यासाठी आपण वापरत आहोत, तो शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा किंवा कोणत्या अर्थाने घ्यायचा नाही, असे म्हणताना साने जास्तच किचकटपणा करतात, असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. परंतु, नैसर्गिक या शब्दाचे, ‘भौतिकदृष्ट्या संतुलित, स्वभावदत्त, अकृत्रिम आणि अविकृत असे, चार वेगवेगळे अर्थ असताना त्यांतील नेमका कुठला अभिप्रेत आहे ते स्पष्ट न करता वाद घातला की युक्तिवाद ‘स्क्यू’ होतात आणि त्यातून निष्पन्न काहीच होत नाही, हे त्यांचे म्हणणे कोणालाही पटावे असेच आहे. नीती-रीतीची गुंफण समजावताना ते म्हणतात, ‘युद्ध जिंकण्यासाठी केली जाणारी व्यूहरचना याला ‘रणनीती’ म्हटले जाते ते चूक आहे. ती ‘रणरीती’ आहे. ‘रेडक्रॉस’च्या लोकांवर किंवा नागरी वस्तीवर दोन्ही पक्षांनी हल्ले करायचे नाहीत ही रणनीती आहे’.

प्रगती-उन्नती यांतील नाते

नीती-रिती यांतील गल्लत समजली की बरेच निरर्थक वाद आपण घालत होतो, हे कळते आणि आपल्या डोक्यात लख्ख प्रकाश पडल्याचा फील येतो. नीती-रीती, भोक्ता-स्रष्टा, प्रगती-उन्नती, अशा अनेक द्वंद्वात्मक जोड्यांची त्यांनी उकल करून दाखवलेली आहे. प्रगती (भौतिक) उन्नती (नैतिक) यांतील नाते उलगडताना ते चक्क ‘क्ष’ आणि ‘य’ अक्षांचा काटकोन वापरतात. त्याने प्रगती आणि उन्नती यांचे नाते चटकन आपल्या डोळ्यासमोर येते. प्रगती झाली की उन्नती आपोआप होणार नाही हे कळते; परंतु, प्रगती झाल्याशिवाय उन्नतीसाठी अवकाश खुला होणार नाही, हेही उमगते. साने यांनी हाताळलेले विषय आपल्या आयुष्याशी निगडित असतात; त्यांत दडलेले तात्त्विक मुद्दे उलगडण्याची त्यांची पद्धत अनोखी असते; त्यामुळे, साने यांचे लेखन तत्त्वज्ञानाचा अभ्यास नसलेल्यांनादेखील आपलेसे वाटते. ‘नवपार्थ हृद्‍गत - एक आधुनिकतावादी गीताचिंतन’ या भगवद्‍गीतेवरील टीकाग्रंथात नवा पार्थ हा आधुनिक काळांतील जाणीवांनिशी भगवान श्रीकृष्णांशी संवाद साधतो आहे, अशी कल्पना केलेली आहे. ग्रंथात मूळ गीतावचन देऊन नवपार्थाने त्याच्या तत्त्वदृष्टीतून त्यावर दिलेला अनुसाद, आक्षेप घेणारा प्रतिसाद आणि लेखकाचा स्वयंसाद अशा वृत्तबद्ध पद्यरचना केलेल्या आहेत. संक्षेपाने गद्य निरुपणदेखील केले आहे. या ग्रंथाचे स्वागत गीता शिरोधार्य मानणाऱ्यांनी देखील केले, हे साने यांचे अपूर्व यश आहे.

(कै.) रा.चिं. ढेरे यांनी विद्यापीठीय चौकटीच्या बाहेर राहून आयुष्यभर संशोधन केले. त्यांच्या नावाने चालणाऱ्या ट्रस्टतर्फे आणि सर्वच विचारसरणींविषयी मोकळी, उदार दृष्टी बाळगणाऱ्या श्री.ग. माजगावकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार राजीव साने यांच्यासारख्या ‘रंग माझा वेगळा’ असलेल्या तत्त्वज्ञाला मिळतो आहे, यात मोठे औचित्य आहे. योग्य व्यक्तीला, योग्य पुरस्कार मिळणे ही गोष्ट दुर्मिळ. हा पुरस्कार तसा असल्याने आनंद देणारा आहे.

लेखक वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिस करतात;

आणि विविध विषयांचे अभ्यासक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT