नअस्कार! वाचकहो, पुणे हे विद्येचं माहेरघर आणि आपली सांस्कृतिक राजधानी आहे. मुंबई ही राजधानी असून नागपूर ही उपराजधानी आहे. डोंबिवली आणि विले पार्ले या दोन्ही महाराष्ट्राच्या वादातीत उपराजधान्या आहेत. काही मुंबईकरांच्या मते दादरचा शिवाजी पार्कचा दीड बाय अर्धा किलोमीटरचा परिसर येवढीच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित व्हावा.
भले! मला विचाराल तर सध्या तरी हा मान पार्ल्याला द्यायला हवा. कारण पार्ल्यात गल्लोगल्ली सांस्कृतिकता भरलेली आहे. माझंच मेलीचं कोथरुड सोडून कुठं जाणं होत नाही. गेल्या आठवड्यात मात्र पार्ल्याला गेले, आणि ‘पुण्यात काय आहे?’ असा प्रश्न पडला.
निमित्त होतं डॉक्टरांची अपॉइण्टमेंट! आमचे फॅमिली डॉक्टर सुहास पिंगळे पार्ल्यात राहतात. असंख्य पार्लेकरांच्या पडजीभा बघून झाल्यानंतर त्यांनी पार्ल्यातील सांस्कृतिक आरोग्याची काळजी वाहायला सुरवात केली आहे. दरसाल एक सांस्कृतिक कार्यक्रम ते स्वखर्चानं करतात. (पुणेकर्स...प्लीज नोट!) औंदा त्यांनी गोरेगावचे एआर रेहमान आणि ‘अभिमानगीत’फेम थोर संगीतकार कौशल इनामदार यांना (साथीदारांसह) निमंत्रित केलं होतं.
ॲक्चुअली, एआर रहमान यांनाच चेन्नईचे इनामदार असं म्हणतात म्हणे! कारण कौशलनं केलेलं आणि प्रचंड गाजलेलं ‘मराठी अभिमान गीत’ ऐकून रहमान यांनीही ‘तमीळ अभिमान गीत’ तयार केलं. जय हो!!
...तर साठ्ये कॉलेजच्या शानदार सभागृहात डॉ. पिंगळ्यांच्या निवडक शे-दीडशे माजी पेशंटांसमोर कौशल इनामदार यांनी ‘इनामदारी’ हा कार्यक्रम सादर केला. डॉक्टर पिंगळे दारातच स्वागताला उभे होते. कमरेच्या पाऊचमधून पटकन टॉर्च काढून ‘जीभ दाखवा’ म्हणतात की काय, अशी भीती वाटली. पण ते जाऊ दे. बाकी मराठी कवितांना चाली लावाव्यात तर कौशलनंच.
चाल कशी सुचते? चाल कशाला लावावी? गाणं कसं तयार होतं? चोरी कुठली, आणि प्रेरणा कुठली? अशा बऱ्याच गोष्टी गप्पांच्या ओघात सांगून टाकत कौशल इनामदारांनी काही गोडगोड गाणी सादर केली. हे म्हंजे थोडं स्ट्रॉबेरी अँड क्रीमसारखं होतं. स्ट्रॉबेऱ्या खाताना, आइस्क्रीमचा लपका हवासा वाटतो, आणि आइस्क्रीम खाताना स्ट्रॉबेऱ्या ऱ्हायल्या, याची आठवण होते...
‘चाल कशाला लावावी? चाल कश्शालाही लावावी! चाल पोस्टकार्डाला लावावी, टाइम्स ऑफ इंडियाच्या हेडलाइनीला लावावी, दैनिकात छापलेल्या निविदा सूचनेला लावावी, किंवा अगदी सरकारी कचेरीतील सूचनांनाही लावावी...’’असं कौशलनं सांगितलं. उदाहरणादाखल विमानातल्या ‘बैठे हुए कुर्सी की पेटी बांधे रखिए’ या चोवीस मात्रा होत असल्याने चाल लागते, हे सिद्ध करुन दाखवलंन! कम्मॉलच बाई!!
अमृतातें पैजा जिंकणारी आपली भाषा, पण मग कुसुमाग्रज, मर्ढेकर, विंदा, पाडगाकर यांच्या रचना व्हिएन्नाला जाऊन आंतरराष्ट्रीय वाद्यमेळासहित का नाही कुणी सादर केल्या? आपली भाषा जगाला परिचित करुन द्यायची तर मागे राहून कसं चालेल? असे वैश्विक प्रश्न उपस्थित करत, कौशलनं स्वत:च आपण या कार्यात उतरणार असल्याचं जाहीर करुन टाकलं.
प्रागच्या फिलहार्मनिक वाद्यवृंदाकडून थोर वृंदनिर्देशक फ्रीडमन रिहली कौशलनं संगीतबद्ध केलेली एखादी नलेश पाटीलची कविता सादर करत आहेत, असं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. पुढल्या स्वित्झर्लंडच्या डावोसमधल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मराठी अभिमान गीत वाजलं तर दचकू नका हं! शक्यता दाट आहे. कौशलच्या या महाप्रकल्पाला साथ देणं आपल्या सगळ्या मराठी माणसांचं कर्तव्य आहे.
कौशल इनामदार यांची ‘इनामदारी’ अशीच वाजतगाजत राहो, हीच सदिच्छा.
‘योग: कर्मसु कौशलम’ असं गीतेत म्हटलंच आहे. म्हणजे पार्ल्यात कौशल (इनामदार) भेटले हा आमचा योग, आणि त्यांचं कर्म! असो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.