thanjavur painting sakal
संपादकीय

भाष्य : बौद्धिक संपत्तीतील गुंतवणूक

बौद्धिक संपदेवरील गुंतवणूक जवळपास तीन पटींनी वाढल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या विशेष विभागाने एका ताज्या अहवालात नमूद केले आहे.

प्रा. गणेश हिंगमिरे

बौद्धिक संपदेवरील गुंतवणूक जवळपास तीन पटींनी वाढल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या विशेष विभागाने एका ताज्या अहवालात नमूद केले आहे. या गुंतवणूकप्रकाराकडे व्यक्ती आणि कंपन्याही का वळत आहेत, याची माहिती करून घ्यायला हवी.

संयुक्त राष्ट्रांच्या एका विशेष विभागाने २५ जूनला एक अहवाल सादर केला. त्यात बौद्धिक संपदेवरील गुंतवणूक जवळपास तीन पटींनी वाढल्याचे सांगण्यात आले. विशेष करून पहिल्यांदाच अमेरिका, जर्मनी, इटली, जपान या प्रगत राष्ट्रांच्या रांगेत भारताला बौद्धिक संपदेतील गुंतवणुकीवरील प्रगतीच्या अनुषंगाने खास स्थान मिळाले.

गुंतवणुकीतून संपत्ती किंवा संपत्तीवर गुंतवणूक हा विषय एखाद्या व्यक्तीसाठी किंवा देशासाठी महत्त्वाचे समीकरण असते. सर्वसाधारण व्यक्ती सोन्यामध्ये किंवा जागेमध्ये किंवा शेअरमध्ये गुंतवणूक करून पैशातून पैसा मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. त्यात त्याला दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत परतावा मिळावा, ही अपेक्षा असते; पण त्याचवेळेला कंपन्या आणि विशेष करून बलाढ्य कंपन्या वेगवेगळ्या प्रकाराने आपली शक्कल लढवत परतावा २५ ते १०० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक कसा मिळवता येईल, या अनुषंगाने गुंतवणूक करत असतात.

पूर्वी अशा कंपन्या विशेष करून प्रकल्पांत गुंतवणूक करून नफा मिळवायच्या. आता या कंपन्यांचा कल ‘बौद्धिक संपदे’मध्ये गुंतवणुकी करण्याकडे वाढला आहे, असे जीनिव्हास्थित संयुक्त राष्ट्रांच्या संबंधित विभागातर्फे जाहीर अहवालात नमूद करण्यात आले आहे.

केवळ कंपन्याच नव्हे तर अनेक व्यक्तींना बौद्धिक संपदेमधील गुंतवणुकीत तीनपट फायदा झाला असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. भारताचे नाव जरी या अहवालात गुंतवणूक वाढविलेल्या देशांच्या यादीत घेतले असले तरी प्रत्यक्ष गुंतवणुकीचे गुणोत्तर हे अत्यल्प आहे.

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा प्रकारची गुंतवणूक करता येते, याची आपल्याकडे अनेकांना माहिती नाही. गुंतवणूकदारांचा फायदा तसेच ज्या कंपनीमध्ये किंवा व्यक्तीमध्ये गुंतवणूक केली त्याचाही फायदा, असा दुहेरी फायदा देणारी बौद्धिक संपत्तीतील गुंतवणूक सर्वांना माहीत होणे गरजेचे झाले आहे, 

बौद्धिकसंपदा म्हणजे बुद्धीतून निर्माण झालेली संपत्ती, असे मानले जाते, तर बौद्धिक संपत्तीचे अनेक प्रकार कायद्याअंतर्गत गृहीत धरले गेले आहेत. त्यामध्ये सर्वज्ञात पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, डिझाईन आणि जीआय म्हणजे ‘जिऑग्राफिकल इंडिकेशन’ हे आहेत. मानवी बुद्धीतून निर्माण झालेल्या या वेगवेगळ्या घटकांना कायद्याच्या चौकटीत वस्तुनिहाय संरक्षण देण्यात आले आहे.

म्हणजे एखाद्या व्यक्तीने नवीन पदार्थ बनवलेला असेल तर त्याला पेटंट मिळू शकते आणि त्या पदार्थाला त्याने एक वेगळे नाव देऊन बाजारात विक्रीस ठेवले तर त्याला व्यापारचिन्ह (‘ट्रेडमार्क’) मिळू शकते व त्याच पदार्थासाठी त्यांनी एखाद्या माहितीपत्रक बनविले तर त्यासाठी त्याला कॉपीराईट मिळू शकते.

थोडक्यात बौद्धिकसंपदा या एकाच पदार्थांमध्ये अनेक स्वरूपात उपलब्ध असू शकतात. अशा बौद्धिक संपदा निर्माण करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करीत आहेत, असे नुकताच प्रकाशित झालेला अहवाल नमूद करतो.

‘तंजावर पेंटिंग’ची कहाणी

वास्तवात बौद्धिक संपदेमधील गुंतवणूक भारतात तशी नवीन नाही. पूर्वी अनेक राजे मंडळी संशोधकाला नवीन संशोधन करून जनहितासाठी पदार्थ बनवण्याकरीता गुंतवणुकीद्वारे प्रोत्साहन देत असत; तसेच ते अनेक चित्रकारांना उत्तम मोबदला ठरवून आपले तैलचित्र काढून घेत असत.

त्याचबरोबर एखाद्या समूहाच्या कारागिरीलाही आपल्या पूर्वजांनी गुंतवणुकीच्या माध्यमातून केवळ जिवंत ठेवले नाही तर त्याचा प्रसार केला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘तंजावर पेंटिंग’ हे घेता येईल. यामध्ये भोसले घराण्यांनी या कलेला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या माध्यमातून अजरामर केले. आज तंजावर पेंटिंगची ‘जीआय’ नोंद झाली आहे आणि अनेक महत्त्वाच्या दालनामध्ये ‘तंजावर पेंटिंग’ आपले नाव कोरून आहे.

ही तंजावर पेंटिंग आता हजारो रुपयांना विकली जात आहे. सदर पेंटिंगला जी आय (GI) ही बौद्धिक संपदा मिळाल्यामुळे इतर कोणालाही पेंटिंगला ‘तंजावर पेंटिंग’ म्हणता येणार नाही. थोडक्यात त्याचे मोल अधिक वाढले आहे. ही किमया भोसले राजघराण्याने केलेल्या गुंतवणुकीतून झाली.अशाच प्रकारे ‘पेटंट’ ही बौद्धिक संपदा लागलीच मोठा परतावा देऊ शकते.

आपल्या इथे एक ‘दे धक्का’ नावाचा चित्रपट येऊन गेला. त्यात नायकाचा मित्र त्याच्या पेटंटसाठी कोट्यवधी रुपये मिळवून देतो व त्याची गेलेली जमीन त्याला परत मिळते. शिवाय आर्थिक समृद्धीही निर्माण होते. ‘ओम जय जगदीश हरे’ असा सिनेमा होता.

एकत्र कुटुंबाला परिस्थितीअभावी आपले घर विकायची वेळ येते, तेव्हा नायकाच्या भावाला ‘कार डिझाइन’ या बौद्धिक संपदेमुळे कोट्यवधी रुपये मिळतात, असे त्यात दाखवले आहे. ‘कॉपीराईट’सारख्या बौद्धिक संपदेने जगभरात आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. हॅरी पॉटर या पुस्तकाच्या लेखिकेचे उत्पन्न आज तिच्याकडे असलेल्या कॉपीराईटच्या अधिकारामुळे ब्रिटनच्या राणीपेक्षा जास्त आहे.

परकी गुंतवणुकीला चालना

बौद्धिक संपदेमधील गुंतवणूक ही स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीपेक्षा अधिक फायदेशीर असल्याचे अनेक दाखले सापडतात. एखाद्याने भारतात स्थावर मालमत्तेत गुंतवणूक केली असल्यास त्याला काही मर्यादा येतात. त्याला ती आपली जमीन किंवा फ्लॅट ही स्थावर मालमत्ता इतर ठिकाणी घेऊन जाता येत नाही.

ती त्या भागातच स्थिरस्थावर असते व कालानुरूप त्याचा परतावा एका मर्यादेपर्यंत मिळतो. पण बौद्धिक संपदेच्या बाबतीत तसे नसते. ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येते. म्हणजे भारतात मिळालेल्या पेटंटला अमेरिकेतही घेऊन जाता येते व तिथेही एकाधिकार प्राप्त होऊ शकतो व त्याला योग्य बाजारसदृश मोबदला मिळू शकतो.

संसदेमध्ये जाहीर झालेला बौद्धिक संपदाविषयक अहवाल असे सांगतो की, भारतात जर एक टक्का पेटंटवाढ झाली, तर सहा टक्के परकी गुंतवणूक वाढू शकते. तसेच एक टक्का कॉपीराईट नोंदणीमध्ये वाढ झाल्यास सात टक्क्यापर्यंत परकी गुंतवणूक वाढू शकते. अशा प्रकारच्या गुंतवणुकीला चालना विकसित देशात मोठ्या प्रमाणात मिळत आहे. तशी ती भारतात मिळाल्यास सर्वसामान्यांपासून देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख नक्कीच उंचावेल.

(लेखक ‘बुद्धिसंपदा हक्क’ या विषयाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मानखुर्द शिवाजीनगर इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक पराभूत

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मागाठाणे विधानसभा मतदार संघातून प्रकाश सुर्वेंची हॅट्रिक

Malshiras Assembly Election 2024 Result Live: उत्तम जानकरांचा विजय, राम सातपुतेंना मतदारांचा गुलीगत धोका!

MNS Failed In Assembly Elections: मनसेच्या पराभवाचं 'राज' काय?, अमित ठाकरेंसह राजू पाटीलही पराभूत, मनसेचा धुव्वा

IND vs AUS, 1st Test: यशस्वी जैस्वाल शतकाच्या उंबरठ्यावर, केएल राहुलचीही फिफ्टी! भारताकडे भक्कम आघाडी

SCROLL FOR NEXT