Missile debris sakal
संपादकीय

भाष्य : इराण, इस्राईलचा लष्करी जुगार

इतिहासात प्रथमच असे घडले असेल की, आपली क्षेपणास्त्रे अडवली जाणार हे माहीत असताना इराणकडून त्यांचा मारा केला गेला.

अजेय लेले

इतिहासात प्रथमच असे घडले असेल की, आपली क्षेपणास्त्रे अडवली जाणार हे माहीत असताना इराणकडून त्यांचा मारा केला गेला. मोठ्या युद्धाची कोणाचीच इच्छा दिसत नाही. मग तरीही इराण व इस्राईल हा धोकादायक जुगार का खेळले, हा प्रश्न आहे.

इराण आणि इस्राईलमधील संघर्षाकडे जगाच्या नजरा खिळल्या. याचे कारण यातून घडणारे उत्पात सर्वंकष स्वरूपाचे झाले असते. खरे तर कोणालाच आता युद्ध नको आहे; परंतु या दोन देशांनी एकप्रकारे लष्करी जुगारच खेळला. त्यातून जे नाट्य समोर आले, त्यात जगाचे लक्ष गुंतलेले असताना इस्राईल गाझा पट्टीतील हल्ले अधिक तीव्र करण्याची शक्यता व्यक्त होत होती आणि तसेच झाल्याचे दिसते.

इस्राईल व इराणमध्ये जो काही संघर्ष घडला, त्यात या दोन्ही देशांचा एकमेकांच्या हवाई संरक्षणयंत्रणेवर आणि क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेवर किती विश्वास आहे, हे पाहायला मिळाले! युद्धाच्या इतिहासात प्रथमच असे घडले असेल की, आपली क्षेपणास्त्रे अडवली जाणार हे माहीत असताना त्यांचा मारा केला गेला.

या सगळ्याची सुरुवात एक एप्रिल २०२४ रोजी जेव्हा इस्राईलने सीरियातील दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर हवाई हल्ला केला तेव्हा झाली. या हल्ल्यात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे (आयआरजीसी) सात अधिकारी मृत्युमुखी पडले. यामध्ये दोन वरिष्ठ कमांडरदेखील मारले गेले. यानंतर इराणने या हल्ल्याचा सूड घेतला जाईल, असे जाहीर केले.

इराणच्या ‘आयआरजीसी’ने १३ एप्रिल २०२४ रोजी लेबनानच्या हिज्बुल्ला आणि येमनच्या हौथी बंडखोर गटाच्या मदतीने इस्राईलवर ड्रोनच्या साहाय्याने क्रूझ आणि बॅलेस्टिक मिसाईल डागली. सुमारे १७० ड्रोनच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला आणि ३० क्रूझ व १२० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इराणने या हल्ल्याला ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस’ असे नाव दिले होते.

या हल्ल्याबाबत इराणने पुरेसे पूर्वसंकेत दिले होते. त्यामुळेच हा हल्ला होण्याआधी येथील काही देशांनी त्यांची हवाई हद्द विमानाच्या उड्डाणासाठी बंद केली होती. त्याचप्रमाणे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जॉर्डन यांनी त्यांच्या हवाई दलाला इस्राईलला साहाय्य करण्याचे आदेश दिले होते. तसेच कोणत्याही हवाई हालचाली टिपण्यासाठी नौदलाच्या मदतीने रडार यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली होती.

इस्राईलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हा क्षेपणास्त्रहल्ला परतवून लावण्यात सर्वात मोठी भूमिका बजावत जवळपास ९९ टक्के हल्ले परतवून लावले. या हल्ल्यानंतर, इराणच्या नऊ क्षेपणास्त्रांनी इस्राईलचे दोन हवाई तळ उद्‌ध्वस्त केल्याचे स्पष्ट झाले असले तरी या हल्ल्यात कोणतीही मोठी हानी झालेली नाही. त्यानंतर १९ एप्रिल २०२४ रोजी इस्राईलकडून इराणवर हल्ला करण्यात आला.

हा हल्ला फारसा तीव्र नसून केवळ एक प्रतिक्रियात्मक संदेश देण्यासाठी केला गेला होता, असे मानले जाते. इराणच्या इस्फहान या प्रदेशावर इस्राईलकडून एक क्षेपणास्त्र डागत छोटासा हल्ला करण्यात आला. याच प्रदेशात इराणचे अणुसंशोधन केंद्र आहे. दरम्यान, हा हल्ला क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने यशस्वीपणे परतवून लावल्याचा दावा इराणच्या वतीने करण्यात आला.

या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर एक बाब ठळकपणे पुढे आली आणि ती म्हणजे परस्परांचे शेजारी असणाऱ्या दोन्ही देशांना एकमेकांशी थेट निर्णायक युद्ध लढण्यात रस नाही. तर एकमेकांना कठोर संदेश देण्याच्या आणि परस्परांवर वर्चस्व गाजविण्याच्या या साहसी खेळात हे दोन्ही देश अवाजवी धोका पत्करत आहेत.

इराणकडून करण्यात आलेला हवाईहल्ला जरी खूप मोठा असला तरीदेखील इस्राईलच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेकडून हा हल्ला यशस्वीपणे परतवून लावण्यात येईल आणि या हल्ल्यातून फार मोठे नुकसान होणार नाही, याची कल्पना इराणला असावी.

अर्थात इस्राईलची क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा कितपत काम करते, हे तपासण्याइतकाच हा हल्ला मर्यादित आणि छोटा मात्र नक्कीच नव्हता. त्याचप्रमाणे आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास पाश्चात्त्य देश येथे लष्करी मदत पाठवतील की नाही याचीही चाचपणी करण्यासाठी या हल्ल्याची इराणला नक्कीच मदत झाली. युक्रेनला केली जात आहे त्याप्रमाणे अप्रत्यक्ष मदत करण्याऐवजी अमेरिका आणि मित्रदेश हे इस्राईलला थेट लष्करी मदत करतील, हेही इराणला आता कळून चुकले आहे.

या हल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इराणने केलेला हल्ला आणि इस्राईलने दिलेले प्रत्युत्तर या दोघांचेही स्वरूप अत्यंत वेगळे होते. इस्राईलवर यावेळी करण्यात आलेले हल्ले हे बहुतांश इराणच्या भूमीतून करण्यात आले होते. तर हिज्बुल्लाने गोलन टेकड्यांच्या भागात इस्राईलच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला. याशिवाय इराक, सीरिया आणि येमेनमधून इस्राईलवर ड्रोनहल्ले करण्यात आले. दुसरीकडे इस्राईलची बहुस्तरीय हवाई संरक्षण यंत्रणा हे सर्व हल्ले परतवून लावण्यात यशस्वी ठरली.

इस्राईलकडे प्रामुख्याने आयर्न डोम, डेव्हिड्स स्लिंग आणि ‘ॲरो- २’ व ‘ॲरो-३’ या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा आहेत. यापैकी ‘आयर्न डोम’ ही सर्वात प्रसिद्ध असून या यंत्रणेच्या माध्यमातून लहान पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला अवकाशात नष्ट करता येते.

सुमारे एका दशकाहून अधिक काळ इस्राईलवर ‘हमास’ किंवा हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनांकडून लहान पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत असून ही क्षेपणास्त्रे आकाशातच नष्ट करण्यात ‘आयर्न डोम’ यंत्रणेला ९९ टक्के यश आले आहे. ‘डेव्हिड्स स्लिंग’ ही यंत्रणा लहान ते मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला नष्ट करण्यात उपयोगी येते. तर ‘ॲरो’ ही यंत्रणा मध्यम ते दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना नष्ट करते.

तेरा एप्रिल रोजी करण्यात आलेला हल्ला इतिहासातील सर्वात मोठा ड्रोनहल्ला म्हणून गणला जाऊ शकतो. मात्र असे असतानाही हा हल्ला परतवून लावण्यात इस्राईलला यश आले. अशा पद्धतीचा हल्ला परतवून लावण्यात येईल याची इराणला खात्री होती का? हा हल्ला करून इराणने खूप मोठा धोका पत्करला होता. याचे कारण इस्राईलला जर हल्ला परतवून लावण्यात अपयश आले असते आणि इस्राईलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते, तर मात्र इस्राईलने मोठी लष्करी कारवाई करत या हल्ल्याचा सूड घेतला असता.

मोठे युद्ध भडकले असते. इस्राईलची संपूर्ण संरक्षणयंत्रणा ही गाझामधील युद्धात गुंतलेली असल्याची इराणला पूर्ण जाणीव असल्याने इराणला इस्राईलशी संघर्ष वाढवण्याची इच्छा असल्याची एक पुसट शक्यताही या व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे इस्राईलकडून प्रत्युत्तरादाखल देण्यात आलेला संदेश हा देखील तितकाच धोक्याचा होता. कारण इस्राईलने इराणच्या ज्या भागात हल्ला केला होता तेथे अणुसंशोधन केंद्र असून, जराही चूक झाली असती तरी मोठा अनर्थ ओढवला असता.

तात्पर्य हे की, इराण आणि इस्राईल हे दोन्ही देश जरी मोजून-मापून धोका पत्करत असतील तरी तो अनावश्यक असून, या प्रयत्नांत जरा जरी अनर्थ झाला तरी ती पूर्ण ताकदीनिशी लढल्या जाऊ शकणाऱ्या युद्धाची नांदी ठरू शकते. त्यामुळेच अमेरिकेसारख्या देशांनी वेळीच मध्यस्थाची भूमिका निभावत दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.

(अनुवाद : रोहित वाळिंबे)

(लेखक सामरिक विश्लेषक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

CNG Price Hike: महागाईचा झटका! गॅस कंपनीकडून सीएनजीच्या दरात मोठी वाढ, काय आहेत नवीन दर?

निकालानंतर मविआ की महायुती? वंचित कुणाशी युती करणार? प्रकाश आंबेडकरांनी ट्विटमधून सगळंच सांगितलं!

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Whatsapp Voice Note Transcription Feature : व्हॉट्सॲपवर जबरदस्त फीचरची एंट्री, पटकन बघून घ्या

SCROLL FOR NEXT