harnaaz sandhu sakal
संपादकीय

नाममुद्रा : विश्‍वविजेती शेरनी!

तब्बल २१ वर्षांनंतर हरनाज संधूच्या रूपात भारतीय सुंदरीला ‘मिस युनिव्हर्स’चा मान मिळाला आहे.

जयवंत चव्हाण

तब्बल २१ वर्षांनंतर हरनाज संधूच्या रूपात भारतीय सुंदरीला ‘मिस युनिव्हर्स’चा मान मिळाला आहे. पंजाबी चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेलिंगमध्ये रमणाऱ्या हरनाजने कोणतीही पार्श्वभूमी नसताना हे जागतिक यश मिळवल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे. पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यात हरनाजचा जन्म झाला; मात्र ती वाढली आणि शिकली चंडीगडमध्ये. तिचे वडील व्यावसायिक आहेत आणि आई डॉक्टर. पण पंजाबमधील सामान्य कुटुंबात जशी स्थिती असते तशाच स्थितीत तिने शिक्षण घेतले. सुरुवातीला वडिलांचा, समाजाचा विरोध होईल, अशी भीती तिलाही होती. त्यामुळे महाविद्यालयीन काळात अशा काही स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची तेव्हा तिला ते वडिलांपासून लपवून ठेवावे लागत असे. पण तिची आई मात्र धीराची होती. तिने कधीही मुलांनी डॉक्टर, इंजिनियरच व्हायला हवे असा आग्रह धरला नाही. त्यामुळे त्यांची दोन्ही मुले वेगळ्या क्षेत्रांत रमली. हरनाजला आधी न्यायाधीश व्हायचे होते; मात्र नंतर तिने मॉडेलिंगचे क्षेत्र निवडले. त्यापूर्वी त्यांच्या घरात कोणीही या क्षेत्रातले नव्हते. शिवाय त्याबाबत कोणाला फारशी माहितीही नव्हती. तरीही तिची इच्छा दुर्दम्य होती. साहजिकच सुरुवातीला यूट्युबवर काही व्हिडीओ बघून ती रॅम्प वॉक वगैरे शिकली. तशी लहानपणापासून ती विविध व्यक्तिमत्त्व संबंधित स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. त्यामुळे शिष्टाचार, बोलण्याच्या पद्धती आदी बाबी तिला अवगत होत्या. तिचे वागणे कायम शिस्तबद्ध असे. योगासने, व्यायाम तिने कधी टाळलाच नाही.

पहिल्यांदा, म्हणजे २०१७ मध्ये हरनाजने सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला तेव्हा आपल्या वडिलांना तिने काही सांगितलेच नव्हते. कारण साधारण जाट कुटुंबातली मुलगी मॉडेलिंगमध्ये सहभागी झाली हे त्यांना कितपत पचेल, याबाबत शंका होती. शिवाय, गावात काय प्रतिक्रिया उमटतील, याचीही चिंता होती. पण मुलांवर विश्वास ठेवायला हवा, तरच ती पुढे जातील, अशा विचाराने त्यांनी हरनाजला पाठिंबा दिला. वडिलांचे बळ पंखांना मिळाले आणि हरनाजने गरुडभरारी घेतली. आज हरनाज मिस युनिव्हर्स ठरल्यावर अभिनंदनाचे फोन घेऊन ते हर्षभरित झाले आहेत.

लेकीच्या कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होतो आहे. वडिलांबरोबरच देशाचीही मान तिने उंचावली आहे. तिला वडील लाडाने ‘शेरनी’ म्हणतात. तेही तिने सिद्ध केले आहे. यापूर्वी २०१७ मध्ये मिस चंडीगड, २०१८ मध्ये मॅक्स इमर्जिंग स्टार आणि २०१९ मध्ये फेमिना मिस पंजाब असे अनेक किताब तिने मिळवले आहेत. त्या यशावर मिस युनिव्हर्सच्या ताजने चार चाँद लावले आहेत.

हरनाजचा भाऊ संगीतकार आहे. बी. ए. पदवीनंतर हरनाज आता सार्वजनिक प्रशासन विषयात एम. ए. करते आहे. तिला नृत्यकला, पाककला आणि घोडेस्वारीत रस आहे. वेळ मिळाला की, ती आपले छंद जोपासते. लहानपणी हरनाजला ‘कद्दू’ म्हणत असत. पण त्यामुळे तिचा विश्वास डळमळीत होत असे. आईने तिला आत्मविश्वास दिला. स्वतःवर विश्वास ठेव आणि इतरांकडे दुर्लक्ष कर, असे ती नेहमी तिला सांगायची. मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीतही हाच आत्मविश्वास दिसला आणि तिने आजच्या युवकांना स्वतःवर विश्वास ठेवा, असा सल्ला दिला. तोच सल्ला अखेर बाजी मारून गेला. हरनाज निसर्गात रमते. त्यामुळेच ती जास्त गंभीरपणे सृष्टीचा विचार करते. हवामान बदलाच्या प्रश्नावर जास्त बोलण्यापेक्षा प्रत्येकाने त्या दिशेने काही तरी काम करण्याचा मुद्दा तिथे उपस्थित केला. याही उत्तराने तिने परीक्षकांवर छाप उमटवली. हरनाज पूर्वीपासून अनाथ मुलांसाठी काम करते आहे. अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड प्रियांका चोप्राकडून प्रेरणा घेतल्याचे ती आवर्जून नमूद करते. सुश्‍मिता सेन आणि लारा दत्तानंतर पुन्हा एकदा भारतीयांची मान हरनाजने उंचावली याचा प्रत्येकाला अभिमान वाटायलाच हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT