Uddhav Thackeray sakal
संपादकीय

हिंदुत्वाचा न पेललेला वारसा

उद्धव ठाकरे परवा वाहिन्यांच्या छोट्या पडद्यावर त्यांनीच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने अवतीर्ण झाले.

केशव उपाध्ये

उद्धव ठाकरे परवा वाहिन्यांच्या छोट्या पडद्यावर त्यांनीच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने अवतीर्ण झाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाचे आपणच वारस असा दावा उद्धव ठाकरे करीत असले तरी तो वारसा त्यांनी पेललेला नाही, हे अनेक घटनांमधून दिसून आले.

उद्धव ठाकरे परवा वाहिन्यांच्या छोट्या पडद्यावर त्यांनीच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने अवतीर्ण झाले. अयोध्येत ३१ वर्षांपूर्वी झालेल्या कारसेवेच्या निमित्ताने त्यांनी भारतीय जनता पक्षावर नेहमीप्रमाणे तोंडसुख घेतले. बाळासाहेब ठाकरे यांचा जहाल हिंदुत्वाचा वारसा फक्त आपल्याकडेच आहे, भाजप, संघ परिवाराने त्यावेळी शौर्य दाखविले नाही, वगैरे बरीच शब्दफुले त्यांनी उधळली. सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो की, त्यांना बाळासाहेबांच्या जाज्वल्य हिंदुत्वाची निदान आठवण तरी आहे! याचे कारण त्याआधी मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी आणि त्यानंतर ते टिकवण्यासाठी उद्धवरावांना आपल्या पिताश्रींच्या हिंदुत्वाच्या विचारांचा विसर पडला होता. कितीतरी घटना याविषयी सांगता येतील.

मोदी सरकारने शेजारी देशांमधील धार्मिक अन्याय सहन करणा-या अल्पसंख्य हिंदू, शीख,जैन, पारशी, बौद्ध, ख्रिस्ती नागरिकांना जर भारतात यावयाचे असेल तर त्यांना देशाचे नागरिकत्व देण्यासाठी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) लागू करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान, बांगला देश, अफगाणिस्तान आदी देशांत अल्पसंख्य असलेल्या हिंदू, शीख, जैन, पारशी,बौद्ध, ख्रिस्ती नागरिकांना तेथील हिंसाचाराच्या परिस्थितीत राहणे कठीण झाले असेल आणि त्यांनी भारताचे नागरिकत्व मागितल्यास त्यांना ते दिले जाईल, असा कायदा मोदी सरकारने केला. या शेजारी देशात राहणारे हिंदू, शीख, जैन, पारशी, बौद्ध, ख्रिस्ती हे पूर्वी भारताचेच नागरिक होते. त्यांना मायभूमीत सामावून घेण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. गायक अदनान सामी याने याच कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व स्वीकारले. मुख्यमंत्री असलेल्या उद्धवरावांनी त्यावेळी हा कायदा राज्यात लागू करणार नाही, असे जाहीर केले होते.

‘सीएए’ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. म्हणून उद्धवरावांनी त्यावेळी हा कायदा महाराष्ट्रात लागू करणार नाही,अशी भूमिका घेऊन सत्तेसाठी आपण हिंदुत्वाला बाणगंगेवर तिलांजली दिली आहे, हेच दाखवून दिले होते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी या कायद्याचे जोरदार स्वागत केले असते. या कायद्याला विरोध करण्यासाठी ‘जामिया मिलिया विद्यापीठा’तील विद्यार्थ्यांनी १७ डिसेंबर २०१९ रोजी दिल्लीत मोर्चा काढला होता. हिंसाचार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्यावर उद्धवरावांनी ‘जामिया मिलिया’मधली कारवाई जालियनवाला बागेतील गोळीबारासारखीच निर्दयी होती,’ असे जाहीर विधान केले होते. त्यांना ‘जामिया मिलिया’तले दंगेखोर शांतिदूत वाटू लागले होते. बाळासाहेब असते तर त्यांनी ‘असल्या देशद्रोह्यांना वेळीच ठेचले पाहिजे,’ अशा शब्दांत कारवाईचे समर्थन केले असते.

घालीन लोटांगण...

याच कायद्याच्या विरोधात दिल्लीत हिंसाचार घडविण्याचे कारस्थान कसे आखले गेले होते हे २३ ते २९ फेब्रुवारी या सहा दिवसांत दिल्लीत झालेल्या भीषण दंगलीवेळी उघडकीस आले होते. त्या दंगलीत पोलिसांवर पिस्तूल चालवणाऱ्या शाहरुख नामक तरुणाचे छायाचित्र चांगलेच गाजले होते. त्यावेळीही उद्धवरावांना बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा प्रखर वारसा पेलवला नव्हता. १९९२-९३ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीच्या वेळी बाळासाहेबांनी घेतलेली प्रखर भूमिका सर्वांच्या स्मरणात आहे. २०२०च्या दिल्ली दंगलीवर आपल्या मुखपत्रातून संजय राऊत यांनी काय विचार व्यक्त केले होते हे पहा. ‘दिल्लीतील हिंसाचार पाहून यमराजही राजीनामा देईल’.

एवढेच लिहून ते थांबले नव्हते, तर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामाही मागितला होता. त्यावेळच्या काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांचा ‘सीएए विरोधी’ आंदोलनाला जाहीर पाठिंबा होता. या कायद्याच्या विरोधात दंगेखोरांनी २३ फेब्रुवारी रोजी कायदा हातात घेऊन हिंसाचार सुरु केला त्यावेळी सोनिया गांधी गप्प होत्या. या दंगेखोरांना प्रत्युत्तर मिळू लागले, तेव्हा मात्र त्यांना मानवतावाद आठवला. कायद्याचे राज्य आठवले. सोनियाबाईंची खप्पा मर्जी झाली तर मोठ्या परिश्रमाने विश्वासघाताने मिळवलेले मुख्यमंत्रीपद हातातून जाईल या लाचार विचाराने ‘रोखठोक’कारांनी हिंदुत्वविरोधी शक्तींपुढे ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ चा प्रयोग सादर केला.

‘सीएए’च्या विरोधात दिल्लीत शाहीनबागमध्ये रस्ते अडवून दिल्लीकरांची अडवणूक करणारे आंदोलनही उद्धवरावांनी सत्तेसाठी निमूटपणे सहन केले. त्यावेळी त्यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा सोयीस्कर विसर पडला. शर्जिल उस्मानी याने हिंदू धर्मीयांबद्दल काढलेले अश्लाघ्य उद्गारही उद्धवरावांना सत्ता टिकवण्यासाठी हिंदुत्वविरोधी वाटले नाहीत. मुंबईतील ९२-९३ च्या दंगलीत केंद्रात आणि राज्यात काँग्रेस सत्तेत होती. त्यावेळी काँग्रेसची सालटी काढणारे बाळासाहेबांचे ‘सामना’मधील अग्रलेख, भाषणे हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रसिद्ध कवितेतील, ‘की घेतले न हे व्रत अंधतेने। लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने। जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे। बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।’ या ओळींप्रमाणे बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे सतीचे वाण हाती घेतले होते. उद्धवरावांनी मात्र हे सतीचे वाण हाती घेण्याऐवजी हिंदुत्वाला सोडचिट्ठी देत सत्तेचे वाण स्वीकारले. काळाचा महिमा; दुसरे काय?

(लेखक प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा

Accident: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Goodbyes are never easy! ऋषभ पंतची पोस्ट व्हायरल; लिलावात २७ कोटी मिळाल्यानंतर नेमकं असं का म्हणतोय?

SCROLL FOR NEXT