Mymarathi sakal
संपादकीय

भाष्य : कृषी परंपरेचे भाषिक वरदान

बोलीभाषा ग्रामीण जनव्यवहारात सर्रास वापरल्या जातात. तथापि, मराठी साहित्यात आणि मराठीच्या शिक्षण व्यवहारात त्याला भाषावैभव म्हणून योग्य ते स्थान मिळत नाही.

डॉ. केशव देशमुख

बोलीभाषा ग्रामीण जनव्यवहारात सर्रास वापरल्या जातात. तथापि, मराठी साहित्यात आणि मराठीच्या शिक्षण व्यवहारात त्याला भाषावैभव म्हणून योग्य ते स्थान मिळत नाही. उपेक्षित राहिलेला हा घटक जपण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली पाहिजेत.

एकंदरीत आपल्याकडे भावनांच्या प्रकटीकरणाच्या पद्धती भिन्नभिन्न. विचार प्रकटीकरणाचीही रीत अशीच वेगवेगळी. जमीन बदलली, पाणी बदलले, हवा बदलली म्हणजे समाज आणि संस्कृतींचे बदलही जाणवतातच. एकसारखेपणा भाषांत सरसकट असतो, हे एकमुखी सांगता येत नाही. ‘शेतीसंस्कृती आणि भाषा’ हे अत्यंत व्यापक म्हणावे असे भाषासंस्कृतीचे किंवा बोलींच्या संस्कृतीचे चिंतनक्षेत्र होय. किंबहुना संस्कृती-विश्लेषण क्षेत्रच होय.

मराठी साहित्यांमधून प्राचीन काय किंवा अर्वाचीन काय किंवा अगदी समकालीन काय, अशा सर्व काळांत शेतीच्या, गावांच्या बोलींचा सढळपणे केलेला वापर वाचावयास मिळतो. तथापि, भाषांत काम करणाऱ्या तज्ज्ञांना अद्याप त्यांची दखल घ्यावीशी वाटलेली नाही.

साक्षात लोकांमुखी अगदी मुक्काम करून असलेल्या जिभेवरच्या दैनंदिन भाषा-बोलींची विश्लेषणपद्धती अजूनही फारशी अवलंबिली जात नाही. याचे कारण, हा भाग क्षेत्रीय कार्यांचाच आहे. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून या पद्धतीचे काम मात्र अगदी लक्षणीय म्हणावे अशा पद्धतीचे आहे. बाकी, विद्यापीठं काय किंवा महाविद्यालयांमधून भाषा-बोलीचे कार्य औषधांपुरतेच चालते.

आपल्या मराठी अभ्यासक्रमांत केवळ भाषा किंवा बोलींचे अध्यापन, संशोधन मोजमापात बसेल इतकेही नसते. वस्तुतः उपकारांपुरता भाषा, बोलींचा महाविद्यालयांमधून होणारा अभ्यास किंवा केले जाणारे अध्यापन समाधानापेक्षा चिंता करायला लावणारे आहे, ही वस्तुस्थिती. ‘‘भाषा जगविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ती भाषा बोलणारे लोक जगविणे. मौखिक भाषेतील लोक हे खूप काही उत्सुक असतात, पण त्यांचे ऐकून घ्यायला कोणी तयार नाही.

आपल्या देशात ७८०पेक्षा जास्त भाषा आहेत. भाषेचं वय महत्त्वाचे नाही; तर भाषेचे अवयव किती हे महत्त्वाचे,’’ ही ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांची भूमिका आणि भावनाही आपण समजून घ्यायलाच तयार नाही, असा मामला आहे.

थोडक्यात, बोली बोलणारा समाज (लोक) जगवायचा हा विचार मुख्य ऐरणीवर कधी येणार हा खरा प्रश्न. लोक निरंतर सांगू पाहतात, बोलू पाहतात. सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या खूप काही मूलभूत सांगू लागले आहेत. आमच्या महत्त्वाच्या म्हणविल्या जाणाऱ्या येथील मराठीच्या शिक्षणांत किमान हक्काची भाषा ‘शिकवली’ जाते. हा एवढासा भाषागंध भाषेला, विद्यार्थ्यांना, समाजाला न्याय देणारा नाही.

मराठी भाषांचा, बोलींचा अभ्यासाचा टक्का हा अभ्यासक्रमांत आपण का वाढवत नाही? मी स्वतः विद्यापीठांतून प्राध्यापकी करताना बोली-भाषांच्या सर्वेक्षणाधिष्ठित नव्या नव्या अभ्यासपत्रिका जाणीवतः चालवल्या. त्याला प्रारंभी फार प्रतिसाद नावीन्यामुळे नव्हता. मात्र, पुढे-पुढे विद्यापीठांत या अभ्यासक्रमाला चांगला, समाधानकारक असा प्रतिसाद मिळाला. भाषा जगविणाऱ्या या समाजाला ज्ञानोपासकांनी पाठबळ तर दिलेच पाहिजे ना!

भाषा-बोलींचे वैभव

मुळात भाषा, बोलींचा परिसर छोटा नसतोच. अगदी, अवाढव्य शेतीसंस्कृती आणि या समृद्ध संस्कृतीला घट्ट जुळून असलेल्या भाषा-बोली संस्कृतीने मराठीचे, भाषेचे हे वैभव केवढे तरी वाढविले आहे. महाराष्ट्राचा गावमाणूस, सर्व दिशांनी पसरलेला ग्रामीण समाज, कष्टकरी लोक त्यांची शेतीपरंपरा या सर्वांनी मराठी भाषेला सांस्कृतिक, सामाजिक प्रचंड मोठी बोलीरसद पुरविलेलीच आहे. ही बोलीरसद वैविध्य आणि गुणवत्ता या दोन्ही पातळींवर थक्क करणारी आहे.

शेतीच्या समृद्ध संस्कृतीने कितीतरी नवे शब्द संपूर्ण अर्थपूर्णतेसह आमच्या मराठीला दिले. अशा शब्दांच्या, बोलींच्या धनदौलतीचा आम्ही प्रचलित शिक्षणांत मात्र नगण्य विचार करतो. उदाहरणादाखल काही मौलिक शब्दसंहिता जाणीवतः नमूद करता येतील. बेरणे (पेरले जाते पण बीज जमिनीत पडतच नाही), लूड (पिकांची कणसं वरच्या वर कापून घेणे), कठान (हिवाळ्यात रब्बी पिकांची केलेली लागवड, पेरणी), बरड (कमी कसदार, हलक्या प्रतीची भुई), गंजी (गवतांचे नीट रचलेले ढीग), सुडी (ज्वारीच्या ताटांचे नीट रचलेले ढीग), कान्ही (काळेकुट्ट पडलेले बीनाकामांचे कणीस), मूळवाटी (लग्नाचे सहकुटुंब मिळालेले गणगोतीय आप्तेष्ट आमंत्रण).

यातला ‘वाटी’ हा शब्द म्हणजे खोबऱ्याचा तुकडा असा आहे आणि ‘मूळपत्रिका’ ही आजची त्यासंबंधीची आधुनिक संज्ञा; याशिवाय, बखाड (अवर्षणाची भयंकर निर्माण झालेली स्थिती), बिदंगी (थंडावा असलेले आणि पाणी प्यावयाचे खापराचे मोठे भांडे, अर्थात खापरी घागर), डेंगरं (खेळकर लहान मुलांचा समुदाय), पाठ (शेळीचं स्त्रीलिंगी पिल्लू), हुळा (वाळलेल्या हरभऱ्याचे भाजून खावयाचे डहाळं).

हा मातीवर भाजून खायचा, शिवाय माती-जाळ यांची एक भन्नाट चव या हरभऱ्यांना येते. घोळाना (कोवळा हिरवा हरभरा), तो मीठ-तिखट लावून, वाटून कुटून खायचा. त्याची चव अमृताची जणू! शिवाय, उन्हाचा त्रास अधिक होऊन जेव्हा नाकातून रक्त येते, या अशा स्थितीलाही ‘घोळाना फुटला’ असे म्हणतात. म्हणजे पहिला घोळाना कुटण्याशी निगडित असून, दुसरा घोळाना फुटण्याशी निगडीत आहे. असो.

आबक (एका पिकाच्या आधी केलेली लागवड किंवा पेरणी) किंवा सोबनी (लहान मुलांना होणारा आजार, यामध्ये मुलांचे हातपाय बारीक होतात आणि त्याचे पोट फुगल्यासारखे दिसते), ढेलं (शेतांचा हिस्सा, तुकडा), आलडावलडा (आरडाओरडा, समूह गलबला), पुंजाना (शेतीमशागत करताना केरकचरा, पालापाचोळा हा जमा करून त्यांचे लावलेले लहान ढीग).

ही अशी खूपच मोठी शब्दसंपत्ती शेतीसंस्कृतीने दिली आहे. प्रदेशनिहाय त्यात जी भिन्नता दिसते, तीही अचंबितच करायला लावणारी आहे. भाषा शिकविणारे एकूणात लोक या वैभवांपासून खूप दूर आहेत. विद्यार्थिवर्ग या समृद्ध बोलीभाषांशी जुळलेला असतो; पण त्या बिचाऱ्यांच्या भावना व मतं ऐकतो कोण?

सारांश, बोली-भाषांचे कप्पेबंद दृष्टिकोन आणि चौकटबंद अभ्यासक्रम गळून पडायला हवेत. बारीक बारीक साचे-ढाचे करून भाषेचा अभ्यास मुळीच होऊ शकत नाही. याचे कारण मराठी बोलींचे अभ्यास हे मुळात क्षेत्रअभ्यासाशी संबंधित अधिक असतात.

या प्रकारे ग्रंथाभ्यास किंवा निवडक ग्रंथ महत्त्वाचेच. तथापि, डॉ. देवी म्हणतात त्याप्रमाणे भाषा बोलणाऱ्या लोकांनाही जगविण्याचा विचार हा यासंदर्भात जास्त महत्त्वाचा आहे. हे सर्व लोक बोलतात ते सगळे ऐकून घेणारे मन आणि कान हे मोठ्या प्रमाणात वाढल्याशिवाय बोलींच्या या धनसंपदेला न्याय आणि वाव कसा मिळेल? हा विचार समाजधुरिणांनी आणि शिक्षणाच्या धोरणकर्त्यांनी केला पाहिजे.

(लेखक राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीचे तज्ज्ञ सदस्य आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT