lok sabha election result 2024 mumbai devendra fadnavis raj thackeray Sakal
संपादकीय

ढिंग टांग : खलबतखान्यातील मसलत..!

ब्रिटिश नंदी

ज्येष्ठ लागला होता. अवघी मुंबई मृग नक्षत्राची वाट पाहात होती. टळटळीत संध्याकाळ होती. नुकतीच वळवाची एक सर येवोन गेलेली. प्रचंड गदमदत होते. शिवाजी पार्क हे तसे थंड हवेचे ठिकाण असले तरी उकाड्यात भयंकर उष्ण होते.

येथे साक्षात ‘शिवतीर्थ’ उभे आहे. जणू काही ज्वालामुखीच. त्यामुळे आसपासचा इलाखा गरम असणार, हे तो ठरलेले. ‘शिवतीर्था’वर सोमवार होता, शिवराक! त्यामुळे मामला तसा थंडच होता. पंखा फुल स्पीडवर सोडून राजेसाहेब अंत:पुरात येकलेच बसले होते. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा सखोल विचार करीत होते. नवा डाव, नवी ब्लू प्रिंट!... तेवढ्यात फर्जंद अदबीने पेश झाला.

‘‘कायाये रे?,’’ राजियांनी प्रेमळपणाने खेकसून विचारले.

‘‘दरवाजापाशी कुणीतरी अज्ञात इसम आला आहे, साहेबांची अर्जंट भेट हवी आहे, असे सांगतो!’’ फर्जंदाने चाचरत वर्दी दिली.

‘‘कुठल्याही अज्ञात लुंग्यासुंग्याला आम्ही भेटत नसतो, हे ठाऊक आहेस ना तुजला फर्जंदा? नोकरी जड झाली आहे काय?, राजे भडकले.

‘‘सदर इसमाने वेषांतर केले आहे. अंधार पडत असतानाही त्यांणी काळा चष्मा लावला असून मस्तकी हुडी धारण केली आहे, चेहरा वळखीचा वाटतो, म्हणून-,’’ फर्जंदाने घाईघाईने खुलासा केला.

‘‘हात्तिच्या, हे तर आमचे श्रीमंत नाना फडणवीस! धाडा त्यांना आत!!,’’ राजेसाहेबांनी निव्वळ वर्णनावरुन तत्क्षणी वळखले.

‘‘मी बी तेच म्हणत होतो,’’ फर्जंदाने आपले घोडे दामटले, आणि त्वरेने तो पाहुण्यांस आणण्याच्या कामी रवाना झाला. यथावकाश हुडीधारी, काळाचष्माधारी श्रीमंतनाना अंत:पुरात प्रविष्ट झाले.

‘‘ कुणी मजला ओळखले नाही ना?,’’ इकडे तिकडे पाहात त्यांनी राजियांकडे पृच्छा केली.

‘‘ छे नाव सोडा, कोण आपण?,’’ राजियांनी डोळे मिचकावून विचारले.

‘‘अहो, ओळखले नाहीत कां? मी तुमचा मित्र नानासाहेऽऽऽब!!,’’ डोकीवरली हुडी काढून श्रीमंतनानांनी चेहरा दाखवला. आपल्याला कोणीच ओळखू शकत नाही, या कल्पनेने ते मनोमन थोडे खुशालले.

‘‘बाकी वेषांतर तुम्ही बेमालूम करता हां!,’’ राजियांनी त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवले. मग पटकन मुद्द्यावर येत विचारले, ‘‘ आज अचानक कसं काय येणं केलंत?’’

‘‘सहजच आलो!,’’ घाम पुसत नानासाहेब म्हणाले.

‘‘…तरीही काहीतरी मसलत असेलच! येरव्ही सोमवारी आमच्याकडे कोण जेवायला येते?,’’ राजियांनी प्रेमभराने चवकशी केली.

‘‘उद्या रिझल्ट…नाही म्हटले तरी टेन्शन आलं आहे,’’ नानासाहेबांनी कबुली दिली.

‘‘ एवढं मनाला लावून घेवो नका! असा दिल टाकू नका!! आमच्याकडे बघा, इतकी वर्ष इतके रिझल्ट लागूनही आम्ही कसे घट्ट आहो!’’ राजियांनी समजूत घातली.

‘‘म्हणूनच आलो, तुमच्याशी गप्पा मारल्या की जिवाला बरं वाटतं,’’ नानासाहेब कृतज्ञतेने म्हणाले.

‘‘ अबकी बार चारसौपार होणार! शिवाय आमचं बिनशर्त पाठबळ! टेन्शन को जाने दोन पेन्शन लेने!,’’ नानासाहेबांच्या पाठीवर थाप मारत राजियांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. नानासाहेबांचा चेहरा नाही म्हटले तरी खुलला.

‘‘पुढं कसं करायचं? ठरवायला हवं,’’ नानासाहेबांनी विषय काढला.

‘‘ पुढचं पुढं हो! आत्तापासून कशाला ठरवताय? रिझल्ट पूर्ण लागूदेत, मग बघू!’’ राजियांनी मसलत कंप्लीट उडवून लावली.

‘‘तेही खरंच!,’’ चुळबुळत नानासाहेब म्हणाले. बराच वेळ चुळबुळल्यावर ते पटकन उठून म्हणाले, ‘‘ अच्छा, बराय, येतो!’’

‘‘कामाचं काहीच बोलिला नाहीत? मोकळेपणानं सांगा, आम्ही काही करायला हवं आहे का?,’’ राजियांनी आश्चर्याने विचारले.

गदगदलेल्या स्वरात श्रीमंत नानासाहेबांनी जाकिटाच्या बाहीने डोळे पुसत काळा चष्मा चढवला, आणि म्हणाले, ‘‘काही नको, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा!’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT