Constitution of india sakal
संपादकीय

दृष्टिकोन : लोकशाहीच्या मुळावर येणारा विखार

काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केला जातो, विखारी शब्दांत निर्भत्सना केली जाते. कळस म्हणजे ‘मोदींच्या हत्येला तयार व्हा,’ असेही आवाहन केले गेले.

माधव भांडारी

काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केला जातो, विखारी शब्दांत निर्भत्सना केली जाते. कळस म्हणजे ‘मोदींच्या हत्येला तयार व्हा,’ असेही आवाहन केले गेले.

काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केला जातो, विखारी शब्दांत निर्भत्सना केली जाते. कळस म्हणजे ‘मोदींच्या हत्येला तयार व्हा,’ असेही आवाहन केले गेले. हे विधान केवळ संतापजनकच नव्हे; तर लोकशाही व्यवस्थेला नख लावणारे आहे.

‘देशाच्या राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी मोदींची हत्या करायला तयार व्हा’ असे जाहीर आवाहन मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते राजा पतेरीया यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा मध्य प्रदेशचा टप्पा आटोपून बाहेर पडल्या पडल्या हे भाषण समोर आले आहे. हे पटेरिया काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्री होते. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे जाहीर आवाहन करणारे ते कोणी लहानसहान पदाधिकारी नाहीत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या या आवाहनानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. या जाहीर आवाहनाबद्दल मध्य प्रदेश सरकारने पटेरिया यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. ‘मोदींचा पराभव करण्यासाठी तयार व्हा असे मला म्हणायचे होते, माझ्या बोलण्याला चुकीचे वळण दिले जात आहे’, असा दावा ते करत आहेत. पण त्यांच्या भाषणाचा व्हिडिओच उपलब्ध असल्यामुळे त्यांनी दिलेली सफाई उपयोगाची ठरलेली नाही. पटेरिया काहीही खुलासा करत असले तरी त्यात तथ्य नाही, हे लक्षात आले आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी पटेरियांना कारणे दाखवा नोटीस बजावली; तसेच मोदी यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थनाही केली आहे. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. पण गांधी कुटुंबीय आणि खर्गे यांनी कोणतेच भाष्य केले नाही, हे खेदाचे आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये असताना हे भाषण केले गेले. हा योगायोग असावा असे आपण म्हणू. वास्तविक त्या भाषणाचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर अशा व्यक्तीचा जाहीरपणे निषेध करायला पाहिजे होता, पक्षातून तात्काळ हकालपट्टी करायला पाहिजे होती. ‘To test the waters’ अशी म्हण आहे. एखाद्या विषयाबद्दल काय प्रतिक्रिया येते हे चाचपून बघायला एखाद्या दुय्यम व्यक्तीला बोलायला सांगितले जाते. तसा प्रकार तर चालू नाही ना? तसे असेल तर काँग्रेस कोणत्या थराला पोचली आहे हे दिसून येते. सोनिया गांधींनी काँग्रेसचा ताबा घेतल्यापासून हा बदल झालेला आहे आणि आता राहुल त्यात भर घालत आहेत, असे म्हणण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे.

मोदींबद्दल असभ्य भाषा

राजकीय वैचारिक मतभेद असणे हे लोकशाहीचे पहिले तत्त्व आहे. मतभेद असले तरीही सर्वांनी एकत्र राहून काम करणे ही लोकशाहीची मूळ कल्पना आहे. राज्यघटनेने दिलेल्या मार्गाने आपले विचार जनतेसमोर मांडून, जनतेकडून कौल मिळवणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे. त्याच मार्गाने जनतेसमोर आपली भूमिका मांडत, सात दशके संघर्ष करत आम्ही इथे आलो आहोत. आम्ही मांडलेले विचार, मुद्दे जनतेला पटले म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहे. आजचे पंतप्रधान हे जनतेने निवडून दिलेले नेतृत्व आहे. सन २००० पूर्वी आम्ही सतत पराभूतच होत होतो. पण त्या काळात जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारून आम्ही पुन्हा काम सुरू करत होतो. आमचा पराभव झाला म्हणजे राज्यघटनेचा अंत झाला असे आम्ही कधीच मानले नाही, म्हटलेही नाही.

पण, सोनिया गांधी आणि त्यांची अपत्ये असे मानत नाहीत. जनतेने त्यांना नाकारले आहे, हेच त्यांना मान्य नाही. जनतेने आपल्याला नाकारले म्हणजे जनतेने राज्यघटनेला नाकारले असा अजब समज त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी करून घेतला आहे. जनतेकडे जाऊन, जनतेसमोर आपली भूमिका मांडून जनतेचा कौल मागणे हे त्यांना कमीपणाचे वाटते. सिंहासनावर बसणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, त्याचा जनतेशी काही संबंध नाही अशी बहुधा त्यांची समजूत असावी. त्या समजुतीपोटी अशी भावना तयार होते आणि मग ती पटेरियांसारख्या व्यक्तीच्या तोंडून वदवली जाते. पटेरियांचे विधान समोर आल्याबरोबर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक होते. अर्थात काही न बोलणे ही सुद्धा भूमिका स्पष्ट करण्याची एक पद्धत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस जी भाषा सातत्याने वापरत आहे त्याचे अंतिम टोक आता गाठले गेले आहे. काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया आणि राहुल गांधींनी सातत्याने मोदींबद्दल असभ्य व अश्लाघ्य भाषेचा वापर केलेला आहे. सार्वजनिक जीवनात बोलताना पाळावयाचे सभ्यतेचे कोणतेही संकेत गांधी मायलेकांना मान्य नाहीत. पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना ‘मौत का सौदागर’ ‘खून का दलाल’ ‘नीच’ अशी शेलकी विशेषणे त्यांनी नेहमी वापरली आहेत.

१९८४ मध्ये शिखांची कत्तल होत असताना आपण शांतपणे बघत बसलो होतो हे सोयीस्करपणे विसरून सोनिया गांधी ही भाषा वापरतात. राहुल गांधी मोदींना ‘चोर’ म्हणतात. याच राहुल गांधींवर नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोट्यवधी रुपयांच्या हेराफेरीचा आरोप आहे आणि ते जामिनावर आहेत, ही वस्तुस्थिती ते विसरतात. ‘चोरांची नावे मोदी का असतात?’ असा सवाल शहाजोगपणे विचारताना त्याच चोर नीरव मोदीकडून आपण राजीव गांधी ट्रस्टला कोट्यवधी रुपये देणगी म्हणून घेतले आहेत हेही राहुल विसरतात. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मोदी यांना ‘रावण’ म्हणतात. मणिशंकर अय्यर यांनी तर मोदी यांचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी, असे आवाहन पाकिस्तानात जाऊन केले होते. पटेरिया यांनी या सर्व भाषेचा तार्किक शेवट गाठला आहे.

लोकशाहीलाच धोका

‘पंतप्रधान मोदींच्या हत्येला तयार व्हा’ असे आवाहन करण्यात पटेरिया नामक आपल्या नेत्याने काही चूक केली आहे असे काँग्रेसमध्ये कोणालाही सुरवातीला वाटू नये, हेच भीषण आहे. नंतरची कारवाईची भाषा सारवासारव म्हटली पाहिजे. पण, देशातल्या प्रसिद्धी माध्यमांना, कोणते शब्द ‘पोलिटिकली करेक्ट’ आहेत हे ठरवण्याचा मक्ता ज्यांनी स्वत:च स्वत:कडे घेतला आहे त्या वर्गाला सुद्धा काँग्रेस नेता पटेरिया यांचे उद्गार गैर, आक्षेपार्ह वाटलेले नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही वृत्तपत्राच्या ‘निर्भिक’ संपादकाने त्यावर ‘सडेतोड भाष्य’ केलेले नाही, कोणत्याही वृत्त वाहिनीने त्यावर ‘खणखणीत चर्चा’ घडवल्या नाहीत. ही भाषा लोकशाहीचा गळा घोटणारी आहे हे सांगायला कोणताही विचारवंत पुढे आलेला नाही.

ट्विटरवर देखील पूर्ण शांतता आहे. या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’पासून भारताच्या एखाद्या कोपऱ्यात बसलेल्या ‘महान विचारवंता’पर्यंत पसरलेली अदृश्य पण अत्यंत संघटित यंत्रणा- ‘इकोसिस्टिम’ भारताबद्दल कशा पद्धतीने विचार करते आहे, ते या वक्तव्यातून उघड झाले आहे. राजा पटेरिया यांच्या बोलण्यातून मोदींच्या जीविताला असलेला धोका जसा उघड झाला आहे तसा किंवा त्यापेक्षा अधिक धोका भारतातल्या लोकशाहीला निर्माण झाला असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सर्व जागरूक व राष्ट्रभक्त नागरिकांनी याची दखल घेणे आवश्यक आहे.

(लेखक महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत)

madhav.bhandari@yahoo.co.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT