संपादकीय

भाष्य : ज्ञान क्रांतीच्या उंबरठ्यावर

मला शिकवण्याची जबरदस्त हौस आहे. एकविसाव्या वर्षी मुंबईत बीएससीच्या प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना डेमॉन्स्ट्रेटर म्हणून सुरुवात करून मी उत्तमोत्तम विद्यापीठांत ५५ वर्षे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना उत्साहाने शिकवले.

माधव गाडगीळ, madhav.gadgil@gmail.com

मला शिकवण्याची जबरदस्त हौस आहे. एकविसाव्या वर्षी मुंबईत बीएससीच्या प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना डेमॉन्स्ट्रेटर म्हणून सुरुवात करून मी उत्तमोत्तम विद्यापीठांत ५५ वर्षे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना उत्साहाने शिकवले.

आज आधुनिक माहिती संचार तंत्रज्ञानाच्या प्रभावातून एक सर्वसमावेशक शांततापूर्ण ज्ञानक्रांती घडते आहे. खुशीत डंका पिटावा, म्हणावे - गुगल युग में जानकारी होवे सबके साथ। आम आदमी सत्य बतावे स्मार्टफोन लेके हाथ।।

मला शिकवण्याची जबरदस्त हौस आहे. एकविसाव्या वर्षी मुंबईत बीएससीच्या प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना डेमॉन्स्ट्रेटर म्हणून सुरुवात करून मी उत्तमोत्तम विद्यापीठांत ५५ वर्षे विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना उत्साहाने शिकवले. योगायोगाने ७७ व्या वर्षी माझ्या अध्यापनाची सांगता अगदी वेगळ्याच विद्यार्थीवृंदाला शिकवण्यातून झाली. हे त्यांच्या सामूहिक वनाधिकारप्राप्त ग्रामसभांनी निवडलेले विद्यार्थी औपचारिक निकषांवर अल्पशिक्षित; पण गदिमांच्या शब्दांत ‘बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू, झाडे- वेली, पशु, पाखरे यांच्या गोष्टी करत करत’ शिकलेले २७ युवक-युवती होते. त्यांच्याजवळ निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव आणि पूर्वीच्या इतिहासाच्या, परंपरांच्या कहाण्यांचे ज्ञानभांडार होते.

सामूहिक वनाधिकार हा २००८ पासून अंमलात आलेल्या प्रगतिशील वनाधिकार कायद्यामधील महत्त्वपूर्ण हक्क आहे. सामूहिक वनहक्क भूमीवर ग्रामसभांना बांबूसहित गौण वनोपजांवर स्वामित्व मिळाले आहे. दुर्दैवाने प्रभावी आर्थिक हितसंबंधांमुळे ह्या कायद्याची अंमलबजावणी फक्त महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजातले समर्थ नेतृत्व आणि सच्चे शासकीय अधिकारी एकत्र आल्याने भक्कमपणे होऊन हजारांवर ग्रामसभांना लाखो हेक्टर सामूहिक वनसंपत्ती मिळाली आहे. हक्कधारक ग्रामसभांना सामूहिक वनसंपत्तीबद्दलच्या कार्यआयोजना बनवून शासनाला सादर करावयाची जबाबदारी आहे.

महाराष्ट्राच्या आदिवासी कल्याण विभागाने मुंबई विद्यापीठाद्वारे वनहक्कधारक ग्रामसभांना कार्यआयोजना बनवायला सक्षम करण्यासाठी गडचिरोलीतल्या मेंढा-लेखा ह्या देशात सर्वप्रथम सामूहिक वनाधिकार मिळवलेल्या गावात ऑक्टोबर २०१८पासून फेब्रुवारी २०१९पर्यंत एक प्रशिक्षण आयोजित केले. माझे मित्र डॉ. विजय एदलाबादकर आणि मी ह्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. अभ्यासक्रमातले सगळे वनाभ्यासक सुरुवातीपासून हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय शिकून घेण्याच्या उत्साहात होते. सामूहिक वनक्षेत्राच्या कार्यआयोजनांच्या उद्दिष्टात गौण वनोपज संकलन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, विक्री, हिशेब, कर भरणे या सगळ्यांचा समावेश आहे. अलीकडच्या तांत्रिक प्रगतीमुळे हे खूप कार्यक्षमतेने करता येऊ लागले आहे आणि यातील तज्ज्ञ विजयरावांनी हा विषय सोपा करून कुशलतेने शिकवला. १९९१पासून इंटरनेटद्वारे जगभराचे संगणक एकमेकांना जोडले जाऊन विश्वव्यापी वेब हे माहितीचे एक अचाट भांडार बनलेले आहे. आजच्या स्मार्टफोन संपर्काचे व वेबवरील माहिती शोधण्याचे प्रभावी साधन बनलेले आहे. २००५पासून युनिकोडमध्ये स्मार्टफोनवरून मराठीतून माहिती शोधता येऊ लागली आहे.

स्मार्टफोन स्वस्त होऊन ग्रामीण महाराष्ट्रात, अगदी गोंडवनातही अनेक कुटुंबांकडे पोहोचलेला आहे आणि महाराष्ट्रातला ८०% स्मार्टफोनचा वापर मराठीतून चालतो. २०१८-१९ मधल्या प्रशिक्षणानंतर विजयरावांनी व मी १७ प्रशिक्षितांच्या कार्यआयोजना बनवण्याचे काम पुरे केले; आता जैवविविधता नोंदणीपत्रकाचे काम करत आहोत. परस्पर संवादासाठी आमचा एक व्हाट्सअप गट संघटित केला आहे. कार्य आयोजनांमध्ये गौण वनोपज देणाऱ्या जातींची शास्त्रीय नावे भरणे आवश्यक आहे. प्रशिक्षित युवकांना आसमंतातील जीवजातींबद्दल प्रचंड कुतूहल आहे; त्यांना शेकडो जीवांची स्थानिक नावे माहीत आहेत. प्रशिक्षणातून त्यांना जीवशास्त्रीय नावांचे महत्त्व उमगले समजले आहे. ते गुगल सर्च मारण्यात, इंटरनेटवर बाजारपेठांची व गौण वनोपज पुरवणाऱ्या जातींच्या व्यापारी उपयोगांबद्दल माहिती आणि नव- नवी गूगल ॲप्स शोधण्यात तरबेज झाले आहेत.

हे युवक परिसरातल्या जीवजातींची छायाचित्रे सतत व्हाट्सअप गटावर चढवत होते आणि त्यांच्याबद्दलचे आपले अनुभव मांडत होते. जरी मी त्यांच्यातील बऱ्याच वनस्पती व प्राण्यांशी परिचित आहे, तरी मी काही वर्गीकरणतज्ज्ञ नाही. मी जंगजंग पछाडले; पण एकही तज्ज्ञ आपली मक्तेदारी सोडून आदिवासी युवकांना मदत करण्यास राजी नव्हता. मग एक दिवस मी चकित झालो, कारण आमच्या गटातलाच एक सदस्य सदुराम मडावी छायाचित्रांबरोबर शास्त्रीय नावे व्यवस्थित देऊ लागला होता. सदुरामने स्वतःहून गुगल फोटो - लेन्स हे ॲप शोधून काढले होते. गुगलकडे स्वतःचा कोट्यवधी छायाचित्रांचा डेटाबेस आहे. एखाद्याने गुगल ॲप वापरत छायाचित्र चढवल्यावर हा डेटाबेस कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे तुलना करत त्या छायाचित्र काढणाऱ्याला ताबडतोब इंग्रजी व शास्त्रीय नाव पुरवतो. जितके लोक त्यांचे ॲप वापरून फोटो काढतील तितका हा डेटाबेस समृद्ध होतो आणि गुगलला हेच हवे आहे.

गडचिरोलीतल्या नक्षलग्रस्त दुर्गम भागातल्या खरकाडी गावात राहणारा सदुराम बुद्धिमान युवक आहे. परंतु शिक्षणाची दळभद्री सुविधा व इंग्रजी भाषेच्या अडसरामुळे तो दहावी नापास आहे. आधुनिक ज्ञानयुगात या अडचणी दूर होऊ लागल्या आहेत आणि तो आता उच्चशिक्षित लोकांची मक्तेदारी बाजूला सारून ज्ञानभांडाराचा फायदा घेतो आहे. नुकतेच त्याने त्याच्या परिसरात भुईवर वाढणारे ऑर्किड Geodorum laxiflorum शोधून काढले. मग त्याने गडचिरोलीतील महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्रज्ञ मित्रांसोबत जिल्ह्यातील या जातीच्या पहिल्याच नोंदीबाबतचा शोधनिबंध Journal of Threatened Taxa या शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित केला आहे. म्हणजेच सदुराम आता औपचारिक मान्यता मिळालेला शास्त्रज्ञ बनला आहे. शोधनिबंधात त्याने स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समितीचा पत्ता दिला आहे. उघड आहे, की देशभर तळागाळातले लोक आपणहून जैवविविधता नोंदणीपत्रके तयार करून जैवविविधतेच्या संरक्षणाची व शाश्वत उपयोगाची जबाबदारी समर्थपणे पेलू शकतील.

दहाव्या संक्रमणात...

मानवासहित सर्व जीवसृष्टी अखेर उत्क्रांतीचा परिपाक आहे. ख्यातनाम उत्क्रांतिशास्त्रज्ञ मेनार्ड स्मिथ सांगतात, की आजपावेतो उत्क्रांती यात्रेतील नऊ महत्त्वाची संक्रमणे पुरी झाली आहेत. यातील प्रत्येक संक्रमणाला सहकाराचे अधिष्ठान असते आणि त्याबरोबरच जीवांचे माहिती हाताळण्याचे सामर्थ्य वाढत राहते. मानवाने प्राण्यांमधल्या परस्पर संवादांना एका वेगळ्याच, वरच्या पातळीवर पोचवून जी वाटली तरी न घटता आणखीनच वाढते अशी आगळी वेगळी ज्ञानसंपत्ती विकसित केली आहे. ज्ञानाच्या जोरावरच मानवाने पृथ्वीवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले आहे. ज्ञानसरिता अखंड वाहत, विस्तारत राहते. म्हणूनच ज्ञानदेवतेला सतत सरत वाहणारी, गतिशील सरस्वती म्हणतात. नव्या जमान्यात जाती, धर्म, औपचारिक शिक्षण या सगळ्यांना बाजूला सारून सगळे जण सरस्वतीपूजक बनू शकताहेत. मेनार्ड स्मिथ ह्यांनी २५ वर्षांपूर्वी भाकीत केले होते, की आगामी दहाव्या संक्रमणात मानवाचे सर्व ज्ञान, सर्व मानवांना भाषेचा अडसर न राहता सहजी उपलब्ध होईल. आज सहकाराधिष्ठित आधुनिक माहिती व संचार तंत्रज्ञानाच्या बळावर ही ज्ञानक्रांती प्रत्यक्षात उतरत आहे. सदुरामचा शास्त्रीय निबंध हा आपण उत्क्रांतीच्या या पुढच्या, दहाव्या ज्ञानक्रांतीच्या संक्रमणाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलो आहोत, याचे सुचिन्ह आहे. आशा बाळगू या की, या दिशेने झपाट्याने प्रगती होत राहून पुढील काही दशकांत पृथ्वीतलावर एक समतापूर्ण, सज्ञान मानवी समाज अवतरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT