vidhansabha election sakal
संपादकीय

महाराष्ट्रातील निवडणूकमंथन!

मविआ लोकसभेतले यश राखण्यासाठी, तर महायुती माघारीचे शल्य पुसून काढण्यासाठी धडपडते आहे. निवडणुकीसाठीची लढाई दिवसेंदिवस रंगतदार होत जाणार आहे.

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

राजधानी मुंबई

मविआ लोकसभेतले यश राखण्यासाठी, तर महायुती माघारीचे शल्य पुसून काढण्यासाठी धडपडते आहे. निवडणुकीसाठीची लढाई दिवसेंदिवस रंगतदार होत जाणार आहे.

मृणालिनी नानिवडेकर

मतदारयाद्या अद्ययावत होत आहेत. दोन ऑगस्टला प्रारूप याद्या प्रकाशित होतील. निवडणूक प्रक्रिया खऱ्या अर्थाने मतदारयाद्यांचे प्रारुप प्रकाशित होताच सुरु होत असते. भारतीय जनता पक्षाने या याद्यांतील दोष दूर करण्यावर भर दिला आहे. कित्येक मतदारांची नावे गहाळ असल्याने अपेक्षित यश मिळू शकले नाही, असे या पक्षातील धुरिणांना वाटते. विधानसभा मतदारसंघश: गणिते आखून मतदारनोंदणीच्या योजना पक्षाने कार्यान्वित केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यादीमोहिमेत जातीने लक्ष घालताहेत.

भाजप मुळातच शिस्तीने चालणारा, कार्यकर्त्यांचे मोहोळ बाळगणारा पक्ष. बरेच बाहेरचे आले, त्यांनाच सत्तापदे मिळाली. एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाच्या जागा कमी असताना मुख्यमंत्री झाले. अजित पवारांनाही सामावून घेतले गेले, अशा एक ना अनेक तक्रारी भाजपकार्यकर्ते करतात. हे नाराज सैन्य मतदारनोंदणीच्या कामाला सर्वशक्तीनिशी लागले आहे की नाही ,मतदानकेंद्र सशक्त झालेय की नाही याकडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रातल्या खासदारांना संसद अधिवेशन काळात ‘मतकेंद्रे’ सशक्त करण्याचा कानमंत्रही त्यांनी दिला म्हणतात. भाजपसाठी महाराष्ट्र जिंकणे महत्त्वाचे आहेच, तसेच कॉंग्रेससाठीही. मोदींचे सोनेरी दिवस संपवायची खूणगाठ कॉंग्रेसच्या नेत्यांनी बांधली होतीच; पण महाराष्ट्रात तब्बल १७ खासदार निवडून आलेल्या या पक्षाचे गावागावांत पसरलेले कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

काँग्रेसमध्ये चैतन्य

भाजपात केंद्रीय यंत्रणा काम करते, तर कॉंग्रेसमध्ये स्थानिक केडर भाजपला नमवू शकते, हा विश्वास निकालांनी दिल्याने कॉंग्रेस यंत्रणा तरारुन उठली आहे. सर्वत्र प्रचंड उत्साह पसरला आहे. जिंकण्याचे स्पिरीट कार्यकर्त्यात संचारले आहे. मतदारनोंदणीत कॉंग्रेसचे गट कुठलाही निरोप येण्यापूर्वीच सक्रिय झाले आहेत. उमेदवारी मागणारे विक्रमी अर्ज कॉंग्रेसकडे दाखल झाले आहेत अन् प्रत्येक इच्छुक आपापली मतदारनोंदणी करतो आहे. कॉंग्रेसमधला माहोल पाहून ज्येष्ठनेते शरद पवारांवर श्रद्धा असलेले ‘राष्ट्रवादी’चे दलही कामाला लागले आहे. लोकसभेत मिळालेल्या यशाने हुरुप वाढला आहे. मतदारनोंदणीत यावेळी महाराष्ट्र विक्रम करेल, अशी स्थिती आहे. अर्थात केवळ मतदार नोंदवून भागत नाही. ज्याप्रमाणे शेतात उभे झालेले पीक घरात येत नाही तोवर खरे नसते, त्याप्रमाणे यादीत नावनोंद झालेले मतदार बाहेर पडून मतदान करणार काय यावर पुढचे गणित असते.

कॉंग्रेसला संधी दिसली की पक्ष तरारुन उभा रहातो. नोंदणी,संधीसाठी विनवणी असे चित्र डोळे दिपवून टाकत असताना नेत्यांनी रचनाबांधणीवरही जोर दिला आहे. सुनील कोडुगुलू या निवडणूक व्यूहरचनाकारावर कॉंग्रेसची मदार आहे. कर्नाटक, तेलंगणा या राज्यांत त्यांनीच पक्षाला यश दाखवले. दक्षिणेत विजय मिळवून देणाऱ्या या किमयागाराला राजस्थान, मध्यप्रदेशात स्थानिक नेतृत्वाने संधी दिली नाही. मग अपेक्षित यश मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीपासूनच कोडुगुलू महाराष्ट्रावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी पक्षाला राज्याचे ब्लूप्रिंट दिलेय. कुणाला पक्षात घ्यावे, कुणी कुठे केव्हा काय बोलावे, यापासून सगळे तयार करुन दाखवले आहे. यशाने हुरळून एकटे गेलात तर होत्याचे नव्हते होईल, हेही समजावून सांगितले आहे म्हणतात. पक्षाने ११० जागा लढल्याच पाहिजेत, असे काही नेत्यांना वाटते. पण शरद पवार, उद्धव ठाकरे याला तयार होतील का, हा प्रश्न आहे.

शिंदेंचा भर किती जागांवर?

मविआ लोकसभेतले यश राखण्यासाठी तर महायुती माघारीचे शल्य पुसून काढण्यासाठी धडपडते आहे. आमदार आपल्याला सोडून स्वगृही परत तर जाणार नाहीत ना, या चिंतेने अजित पवार गटाला घेरले आहे. त्यामुळेच मंत्रिविस्तार ,महामंडळवाटप यासाठी ते आग्रही आहेत. महायुतीत सर्वात उत्साहाने लढायची तयारी करताहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ‘धर्मवीर-२’ चे गावागावांत प्रदर्शन असेल किंवा ‘नीती आयोगा’समोर महाराष्ट्रातले प्रकल्प मांडणे असो, शिंदे मेहनतीने सारे काही करत असतात.

तिसऱ्या पर्वात मोदी सरकारला आधार पुरवणाऱ्या बिहार, आंध्रप्रदेशमधील सत्ताधारी पक्षांचा विचार करून या राज्यांना भरघोस काही दिले गेले आहे. पण भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या राज्यांकडेही लक्ष पुरवणे आवश्यक आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पी भाषणात भाजपसाठी आव्हान झालेल्या महाराष्ट्राचा उल्लेखही न केल्याने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण देण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी अश्विनी वैष्णव यांनी भावी प्रकल्पांची यादी वाचून दाखवली. महाराष्ट्राला मोदींच्या पहिल्या दोन्ही राजवटीत भरभरुन निधी मिळाला हे एकनाथ शिंदे यांना ठाऊक आहे. नीती आयोगातही नदीजोड प्रकल्प, मुंबईत मरीन ड्राईव्हसारखा पर्यायी देखणा सागरीमार्ग अशा महत्त्वाकांक्षी योजनांसाठी निधी मागितला आहे. एकूणच महाराष्ट्राचा चषक जिंकण्याची लढाई रंगतदार आहेच ,ती आता रोमांचक होत जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT