आणीबाणीनंतरच्या निवडणुकांत काँग्रेसची देशभर दाणादाण उडत असताना आंध्र प्रदेशने मात्र काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. हा बालेकिल्ला पुढे ढासळेल अशी कल्पना काँग्रेसने कधीही केली नसेल. मात्र राजकारणात प्रवेशानंतर वर्षभरातच एन. टी. रामाराव (एनटीआर) यांनी ती किमया केली.
१९८३च्या विधानसभा निवडणुकीत बहुमतासाठी आवश्यक १४८पेक्षा कितीतरी अधिक जागा त्यांच्या तेलुगू देसम पक्षाने मिळवून काँग्रेसचा दारुण पराभव केला. एनटीआर यांच्या चमत्कार वाटाव्या अशा कामगिरीचा आणि व्यक्तिमत्वाचा वेध रमेश कंडुला यांनी प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे.
पदार्पणातच तेलुगू देसमला मिळालेले यश, त्यासाठी एनटीआर यांचा अथक प्रचार, सत्तेत आल्यानंतरचे धडाकेबाज निर्णय, त्यातून ओढवलेला रोष, परदेशात उपचारार्थ गेल्यावर त्यांच्याविरोधात झालेले बंड आणि ते मोडून पुन्हा मुख्यमंत्री होणे असा मोठा पट पुस्तकात आहे. यातून एनटीआर यांच्या कारकिर्दीतील कच्चे-पक्के दुवेही समजतात.
एनटीआर यांचे सत्तेतले पुनरागमन, लक्ष्मी पार्वतींशी विवाह आणि त्यातून त्यांच्या कुटुंबासह पक्षात उठलेले वादळ, जावई चंद्राबाबू नायडूंचे यशस्वी बंड आणि एनटीआर यांचे निधन हा सगळा वेगवान राजकीय पट लेखकाने विस्ताराने उलगडला आहे. हे पुस्तक म्हणजे घटनांची जंत्री नाही,तर प्रत्येक वळणावर एनटीआर यांच्या व्यक्तिमत्वाचा करून दिलेला परिचय आहे. त्यांच्या कारकिर्दीचे तटस्थ विश्लेषण आहे.
एनटीआर हे लोकप्रिय चित्रपट अभिनेते होते. त्यांनी तीनशेवर चित्रपटांत पौराणिक आणि अन्य भूमिका केल्या. मात्र त्यांचा राजकीय-सामाजिक क्षेत्राशी संपर्क नव्हता. एका मुलाखतीत अनाहूतपणे त्यांनी षष्ट्यब्दीपूर्तीनंतर सामाजिक कार्यात उतरू, असे म्हटले होते. काँग्रेसमधील असंतुष्ट एन. भास्कर राव यांच्या साह्याने त्यांनी नवा पक्ष स्थापन केला.
मात्र पक्षावर छाप आपलीच राहील, याची काळजी घेतली. किंबहुना चौदा वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत एनटीआर यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्यातील याच स्वयंभूपणाचे द्योतक होते. त्यांच्या अभिनव प्रयोगांचे दाखले लेखकाने जागोजागी दिले आहेत. त्यांनी प्रचारासाठी जुन्या शेव्हर्ले गाडीचे रूपांतर चैतन्य रथात केले.
पुढे त्याचेच अनुकरण अनेक राजकारण्यांनी केले. अभिनेता म्हणून मिळालेल्या लोकप्रियतेच्या बळावर एनटीआर यांनी राजकारणातही स्थान मिळवले, हे त्यांचे वैशिष्ट्य. लेखकाने त्यासाठी २००८मध्ये आंध्र प्रदेशातच साम्यस्थळे असणारी राजकीय स्थिती असतानाही तुलनेने तरुण असलेल्या चिरंजीवी यांची राजकीय कारकीर्द फसली, याचा दाखला दिला आहे.
एखाद्या क्षेत्रात पूर्ण ताकदीनिशी उतरायचे आणि प्रसंगी विरोधकांशी संघर्ष करायचा हा त्यांच्या व्यक्तित्वाचा पैलू लेखकाने अधोरेखित केला आहे. पहिल्या बंडावेळी आजारी असतानाही एनटीआर यांनी समर्थक आमदारांसह राष्ट्रपती भवन गाठले होते, हे त्याचेच उदाहरण. कोणताही प्रचलित राजकारणी दाखविणार नाही, अशी धमक एनटीआर दाखवत.
सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८वरून ५५वर आणण्याचे धाडस त्यांनी दाखविले. लेखकाने म्हटले आहे की रोजचे वर्तमानपत्रही न वाचणारे, राजकारणाची पार्श्वभूमी नसणारे एनटीआर यांचे राजकीय तत्त्वज्ञान एकच होते आणि ते म्हणजे गरिबांचे कल्याण. राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावायची आहे, याची त्यांना जाणीव होती.
काँग्रेसेतर पक्षांनी तेलुगू देसमबद्दल प्रारंभी दूरत्व दाखविले तरी एनटीआर यांनी मात्र आपल्या यशापयशात समविचारी पक्षांना सहभागी करून घेतले. त्यांच्या पुढाकारामुळे केंद्र-राज्य संबंधांवर केंद्राने सरकारिया आयोग नेमला.
भगवी वस्त्रे परिधान करूनही एनटीआर यांची धर्मनिरपेक्षता, सामान्यतः कोणावरच विश्वास न ठेवण्याची वृत्ती असूनही दुसरीकडे लक्ष्मी पार्वतींशी केलेला विवाह, तेलगू अस्मितेला राजकीय मुद्दा बनवूनही प्रादेशिकवादाचा न केलेला पुरस्कार, रामजन्मभूमी आंदोलनाला विरोध, त्याच वेळी अमेरिकेसह परदेशात मंदिरे बांधण्यासाठी आर्थिक योजना असे त्यांच्या व्यक्तित्वातील कंगोरे आणि विरोधाभासाच्या जागा लेखकाने दाखवल्या आहेत.
आपल्याच वाढदिवसाला पक्षाचा स्थापना दिवस करण्याच्या त्यांच्या निर्णयातून काहीसा अहंकाराचा दर्पही येई, हेही पुस्तकात ओघाने आले आहे. या गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे एकपक्षीय वर्चस्व संपुष्टात आणणे.
एनटीआर यांनी राजकारण स्वतःच्या नियमांवर केले, याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे. राजकारणात नवखे असूनही राजकारणाचे नवे व्याकरण लिहिणाऱ्या एनटीआर यांच्या धमक, दूरदृष्टी, धडाका आणि नाट्यमयता या पैलूंचे सम्यक दर्शन लेखक पुस्तकात घडवितो. विद्यमान राजकारणासाठी हे संदर्भ प्रासंगिक वाटावेत, हे लेखकाचे यश.
पुस्तक : मॅव्हेरिक मेसिहा : ए पॉलिटिकल बायोग्राफी ऑफ एन टी रामाराव
लेखक : रमेश कंडुला
प्रकाशक : पेंग्विन
पृष्ठे : ४८८, मूल्य : रुपये ५९९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.