मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्र या संस्थेला विविध रूपाने साहाय्य करण्याच्या हेतूने पुण्यातील मेळघाट ‘सपोर्ट ग्रुप’ काम करतो. संस्थेतर्फे पुण्यात नुकताच तृणधान्य महोत्सवासह बांबूच्या कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्री असा उपक्रम करण्यात आला. त्याला यंदाही पुण्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
शैलेंद्र बोरकर, पुणे
मेळघाटातील दारिद्र्य, त्यातून निर्माण झालेले कुपोषण, रोजगार, महिलांचे शोषण, कर्जबाजारीपणा या समस्यांवर कायमस्वरूपी उत्तर म्हणून संपूर्ण बांबू केंद्र ही संस्था काम करते. मेळघाटामध्ये बांबूपासून वस्तुनिर्मिती करून त्यातून या कामामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. (कै.) श्री.सुनील आणि डॉ. निरुपमा देशपांडे यांनी एका वेगळ्या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना केली. या कामाची ओळख सर्वांना व्हावी, यासाठी पुण्यात मेळघाट सपोर्ट ग्रुप गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत आहे.
मेळघाटातील वनवासी बांधव आणि प्रामुख्याने कोरकू, गोंड या समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम द्यायला हवे, या हेतूने या भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूला माध्यम बनवण्यात आले आहे. संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून स्थानिक बांबू कारागिरांच्या परंपरागत कौशल्याला प्रशिक्षणाची जोड देऊन बांबूच्या विविध आकर्षक वस्तू तयार करणारे कारागीर तयार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गेली पंचवीस वर्षे सुरू आहे. बांबूपासून तयार होणाऱ्या असंख्य वस्तूंपैकी एक नावीन्यपूर्ण वस्तू म्हणजे बांबूची राखी आणि राखी किटस्. संपूर्णपणे नैसर्गिक साधनांपासून बनविलेल्या या राख्यांच्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळतो.या कामाला शहरातूनही पाठबळ मिळावे, या दृष्टीने पुण्यात मेळघाट सपोर्ट ग्रुपतर्फे तृणधान्य महोत्सव आणि मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राच्या कारागिरांनी बनवलेल्या बांबूच्या कलाकृतींचे प्रदर्शन तसेच विक्रीचा उपक्रम राबविण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या विशेष दालनांमध्ये आणि प्रांगणात हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात तृणधान्यांची (millets) माहिती देणारे स्टॉल्स होते तसेच तृणधान्यापासून बनविलेल्या अनेक खाद्यपदार्थांचा आस्वादही घ्यायला मिळत होता. तृणधान्यापासून तयार केलेली बेकरी उत्पादने, केक, कुकीज, ब्रेड याबरोबरच पापड, लाडू, रोस्टेड मिलेट्स, मिलेट फ्लेक्स, मिलेट चिवडा, तयार पीठे यांचे स्टॉल प्रदर्शनात होते. प्रदर्शनात तृणधान्याच्या देशी बियाणांचीही माहिती दिली गेली. कानातले डुल, हेअरपीन, पेपरवेट, फ्रुटस्टँड, ट्रे, पेन स्टँड या आणि अशा बांबूपासून तयार केलेल्या अनेकविध वस्तू, तसेच कलाकृती प्रदर्शनात पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या वस्तूंची खरेदीही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे केली.
‘टाकाऊतून टिकाऊ’कडे या संकल्पनेवर आधारित घरातील चांगले पण नको असलेले कपडे, भांडी, सायकली व पेपरची रद्दी यांचे संकलनही या प्रदर्शनाच्या माध्यमातून केले जाते. त्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. समाजाप्रती संवेदनशील असलेल्या अनेकांनी या निमित्ताने विविध प्रकारचे साहाय्य केले. पुण्यात जे कपडे आणि वस्तू जमा होतात, त्यांची वाहतूक करण्यासाठी जो खर्च येतो त्यासाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात येते. त्यासाठीही नागरिक आवर्जून साहाय्य करतात, असा अनुभव संस्थेचे कार्यालयीन प्रमुख महेश डबीर यांनी सांगितला.
या उपक्रमात यंदा पाच ते सात टेम्पो एवढे कपडे संकलन झाले. हे कपडे मेळघाटासह, पुण्यातील कर्वेनगरमधील नंदाताई बराटे यांच्या नंदादीप पाळणाघर या संस्थेला आणि नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला देण्यात आले. तसेच ‘पूर्णम इको व्हिजन’संस्थेलाही ते पुनर्वापरासाठी देण्यात आल्याचे उपक्रमाचे प्रमुख दीपक जोशी यांनी सांगितले. मेळघाटातून आलेल्या कारागिरांना त्यांच्या वस्तूंची विक्री करण्यासाठी तसेच त्यांच्या वस्तूंची माहिती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एक चांगले माध्यम या निमित्ताने मिळाले. या कारागिरीला उत्तम प्रतिसाद मिळेल, हा विश्वास आम्ही त्यांना देऊ शकलो, असा अनुभव मेळघाट सपोर्ट ग्रुपचे मिलिंद लिमये यांनी सांगितला. मेळघाटात सुरू असलेल्या कामाला शक्य ते साहाय्य करण्यासाठी मेळघाट सपोर्ट ग्रुपतर्फे आयोजित या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देणाऱे सर्वजण निश्चितच मेळघाटाचे सच्चे मित्र ठरतात.
(लेखक ‘सेवा भारती’ या अखिल भारतीय संस्थेचे पदाधिकारी आहेत.)
प्रेरणादायी हातांची गाथा
माणूस उभा राहतो तो परस्परांच्या प्रेरणांतून. लढणारे हात संकटात सापडलेल्यांना प्रेरणा आणि जिद्द देतात, प्रसंगी मार्गही दाखवितात. अशाच काही लढवय्यांच्या प्रेरणादायी कथा आपल्यासमोर सादर करत आहोत. तुमच्या शेजारी असेच लढणारे लोक असतील तर त्यांची संघर्षगाथा आम्हाला पाठवा. यासाठी फक्त एकच करायचे आहे. क्यूआरकोड स्कॅन करून किंवा नावासह editor.pune@esakal.com या मेलवर तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती पाठवावी. निवडक संघर्षगाथांना आम्ही प्रसिद्धी देऊ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.