Vasant-Kanetkar 
संपादकीय

चतुरस्र नाटककार

प्रा. मिलिंद जोशी

मराठी रंगभूमीच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाची ठसठशीत नाममुद्रा उमटविणारे नाटककार वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षास आजपासून (२० मार्च) प्रारंभ होत आहे. त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला दृष्टिक्षेप.

किर्लोस्कर-देवलांपासून उदय पावलेली आणि खाडिलकर-गडकरींच्या काळात ऐश्वर्यसंपन्न झालेली मराठी रंगभूमी मूकपट आणि बोलपट निर्मितीच्या आरंभकाळात मोडकळीस आली होती. नाटक कंपन्या बंद पडल्या होत्या. नट बेकार झाले होते. प्रेक्षक सिनेमाकडे वळले होते. अशा काळात मराठी रंगभूमीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम नाटककार आचार्य अत्रेनी केले. १९५०नंतर रंगभूमीची ही समृद्धी टिकवून ठेवण्याची आणि त्यात मोलाची भर घालण्याची महत्त्वाची कामगिरी वि. वा. शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर, पु. ल. देशपांड. चिं. त्र्यं. खानोलकर, विजय तेंडुलकर या नाटककारांनी केली. गुंतागुंतीच्या मानवी जीवन व्यवहारातल्या घटनाप्रसंगातली तात्कालिकता बाजूला ठेवून उत्कटता कायम राखणारे रचना कौशल्य, उत्तम प्रयोगनिर्मिती मूल्ये आणि प्रेक्षकाभिरूचीचे भान या गुण वैशिष्ट्यांमुळे कानेटकरांची कारकीर्द नाटककार म्हणून यशस्वी ठरली.

त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचा. रविकिरण मंडळातील ज्येष्ठ सदस्य कवी गिरीश यांचे चिरंजीव असलेल्या वसंत कानेटकरांना साहित्याचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. कानेटकरांनी जेव्हा लेखनास प्रारंभ केला तेव्हा प्रा. ना. सी. फडके, वि. स. खांडेकर आदी लेखकांच्या कथा-कादंबऱ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता. नव्या होतकरू लेखकांना तो काळ आवाहकच होता; परंतु कानेटकरांचा एक  विशेष म्हणजे त्यांनी नाट्यलेखनापूर्वी कादंबरी लेखन केले ते फडकेखांडेकरांच्या वाटचालीचे नव्हते. आल्बेर कामू, सार्त्र यांच्या संदर्भातले होते. त्यांच्या ‘घर’ आणि ‘पोरका’ या दोन कादंबऱ्या त्याच्या साक्षी आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘वेड्याचे घर उन्हात’ हे त्यांचे पहिले नाटक. पुण्यातील ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ या नाट्यसंस्थेने केले. या नाटकापासून ‘पीडीए’ आणि कानेटकर यांच्या नाट्यवाटचालीतील एका नव्या पर्वाचा आरंभ झाला. ‘वेड्याचे घर’च्या पार्श्वभूमीवर कानेटकरांनी ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देवांचे मनोराज्य’, ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’ ही वेगळ्या स्वरुपाची नाट्यलेखने केली. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हे नाटक कानेटकरांच्या लेखनप्रवासातील जसा एक मानबिंदू आहे, तसंच एकूण मराठी सुखात्मिका, नाट्यलेखनातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या त्यांच्या ऐतिहासिक नाटकाने प्रयोगसंख्येचे उच्चांक निर्माण केले आणि कानेटकर व्यावसायिक नाटककार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘तुझा तू वाढवी राजा‘, ‘जिथे गवतास भाले फुटतात’, ‘आकाशमिठी’ आणि नंतरच्या काळात ‘गरुडझेप’ ही ऐतिहासिक विषयावरची नाटके कानेटकरांनी लिहिली. 

संगीत नाटक लिहिण्याचे कानेटकरांचे स्वप्न ‘मत्स्यगंधा’ या नाटकामुळे सफल झाले. अभिजात संस्कृत आणि मराठी नाटकांचा वारसा स्वीकारत पारंपरिकता आणि नवता यांचा सुमेळ सांगीतिक अंगांनी या नाटकात सिद्ध झाला. ‘मीरा-मधुरा’ या नाटकात त्यांनी पारंपरिक पद्धतीने संत मीराबाईंचे चरित्रगान नाटकात मांडले नाही तर तिच्या श्रीकृष्णप्रीतीचा-भक्तीचा, आंतरिक नात्याचा वेध घेतला. कानेटकरांनी इतिहास, पुराणातील व्यक्तिरेखा जशा नाट्य विषयांसाठी निवडल्या तशाच समाज वास्तवातील किंवा नजिकच्या इतिहासकाळातील परिचित व्यक्तीही निवडल्या. त्यात बाबा आमटे, हिराबाई पेडणेकर, महर्षि अण्णासाहेब कर्वे, इतिहासाचार्य राजवाडे, बालकवी यांची निवड केली. त्यातून हिमालयाची सावली, कस्तुरीमृग, वादळ माणसाळतंय, विषवृक्षाची छाया यासारखी नाटके लिहिली. 

संघर्षाचे वेगळे परिमाण
या नाटकांचा गौरव करताना वि. स. खांडेकर म्हणतात, “वाईट आणि चांगले यांच्या संघर्षापेक्षा चांगलं आणि अधिक चांगलं यांचा संघर्ष अधिक चांगला असतो. तो रंगविणेही कठीण असते. ते आव्हान कानेटकरांनी स्वीकारले आणि पेललेही. कानेटकरांच्या व्यावसायिक नाटकांमध्ये ‘बेइमान’ दोन कारणांसाठी लक्षवेधी ठरले. कानेटकरांनी या नाट्यलेखनासाठी नाटककार ज्याँ अनुई यांच्या ‘बेकेट’ नाटकाचा आराखडा स्थूलरुपाने समोर ठेवला. अनुई यांच्या नाटकातला संघर्ष राजसत्ता आणि धर्मसत्ता असा आहे. भारतीय जीवनात अशी पार्श्वभूमी शोधावी लागते. कानेटकरांनी मराठी जीवनाशी जुळणारा नाट्यआराखडा तयार केला. दोन मित्रांच्या स्नेहभावात मालक आणि मजूर यांच्या संघर्षावर कानेटकरांनी हे नाटक उभे केले. ‘अखेरचा सवाल’ आणि नंतर आलेले ‘अधूंची झाली फुले’ ही कानेटकरांची नाटके लोकप्रिय ठरली. ‘माणसाला डंख मातीचा, एक रूप अनेक रंग, गाठ आहे माझ्याशी, गोष्ट जन्मांतरीची’ अशी काही नाटके कानेटकरांनी प्रेक्षक आणि नाट्यनिर्मात्यांच्या मागणीनुसार लिहिली. त्याचे प्रयोग नाटकाच्या ताकदीनुसार होत राहिले. ‘लेकुरे उदंड झाली‘ या नाटकात परस्परांवर प्रेम करणाऱ्या पती-पत्नींच्या सांसारिक जीवनातील ‘निपुत्रिकत्व’ हा नाजूक आणि हळवा विषय असूनही कानेटकरांनी हा विषय खेळकरपणे हाताळला. कोणत्याही प्रयोगशील नाट्यलेखन करणाऱ्या लेखकाला जसे विविध विषय आवाहन करीत असतात, तसेच वेगवेगळ्या आविष्कार पद्धतीही वापरण्याचा मोह होत असतो. कानेटकरही त्याला अपवाद नव्हते. त्यांनाही गंभीर विषय-आशय व्यक्त करण्याबरोबरच विनोद, प्रहसन, विडंबन, अद्‌भुतता यांचा उपयोग करून नाट्यलेखन करण्याची आवड होती. ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक विनोद विडंबन या अंगाने प्रयोगात रंगतदार होत गेले. त्यांच्या या सर्जनयात्रेमुळे मराठी साहित्यातील नाटकांचे दालन समृद्ध झाले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT