Flamingo Bird sakal
संपादकीय

भाष्य : आकाशातील जीवघेणा धडा!

मुंबईत विमानाच्या धडकेने फ्लेमिंगोंच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या मृत्यूमुळे विमान वाहतुकीसह पक्ष्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

- किशोर रिठे

मुंबईत विमानाच्या धडकेने फ्लेमिंगोंच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या मृत्यूमुळे विमान वाहतुकीसह पक्ष्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याबाबत शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायला हवा. तसेच विकासप्रकल्पांमुळे निर्माण होणारे प्रश्‍न लक्षात घेऊन उपाययोजना केल्या पाहिजेत.

मुंबईत २० मे रोजी रात्री विमानाने धडक दिल्याने ३९ अग्निपंख म्हणजेच लेसर फ्लेमिंगो पक्ष्यांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. विमानाचीही हानी झाली. नशीब बलवत्तर म्हणून विमान प्रवासी सुखरूप राहिले. परंतु या घटनेमुळे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर भीतीचे सावट निश्चितच पडले आहे. या घटनेचा सखोल तपास गरजेचा आहे.

विमान वाहतुकीमध्ये पक्ष्यांच्या संचाराने जगभर अनेक भयावह अपघात नोंदविले आहेत. हे रोखण्यासाठी प्रवासी पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास केला जातो. प्रवासी पक्ष्यांच्या संशोधनामध्ये भारतातील १४१वर्षे जुनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ही संस्था काम करीत आहे. संस्थेचे अभ्यास केंद्र मुंबईनजीक उरण येथेही आहे.

रोहित म्हणजेच मोठे अग्निपंख (Flamingo) पक्षी तसेच गॉडवीट, रेडशांक, युरेशीयन कर्लयू, कसपीयन टर्न (सुरय), प्लोवर असे अनेक समुद्री पक्षी येथे हजारोंच्या संख्येने दरवर्षी येतात. ‘बीएनएचएस’ने समुद्री तसेच प्रवासी पक्ष्यांचा अभ्यास करतांना १९९५पासून सुमारे सतरा प्रजातींच्या १७५ पक्ष्यांना उपग्रहीय टॅग बसवून त्यांच्या उड्डाण मार्गांची माहिती जमविली आहे.

त्यांच्या स्थलांतराचा जो अभ्यास ‘बीएनएचएस’द्वारे सुरू आहे त्यावरून पक्ष्यांचे हवाई मार्ग, या प्रदेशातील त्यांच्या संचार मार्गातील हवाई वाहतूक यासारख्या विषयांवर महत्वपूर्ण माहिती संस्थेकडे आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांसारख्या आकाराने मोठ्या पक्ष्यांसोबतच चिमणीच्या आकाराचे पक्षीही असे दीर्घ पल्ल्याचे स्थलांतर करतात, हे सिद्ध झाले आहे.

उत्तरेकडील हिमाच्छादित देशांत खाद्याचा तुडवडा जाणवला की, अनेक पक्षी हिवाळ्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करतात, असा पूर्वी समज होता. परंतु काही पक्षी चक्क आफ्रिकेतून भारतात येतात, हेही दिसून आले आहे.

विश्लेषणात्मक अभ्यास गरजेचा

मुंबईतील घटना सातशे फूट उंचीवर घडली. फ्लेमिंगो त्यांच्या समुद्री अधिवास आणि भरतीवेळी निवडलेले निवारा अधिवास यादरम्यान उड्डाण करतांना कमी उंची ठेवतात. तसेच ते स्थलांतर प्रवासात असतील तरच तब्बल दोन हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करतात. रात्री पावणेनऊला घाटकोपरवरील आकाशातील हा थवा नेमका कोणत्या निवारा अधिवासातून उडला, का उडाला आणि अपघातावेळी किती उंचीवर होता, या गोष्टी अभ्यासाचा विषय आहेत.

यातूनच या घटनेस वैमानिक किती जबाबदार, हेही निष्पन्न होईल. या निमित्ताने “सागरी पक्षी आणि मुंबईनजीकचे विकास प्रकल्प” यांचा प्रकल्पनिहाय विचार न करता मुंबईचा समग्र भौगोलिक प्रदेश डोळ्यासमोर ठेवून एकत्रित परिणाम तपासणारा विश्लेषणात्मक अभ्यास गरजेचा आहे, ही बाब स्पष्ट झाली.

अनेक पक्षी प्रजाती हजारो किलोमीटर अंतर कापून उत्तरेकडून दक्षिणेकडे, तसेच आशिया खंडातून आफ्रिका खंडात, युरोपातून आशिया खंडात तसेच त्या उलटसुद्धा प्रवास करतात. रोहित पक्षी म्हणजे ग्रेटर फ्लेमिंगो आपल्याकडे आफ्रिकेतून येतात. परंतु अपघात झालेले लेसर फ्लेमिंगो प्रजननासाठी गुजरातमध्ये जातात.

भारतात अशा सर्व प्रवासी पक्ष्यांना आश्रय देणारी २.२ हेक्टरपेक्षा अधिक आकाराची सुमारे  सव्वादोन लाख पाणथळ क्षेत्रे आहेत. याव्यतिरिक्त साडेपाच लाख लहान पाणथळ जागाही आहेत. यातील  जवळपास साठ हजार मोठी पाणथळ क्षेत्रे संरक्षित वनक्षेत्रांत आहेत. ती विकास प्रकल्पांच्या धोक्यापासून सुरक्षित मानली जाऊ शकतात. परंतु या वनक्षेत्राबाहेरच्या पाणथळ जागांची परिस्थिती गंभीर आहे.

मुंबई समुद्री क्षेत्रातील ठाणे खाडी, शिवडी आणि उरण येथील भरती-ओहोटी दरम्यानच्या क्षेत्रातील पाणथळ खाजण जागेमध्ये फ्लेमिंगो पक्षी भक्ष्य पकडण्यात जास्तीत जास्त वेळ घालवतात. भरतीवेळी ते वाशीमधील दिल्ली पब्लिक शाळेनजीकचे पाणथळ, टी.एस. चाणक्यनजीकचे पाणथळ, एनआरआय कॉम्प्लेक्स, पांजे, बेलपडा, भेंडखाल आणि भांडुप पंपिंग स्टेशन येथील पाणथळांच्या आश्रयाला येतात.

या सर्वांचे समुद्रापासूनचे अंतर, त्यांची खोली, त्यामधील खाद्य आणि त्यावरील जैविक दबाव यावर या पक्ष्यांचा वावर अवलंबून असतो. फ्लेमिंगो तसेच इतर पक्षी प्रजातींच्या या पाणथळ जागांवरील खाण्याच्या सवयी, प्राथमिकता याबाबतच्या संशोधनातून ‘बीएनएचएस’कडे भरपूर शास्त्रीय माहिती आहे. त्या आधारे आपण निष्कर्षाप्रत पोहोचू शकू.

‘एमएमआरडीए’च्या अखत्यारीतील या भागात सध्या प्रचंड जैविक दबाव असल्याचे दिसते. पांजे, ‘एनआरआय’सारख्या काही पाणथळ जागांचे अस्तित्वच धोक्यात आहे. इतर जागांभोवती प्रस्तावित विकास प्रकल्पांमुळे अनेक समस्या आहेत. मुंबईतील जुनाट वास्तू पाडून त्याजागी गगनचुंबी इमारती होत आहेत. पाडलेल्या वास्तूंचा मलबा नवी मुंबईतील या पाणथळ जागा, किनाऱ्यालगतची कांदळवने, मिठागरांमधून जाणारे बांध यांच्याभोवती टाकला जातो.

नवी मुंबईमध्ये वाशी, बेलापूर, खारघर भागात कच्च्या बांधांवर तो मोठ्या प्रमाणावर दिसतो. भरतीवेळी समुद्राचे पाणी ज्या ओढ्यावाटे शहरातील सखल भागाकडे येते तेथेच मलबा टाकल्याने अनेक ठिकाणी हे नैसर्गिक ओढे बंद झालेले दिसतात. ओढ्यामध्ये समुद्राचे खारे पाणी येणे बंद झाल्याने ओढ्यांच्या आश्रयाने वाढलेली कांदळवणे सुकली आहेत. त्यातच ‘सिडको’सारख्या संस्था या बांधांवर नवे रस्ते उभारण्याचे प्रकल्प आखत आहेत.

प्रस्तावित जेट्टीचीही भर पडत आहे. नवी जेट्टी बांधण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर खोलीकरण करतांना मोठ्या प्रमाणावर निघणारा मलबा नव्या समस्या निर्माण करतो. जेट्टीच्या सोबतीने उभारलेले व्यावसायिक सोईसुविधा संकुल मग समुद्री जीवांसाठी कायमस्वरूपी कर्दनकाळ ठरतात. ‘बीएनएचएस’ने याबाबत वेळोवेळी शास्त्रीय अहवाल सादर केलेले आहेत. त्यांच्यावर अनेक न्यायालयीन प्रकरणांमध्ये चर्चाही सुरू आहे.

मागील दहा वर्षांमध्ये नवी मुंबई विमानतळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफा असा केबल कार प्रकल्प, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते तुंगारेश्वर अभयारण्य यांना जोडणाऱ्या वन्यप्राणी संचारमार्गातून जाणारी बुलेट ट्रेन, मुंबई-अहमदाबाद मल्टीमोडल कॉरीडॉर, दिल्ली-मुंबई मालवाहतूक रेल्वेमार्ग ,आरे कारशेड, राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा प्रस्तावित ठाणे-बोरिवली भुयारी रस्ता, बांद्रा-वरळी सी लिंक हा दहा किलोमीटरचा समुद्री महामार्ग, अटल सेतू असे अनेक प्रकल्प चर्चेत आले. त्यांच्यासाठी एकतर वनजमीन/कांदळवने हवी होती किंवा त्यांच्यामुळे वन्यजीव अधिवास, समुद्री जलचर, पाणपक्षी यांच्या अधिवासांना धोका असल्याने ते चर्चेत आले.

काही महिन्यांपासून सातत्याने घडणारे पक्ष्यांचे मृत्यू यापैकीच काही प्रकल्पक्षेत्रांमधील आहेत. या घटनेमुळे विमान वाहतुकीस निर्माण झालेला गंभीर धोका प्रकर्षाने समोर आला. शिवाय, प्रस्तावित नवी मुंबई विमानतळानजीक गुंतवणूक करणाऱ्यांची व त्यांना निधी देणाऱ्या बँका यांचीही चिंता वाढविली आहे.

(लेखक ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT