Baba Siddique Esakal
संपादकीय

राजधानी मुंबई : महानगरीत समाजकंटकांचा धुमाकूळ

सत्तारूढ महायुतीशी जवळीक साधलेल्या एका माजी मंत्र्याला गोळ्या झाडून मारले गेले; तेदेखील निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना. सुरक्षा व्यवस्थेविषयी काळजी वाटावी, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मृणालिनी नानिवडेकर

सत्तारूढ महायुतीशी जवळीक साधलेल्या एका माजी मंत्र्याला गोळ्या झाडून मारले गेले; तेदेखील निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना. सुरक्षा व्यवस्थेविषयी काळजी वाटावी, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत केव्हा काय घडेल हे सांगणे कठीण. चाकरमाने जीव मुठीत घेऊन जगतात अन् धनदांडगे मुंबई मुठीत ठेवण्यासाठी तनमनधनाने काम करतात. सत्तारूढ महायुतीशी जवळीक साधलेल्या एका माजी मंत्र्याला गोळ्या झाडून मारले गेले; तेदेखील निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना! ‘वाय’ सुरक्षा दिमतीला असलेल्या बाबा सिद्दीकींना गोळ्या घालून टिपले गेले. या घटनेला अनेक पदर आहेत.

‘ऐ जान बचके...’ सांगणाऱ्या बॉलिवुडी वर्तुळात बाबांची उठबस. ज्येष्ठ अभिनेते आणि हाडाचे काँग्रेसी सुनील दत्त यांच्या देखरेखीत तयार झालेल्या मोजक्या पण तळमळीच्या कार्यकर्त्यांपैकी ते एक होते. मुंबईत राजकारणी, सिनेव्यावसायिकांचे जागांचे व्यवहार करणारे आणि बांधकामातील शार्क यांचे जे काय साटेलोटे आहे, ते मती गुंग करणारे आहेत. बाबा सिद्दिकी अनेक वर्षे राजकारणात आहेत. शाहरुख-सलमान यांच्यात समेट

घडवला, तो बाबा सिद्दिकींनी. स्वतःच्या पदाचा वापर करून कित्येकांना मदत करत. वेळप्रसंगी व्यवस्था वाकवत.

हादरवणारी बाब

बाबा सिद्दिकी यांना धमकी आल्यानंतरही त्यांचे प्राण सरकारला वाचवता आले नाहीत. ही हादरवणारी बाब आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था गेल्या काही महिन्यात ढासळली आहे. बलात्काराच्या घटनांत वाढ होतेय. आता तर निवडणुका जवळ येत असताना राजकीय हत्यांचे प्रकार घडू लागले आहेत. अशा रीतीने घडलेल्या या हत्येमुळे गृहखाते सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मागितला आहे.

महायुतीचा कारभारावर टीकेचे मोहोळ उठणार हे निश्चित आहे. केवळ दोन-तीन आठवडे विद्यमान सरकारचा कालावधी उरलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या लौकिकाला गेल्या काही दिवसातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या घटनांनी गालबोट लावले आहे. कार्यक्षम व्यावसायिक दल म्हणून ओळख असलेले मुंबई पोलीस सूचना मिळालेली असतानाही एका महत्त्वाच्या माणसाचा प्राण वाचवू कसे शकले नाहीत, हा मुद्दा भयावह आहे.

वादात अडकलेल्या नियुक्त्या

मुंबई पोलीस दलात होत असलेल्या नेमणुका हा कायम वादाचा मुद्दा. अनिल देशमुख महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना जे आरोप- प्रत्यारोप झाले ते अद्याप जनतेच्या विस्मृतीत गेलेले नाहीत. ‘दोन- दोन आयुक्त शहरात असताना अशा हत्या होतात कशा’, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईसारख्या महानगरात कोणीही येते आणि कोणालाही टिपून जातं हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे.

राज्यातील पोलीस दलाच्या प्रशासनक्षमतेवर प्रश्न निर्माण करणारा आहे. घटना घडल्यानंतर केवळ काही तासांतच मुंबई पोलिसांनी त्यांनी दोन आरोपी कसे पकडले, त्या दोन आरोपींनी पिस्तुल कुठून आणले, डिलिव्हरी बॉयने कशाप्रकारे हे पिस्तूल एक दिवस आधीच पोचवले याच्या बातम्या माध्यमापर्यंत पोहोचवण्यात कोणतीही कसूर सोडलेली नाही.

अशीच काळजी त्यांनी केवळ काही दिवस आधी घेतली असती तर कदाचित एक जीव वाचला असता. प्रश्न पडतो तो पोलीस दलातील व्यावसायिकतेचा. कोणत्याही अधिकाऱ्याची नेमणूक झाल्यानंतर तो कोणाचा, त्याला कोणी नेमले, त्यामागचे रहस्य काय, असे अनेक प्रश्न दुर्दैवाने मुंबईत उपस्थित होतात. हे लाजिरवाणे नव्हे काय? समाजकंटकांना मोकळे रान तर मिळाले नाही ना, असा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे.

आमदार आणि बांधकामव्यावसायिक यांची हातमिळवणी लपलेली नाही. कधीकाळी जे लोकप्रतिनिधी बांधकाम व्यवसायिकांच्या वृत्तीवर आक्षेप घेत असत तेच नंतर त्यांचे भागीदार होऊ लागले आणि या मुंबईकडे केवळ ‘रिअल इस्टेट’ या भूमिकेतून पाहिले जाऊ लागले. मुंबईत अशाप्रकारे नेत्यांचा खून होणं हे नवं नाही.

विठ्ठल चव्हाण असतील रामदास नायक असतील, प्रेमकुमार शर्मा असतील, किंवा अभिषेक घोसाळकर असतील, या साऱ्यांनी अभद्र युतीमुळेच कुठेतरी आपलं जीवन गमावले. सिद्दीकी यांची हत्या बिष्णोई टोळीने घडवून आणली, असा आरोप केला जात असला तरी प्रत्यक्षात तो खराच खरा आहे ना, की ही काही धूळफेक आहे, याचा बारकाईने तपास करावा लागेल.

गेले काही दिवस ज्या काही चर्चा सुरू होत्या, त्या चर्चांनुसार बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झीशान सिद्दिकी यांच्या मतदारसंघात कित्येक कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली होती. त्या विकासकामांचा लाभ मिळू न शकलेल्या एखाद्या नाराज कंत्राटदाराने हा प्रकार केला का, अशीही शंका घेतली जाते. ते तपासावे लागेल.

सरकार कोणाचंही असो; गृहमंत्री कोणीही असो, मुंबईतील ही दुरवस्था ताबडतोब संपायला हवी. ती संपवण्यासाठी जी कोणती पावलं उचलायची असतील ती उचलावीत. महानगराचा चेहरा हा ‘कार्यसंस्कृतीचे शहर’ असाच असला पाहिजे; टोळीचे राज्य चालणाऱ्या शहराचा नव्हे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT