G20 Sakal
संपादकीय

भाष्य : मानवकेंद्रित जागतिकीकरण

‘जी २०’ शेवटच्या घटकापर्यंत नेताना, कोणालाही मागे राहू न देण्याचा आमचा निर्धार आहे. भारतासाठी जी-२० अध्यक्षपद हा केवळ उच्चस्तरीय राजनैतिक कार्यक्रम नाही.

नरेंद्र मोदी

‘जी २०’ शेवटच्या घटकापर्यंत नेताना, कोणालाही मागे राहू न देण्याचा आमचा निर्धार आहे. भारतासाठी जी-२० अध्यक्षपद हा केवळ उच्चस्तरीय राजनैतिक कार्यक्रम नाही. लोकशाहीची जननी आणि विविधतेचे प्रारूप म्हणून आम्ही या अनुभवाची कवाडे जगासाठी खुली केली आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील मानवकेंद्रितता अधोरेखित झाली आहे.

‘वसुधैव कुटुंबकम्’ या दोन शब्दांमध्ये सखोल तत्त्वज्ञान सामावलेले आहे. हे जग म्हणजे कुटुंब आहे, हा एक सर्वसमावेशक विचार आहे, जो आपल्याला सीमा, भाषा आणि विचारसरणी यांच्यापलीकडे नेतो. हा विचार प्रगतीसाठी प्रेरित करतो.

भारताच्या ‘जी-२०’ अध्यक्षतेच्या काळात याचे रुपांतर मानवकेंद्री विकासाच्या आवाहनात झाले आहे. आपण सर्व आपल्या पृथ्वीचे जतन-संवर्धन करण्यासाठी एकत्र येत आहोत. एक कुटुंब म्हणून आपण परस्परांना विकासासाठी पाठबळ देत असून सर्वजण एका सामाईक भविष्याच्या दिशेने एकत्र वाटचाल करत आहोत.

महासाथीनंतर जगाची स्थिती महासाथीपूर्व काळापेक्षा खूपच वेगळी आहे. यामध्ये इतर बदलांबरोबरच तीन महत्त्वाचे बदल झाले आहेत. पहिला बदल म्हणजे आता जगाच्या ‘जीडीपी’केंद्रित दृष्टिकोनापेक्षा मानवकेंद्रित दृष्टीकोनाकडे वळण्याची गरज असल्याची भावना वाढीला लागत आहे.

दुसरा बदल म्हणजे जागतिक पुरवठा साखळीच्या चिवटपणाचे आणि विश्वासार्हतेचे महत्त्व जगाला पटू लागले आहे. तिसरा बदल म्हणजे, जागतिक संस्थांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून बहुपक्षवादाला चालना देण्याचा सामूहिक सूर व्यक्त होऊ लागला आहे.

या सर्व बदलांमध्ये आपल्या जी-२० अध्यक्षतेने एका उत्प्रेरकाची भूमिका बजावली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये ज्यावेळी आम्ही इंडोनेशियाकडून अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली, तेव्हा मी लिहिले होते की, मानसिकतेमधील बदलाला ‘जी-२०’ने चालना देण्याची गरज आहे.

ग्लोबल साऊथ आणि आफ्रिकेतील विकसनशील देशांच्या आकांक्षांना मुख्य प्रवाहात आणण्यासंदर्भात याची विशेषत्वाने गरज होती. १२५ देशांचा सहभाग असलेल्या ‘ग्लोबल साऊथ शिखर परिषदे’मधून घुमलेला आवाज, हा आमच्या जी-२० अध्यक्षतेखालील उपक्रमांमधील एक महत्त्वाचा उपक्रम होता.

ग्लोबल साऊथ देशांचे अभिप्राय आणि त्यांच्या संकल्पना, त्यांचे विचार जाणून घेण्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम होता. भारताच्या अध्यक्षतेच्या कालावधीत ‘जी-२०’मध्ये आफ्रिकी देशांकडून आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग नोंदवला गेला. एवढेच नव्हे तर आफ्रिकी संघातील देशांचा ‘जी-२०’चे स्थायी सदस्य म्हणून समावेश करण्याची मागणीही ठामपणे मांडण्यात आली.

एकमेकांशी जोडले गेलेले आपले जग म्हणजे विविध क्षेत्रांतील आपली आव्हानेही एकमेकांशी जोडलेली असणे आहे. वर्ष २०३०साठीच्या कार्यक्रमपत्रिकेतील उद्दिष्टांचा अर्धा प्रवास पूर्ण करण्याचे हे वर्ष आहे आणि अनेकांना अशी चिंता सतावते आहे की, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (एसडीजी) प्रगतीचा मार्ग काहीसा भरकटला आहे.

तो ‘जी-२०(२०२३) कृतियोजनेद्वारे अंमलबजावणीची योग्य दिशा निश्चित करेल. भारतात, निसर्गाशी एकरूप होऊन जगणे ही प्राचीन काळापासूनची सामान्य जीवनपद्धती आहे. त्यामुळे आधुनिक काळातही हवामानबदलविषयक कृतीमधील योगदानाचा आपला वाटा आपण व्यवस्थित उचलत आहोत.

‘ग्लोबल साउथ’मधील अनेक देश सध्या विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि म्हणूनच हवामानबदलविषयक कृती त्या त्या टप्प्यांनुसार ठरवायला हवी. हवामान बदलविषयक कृतीच्या आकांक्षा आपल्या हवामानबदलविषयक वित्तपुरवठा आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतर यांच्या कृतीशी जुळल्या पाहिजेत.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काय करायला नको, अशा निर्बंधात्मक दृष्टिकोनापेक्षा काय केले पाहिजे त्यावर लक्ष केंद्रित करुन रचनात्मक धोरण स्वीकारावे,ही आमची भूमिका आहे. शाश्वत तसेच लवचिक ‘नील अर्थव्यवस्थे’साठी चेन्नई एचएलपीएसमध्ये आपले महासागर अधिक निरोगी राखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

आपल्या अध्यक्षतेतून हरित हायड्रोजन नवोन्मेष केंद्रासह, स्वच्छ आणि हरित हायड्रोजनसाठीची जागतिक परिसंस्था उदयाला येईल. २०१५मध्ये आपण ‘आंतरराष्ट्रीय सौर आघाडी’ स्थापन केली. आता, जागतिक जैवइंधन आघाडीच्या माध्यमातून आपण चक्राकार अर्थव्यवस्थेच्या फायद्याशी सुसंगत असणारे ऊर्जा स्थित्यंतर शक्य होण्यासाठी जगाला मदत करत आहोत.

शाश्वत पर्यावरणासाठी जीवनशैली

हवामान बदलविषयक कृतीचे लोकशाहीकरण करणे, हा चळवळीला गती देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ज्याप्रमाणे व्यक्ती आपल्या दीर्घकालीन आरोग्याचा विचार करून  दैनंदिन निर्णय घेतात, त्याचप्रमाणे सामूहिक जीवनशैलीदेखील आपल्या आणि पृथ्वीच्या आरोग्याला अनुकूल अशी ठेवायला हवी. ज्याप्रमाणे निरामयतेसाठी योग एक जागतिक लोकचळवळ झाली आहे, त्याचप्रमाणे आपण शाश्वत पर्यावरणपूरक जीवनशैली (LiFE)ने जगाला प्रेरित केले आहे.

हवामान बदलाच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर, अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वाचे. मिलेट्स अर्थात भरडधान्ये  किंवा श्री अन्न, क्लायमेट-स्मार्ट शेतीला चालना देत यासाठी साहाय्यकारी ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षात भरडधान्यांना आपण जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. अन्न सुरक्षा आणि पोषणविषयक आव्हानांवर कृती सांगणारी ‘डेक्कन हाय लेव्हल प्रिन्सिपल्स ऑन फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन’ ही तत्त्वेदेखील या दिशेने उपयुक्त आहेत.

तंत्रज्ञान परिवर्तनकारी आहे; पण ते सर्वसमावेशक बनवायला हवे. भूतकाळात, तांत्रिक प्रगतीचे फायदे समाजातील सर्व घटकांना समान रीतीने लाभले नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर विषमता रुंदावण्याऐवजी त्या कमी करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, हे भारताने गेल्या काही वर्षांत दाखवून दिले आहे.

उदाहरणार्थ, जगभरातील अब्जावधी लोक जे बँक सेवेपासून वंचित राहतात किंवा ज्यांना डिजिटल ओळख नसते, अशा लोकांसाठी, ‘डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधे’द्वारे वित्तीय समावेशन करणे शक्य आहे. आपण आपल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून तयार केलेल्या उपायांची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे.

आता, जी २० च्या माध्यमातून, आम्ही विकसनशील देशांना सर्वसमावेशक विकासाची शक्ती जागृत करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी अनुकूलन निर्माण करू.

भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, हा योगायोग नाही. आपल्या साध्या, मोठा आवाका असलेल्या आणि शाश्वत उपायांनी समाजाच्या असुरक्षित आणि उपेक्षित घटकाला आपली विकासाची गाथा पुढे नेण्यासाठी सक्षम केले आहे.

अवकाश क्षेत्रापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, अर्थव्यवस्थेपासून ते उद्योजकतेपर्यंत, भारतीय महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एकूण विकासालाही गती मिळत आहे, हे विशेष  भारताच्या जी-२० अध्यक्षपदाअंतर्गत आपण लिंगाधारित डिजिटल तफावत दूर करण्याचा, कामगारांच्या सहभागामधील तफावत कमी करण्याचा आणि महिलांचा नेतृत्व आणि निर्णयप्रक्रियेमधील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.

भारतासाठी जी-२० अध्यक्षपद हा केवळ उच्चस्तरीय राजनैतिक कार्यक्रम नाही. लोकशाहीची जननी आणि विविधतेचे मॉडेल म्हणून आम्ही या अनुभवाची कवाडे जगासाठी खुली केली आहेत. उद्दिष्टांची पूर्तता या निकषावर भारताने चांगली कामगिरी केली. ही एक लोक-नेतृत्वाखालील चळवळच बनली आहे.

भारताच्या विशाल भूभागावर ६० शहरांमध्ये २००पेक्षा जास्त बैठकी आयोजिण्यात आल्या असून, आपल्या कार्यकाळात १२५  पेक्षा जास्त देशांच्या जवळजवळ एक लाख  प्रतिनिधींनी या बैठकींना हजेरी लावली. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या ‘जी२०’अध्यक्षपदाअंतर्गत एवढा विशाल आणि वैविध्यपूर्ण भूभाग व्यापला गेला नाही.

भारताची लोकशाही, विविधता,विकास याविषयी नुसते ऐकणे वेगळे आणि अनुभवणे वेगळे. त्यादृष्टीने ‘जी -२०’ परिषदेतील प्रतिनिधींना भारताच्या वैशिष्ट्यांचा प्रत्यय येईल. आपण अध्यक्षपदाच्या भूमिकेतून सगळ्यांना एकत्र आणण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहोत. जगाचे पोषण करणाऱ्या सहकार्याची बीजे रोवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

ऐक्यावर भर देण्याचे आपले धोरण आहे. ‘जी- २०’ चे अध्यक्ष या नात्याने प्रत्येक आवाज ऐकला जाईल आणि प्रत्येक देशाचे योगदान राहील, हे आवर्जून पाहिले. त्यायोगे जागतिक अवकाश विस्तारण्याचा निर्धार केला. त्याला कृतीची जोड दिली. एकूणच या उद्दिष्टांबद्दल मी आशावादी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT