yuvraj bin salman with zelensky sakal
संपादकीय

भाष्य : सौदीची धोरणात्मक प्रतिमानिर्मिती

जागतिक पटलावर मध्यस्थाच्या भूमिकेतून आपली प्रतिमानिर्मिती आणि देशात स्वतःचे स्थान पक्के करण्याचा प्रयत्न सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी चालवले आहेत.

निखिल श्रावगे

जागतिक पटलावर मध्यस्थाच्या भूमिकेतून आपली प्रतिमानिर्मिती आणि देशात स्वतःचे स्थान पक्के करण्याचा प्रयत्न सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी चालवले आहेत. त्यासाठी त्यांनी दोन्हीही आघाड्यांवर दमदार पावले टाकणे चालवले आहे. संयुक्त अरब अमिरातीही त्याच वाटेने जात आहे.

सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात रशिया-युक्रेन युद्धाबाबत तोडगा काढण्यासाठी मागील आठवड्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सुमारे चाळीस देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. भारताचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले.

सौदी अरेबियाने यजमानपद सांभाळत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सुचवलेल्या दहा कलमी शांततेच्या प्रस्तावावर चर्चा करीत मार्ग काढण्यासाठी ही बैठक बोलावली. आता सुमारे दीड वर्षे सुरू असलेल्या या युद्धाने जगभरातील अर्थव्यवस्थेवर आणि पुरवठा नियोजनावर परिणाम दाखवायला सुरुवात केली आहे.

या युद्धाच्या सुरुवातीपासूनच आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत, अशी भूमिका घेणारा सौदी अरेबिया; या युद्धाचे बदलते स्वरूप आणि त्यातून बाहेर निघण्याच्या मार्गाचा धांडोळा घेणे आवश्यक ठरते.

सोव्हिएत संघराज्याच्या विघटनाची सल बोचत असलेल्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियाच्या सीमाविस्ताराचा एककलमी कार्यक्रम सुरू केला आहे. २०२४च्या मार्च महिन्यात रशियात अध्यक्षपदाची निवडणूक आहे.

पुतीन यांनी त्यांच्या प्रमुख विरोधी नेत्यांना आधीच तुरुंगाची हवा खायला पाठवले असले आणि निवडणुकीची पूर्ण व्यवस्था आपल्या ताब्यात ठेऊन आपला विजय सुकर केला असला तरी ते नको ती जोखीम घेणार नाहीत. त्यामुळे हे युद्ध आणि त्याजोगे पेटलेला राष्ट्रवादाचा यज्ञकुंड पुतीन पुढील वर्षापर्यंत विझवणार नाहीत.

युद्धाच्या सुरुवातीला कमकुवत असणाऱ्या रशियाच्या अर्थव्यवस्थेने तेलाच्या जीवावर रण पेटलेले असतानासुद्धा बाळसे धरले आहे. युरोप, ब्रिटन आणि अमेरिका युक्रेनला रसद पुरवतील पण थेट आपल्याशी दोन हात करणार नाहीत हे ताडून त्यांनी आपली आगेकूच सुरू ठेवली आहे. दुसरीकडे, युक्रेनला हे युद्ध आणखी पुढे चालवणे जड जात आहे, असे दिसते.

गेल्या सहा महिन्यांत युक्रेनने रशियाच्या ताब्यात गेलेली फक्त तीन गावे पुन्हा आपल्या नियंत्रणाखाली आणली आहेत. युद्धाच्या सुरुवातीस रशियाला कडवट आव्हान देऊ पाहणाऱ्या युक्रेनची गती मंदावल्याचे लक्षात येते. तसेच, युरोप, अमेरिकेतून युक्रेनला पुरवली जाणारी ताकद कितीही ऐवज ओतला तरीही कमी पडत आहे.

पाश्चात्य देशांनी पुरवलेला दाणागोटा एका मर्यादेपलीकडे रशियावर प्रभाव पाडताना नजरेस येत नाही. उलटपक्षी पाश्चात्य जगात त्या-त्या देशांमध्ये युक्रेनला अमर्याद सुरू असलेल्या मदतीबद्दल खळखळ सुरू आहे. अमेरिकेतील २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हा मुद्दा विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांना अडचणीचा ठरू शकतो.

सौदी अरेबियाने या बैठकीस रशियाला निमंत्रित केले नव्हते. इतर निमंत्रित देशांपैकी बहुतेक देशांनी तटस्थतेची भूमिका घेतली असून, युद्धामध्ये समेट करायचा असल्यास हे देश कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार हे जोखणे या बैठकीत अपेक्षित होते.

गेल्या काही काळात सौदी अरेबिया या प्रकरणात दोन्ही गटांना सामंजस्याची भूमिका घ्यायला सांगत आहे. सौदीने या युद्धातील कैद्यांची अदलाबदली घडवून आणली. तसेच, मे २०२३मध्ये आयोजित केलेल्या अरब देशांच्या बैठकीत वोलदोमीर झेलेन्स्की यांना निमंत्रित केले होते.

दोन्हीपैकी कोणत्याही गटाची बाजू न घेणारा सौदी अरेबिया पाश्चात्य देशांना युद्धबंदीची बोलणी सुरू करण्यासाठी सोयीस्कर वाटतो. हाच विचार डोक्यात ठेऊन सौदी अरेबियाने झेलेन्स्की यांचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे.

दोन्हीकडे दबदबा

‘ओपेक प्लस’ या तेल संघटनेत सौदी अरेबिया रशियाचा सोबती आहे. त्यामुळे, सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान दोन्हीकडे आपला दबदबा राखून आहेत. २०१८ मध्ये पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येनंतर संशयाची सुई रोखले गेलेले मोहम्मद बिन सलमान आता स्वतःचा मार्ग आखू पाहत आहेत. २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात बिन सलमान यांना आपण वाळीत टाकू, अशी धमकी जो बायडेन यांनी दिली होती.

पुढे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी बिन सलमान यांना अनुल्लेखाने मारत सुमारे दोन वर्षे फक्त राजे सलमान यांच्याशी जुजबी संवाद साधला. आपल्या वडिलांच्या वतीने सौदीतले सर्व निर्णय घेणारे बिन सलमान यांच्या जिव्हारी ही गोष्ट लागली आणि त्यांनी अमेरिकेला वेसण घालत चीन, रशिया यांच्याशी जवळीक साधली आहे.

कोरोनाच्या काळात रसातळाला गेलेल्या तेलाच्या दरामुळे झालेले नुकसान भरून काढायला सौदी अरेबियाने मागच्या वर्षी तेल उत्पादनकपात जाहीर केली. ती कपात करू नये, यासाठी बायडेन प्रशासनाने सौदीवर बराच दबाव आणला. तेलाचे दर प्रति बॅरेल ९१ डॉलरवर गेल्यानंतर तर बायडेन सौदीमध्ये जाऊन आपली भूमिका मांडून आले. मात्र, त्यांच्या दबावाला बळी न पडता बिन सलमान यांनी बायडेन यांना रिकाम्या हाताने परत पाठवले.

अमेरिकेने पश्चिम आशियातील स्वारस्य कमी केल्यानंतर इतके दशके अमेरिकेच्या कह्यात राहणाऱ्या सौदी अरेबियाला स्वतःच्या विचारांचे स्फुरण चढले. बिन सलमान यांनी राज्यकारभार हातात घेतल्यानंतर येमेनवर युद्ध लादले होते. ती चूक सुधारून त्यांनी आपल्या प्रतिमेचे संवर्धन सुरू केले आहे.

सौदीत आज महिलांना गाड्या चालवायला मुभा आहे. समाजजीवन धर्माच्या जोखडातून सैल करण्याचा त्यांचा मानस आहे. अर्थव्यवस्थेची पूर्ण मदार तेलावर अवलंबून ठेवणे हे भविष्यात धोक्यादायक आहे, हे उमजून त्यांनी ‘व्हिजन २०३०’ प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. कट्टरतावादी देश असा लौकिक असलेला सौदी अरेबिया परकी गुंतवणूक कशी येईल, याची तजवीज करताना दिसत आहे.

खेळ आणि खेळाडूंच्या माध्यमातून जगाचा आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलू शकतो, हे जाणून त्यांनी फुटबॉलच्या लोकप्रिय खेळाडूंना सौदीच्या दरबारात मानाचे स्थान द्यायला सुरुवात केली आहे. एकेकाळी जहाल समाजजीवनासाठी कुप्रसिद्ध असलेला देश या टप्प्यावर येऊन ठेपणे एक स्थित्यंतर म्हणावे लागेल.

वाढते महत्त्व

इस्राईलसारख्या चाणाक्ष देशासोबत पुढे टाकलेले मैत्रीचे पाऊल ते हाडवैरी असलेल्या इराणसोबत संबंध सुधारण्याची सुरू असलेली धडपड, यातून बिन सलमान व्यावहारिकपणे राजकारण साधत आहेत. ‘नाटो’, ‘ऑकस’, ‘ब्रिक्स’ अथवा तत्सम कंपूच्या गोठ्यात स्वतःला बांधून घेण्यापेक्षा आपल्या सामर्थ्याच्या जीवावर जागतिक पटलावरील मध्यस्थाची भूमिका मांडायची संधी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे देश सोडताना दिसत नाहीत.

युद्धसमाप्ती झाल्यानंतरच्या जगात मुत्सद्देगिरीमुळे आपले स्थान अधिक बळकट करायचा त्यांचा प्रयत्न आहे. अशी जगाची उठाठेव करायची असेल तर घरच्या आघाडीवर शांतता लागते. आपल्या घरच्या प्रतिस्पर्ध्यांची राजकीय शिकार करून बिन सलमान यांनी स्वतःच्या पद्धतीने शांतता आधीच प्रस्थापित केली आहे.

आता राजे असलेल्या ८७ वर्षांच्या वडिलांच्या पश्चात सौदीच्या सिंहासनावर बसायची औपचारिकता तेवढी त्यांनी शिल्लक ठेवली आहे. बाकी सौदीत सबकुछ बिन सलमान अशी परिस्थिती आहे. ३७ वर्षे वयोमान असलेल्या बिन सलमान यांचा घातपात न झाल्यास त्यांना किमान ४० वर्षे राजकीय भवितव्य आहे.

या प्रस्तावित कार्यकाळासोबतच त्यांच्याकडे निरंकुश सत्ता, आर्थिक सामर्थ्य, तेलाची मक्तेदारी, मक्का-मदिनेचे पालकत्व आणि इस्लामच्या वहाबी पंथाची धर्ममान्यता आहे. या सर्व गोष्टींचा पुरेपूर उपयोग करत फासे टाकल्यास बिन सलमान आपले हात अधिक ताकदवान करतील. हेच वास्तव लक्षात घेऊन देशोदेशींचे नेते त्यांच्याशी सलगी करू पाहत आहेत. सौदीच्या यशाचे गमक यातच दडले आहे.

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT