Advice Dissent sakal
संपादकीय

‘नियामका’च्या वाटचालीचा वाचनीय ताळेबंद

सनदी सेवेतील नोकरी आणि त्यातही बॅंकिंग, वित्त क्षेत्रातील कारकीर्दीच्या आठवणींचा ताळेबंद कितीही नाही म्हटले तरी रूक्षच असणार अशी सर्वसाधारण समजूत असते.

निरंजन आगाशे

सनदी सेवेतील नोकरी आणि त्यातही बॅंकिंग, वित्त क्षेत्रातील कारकीर्दीच्या आठवणींचा ताळेबंद कितीही नाही म्हटले तरी रूक्षच असणार अशी सर्वसाधारण समजूत असते.

सनदी सेवेतील नोकरी आणि त्यातही बॅंकिंग, वित्त क्षेत्रातील कारकीर्दीच्या आठवणींचा ताळेबंद कितीही नाही म्हटले तरी रूक्षच असणार अशी सर्वसाधारण समजूत असते. सरकारी अहवाल, टिपणे, शिफारशी, ठराव, परिपत्रके यातल्या पठडीबद्ध भाषेशी सतत संबंध येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत तर ही शक्यता जास्तच वाढते. पण यागा वेणूगोपाळ (वाय.व्ही.) रेड्डी यांच्या आठवणींचे हे पुस्तक याला सुखद अपवाद आहे. संवाद साधणारी त्यांची शैली वाचकाला खिळवून ठेवते. सरकारी सेवेत अनेक मानाची पदे भूषविलेले रेड्डी गतायुष्याकडे खेळकर नजरेने पाहू शकतात, स्वतःच्या चांगल्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करतानाच झालेल्या चुकांही मोकळेपणाने मान्य करतात आणि वाटचालीची कथा सांगतासांगता आपल्या व्यवस्थेतील अनेक चांगल्यावाईट गोष्टींकडे सहज निर्देश करुन जातात.

स्‍वातंत्र्याचा उषःकाल जवळ आलेला असताना जन्मलेल्या आणि त्यामुळे आपसूकच ध्येयवादाचा वारसा मिळालेल्या पिढीचे वायव्ही हे प्रतिनिधी. पुढच्या त्यांच्या प्रवासाची कहाणी वाचताना हे ‘प्रतिनिधित्व’ ठसठशीतपणे नजरेत भरते. त्यांच्या विवेचनात ‘राष्ट्रीय हिता’ची सम कधी चुकत नाही, याचे कारण बहुधा तेच असावे. जात्याच हुशार असलेल्या वायव्हींनी सनदी सेवेत प्रवेश केला. आंध्रात त्यांनी राज्य सरकारमध्ये काम केले, त्याचप्रमाणे केंद्रात अर्थ, वाणिज्य अशा महत्त्वाच्या खात्यांत सचिवपदे सांभाळली. अखेरच्या टप्प्यात चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदही भूषवले. पद्मविभूषणने गौरवांकितही झाले. त्यांच्या एकूण प्रवासातील सर्वात महत्त्वाचा मुक्काम म्हणजे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नरपद. २००३ ते २००८ हा त्यांचा या पदावरील कार्यकाळ. आर्थिक सुधारणापर्व ऐन भरात असलेला. अनेक महत्त्वाच्या वित्तीय आणि बॅंकिंग सुधारणांसाठीचे पायाभूत काम करण्याची संधी वायव्हींना मिळाली आणि त्यांनी आपल्यावरील जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.

राज्यकर्त्यांचा आणि सनदी सेवेतील अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन यात फरक असतो. तसा तो असणे स्वाभाविकही आहे. म्हणजेच त्यांच्या नात्यात एक मूलभूत ताण आहे. पण त्यातूनच मार्ग काढत कसे पुढे जावे लागते, याचा एक आलेखच या जीवनकहाणीतून समोर येतो. पुस्तकाचे शीर्षक त्याबाबतीत पुरेसे बोलके आहे. सल्ला देण्याचे जेवढे प्रसंग रेड्डी यांच्यावर आले तेवढेच मतभिन्नता दर्शवण्याचेही. काहीवेळा त्यांनी माघार घेतली तर अनेकदा ते ठाम राहिले. याविषयीच्या अनेक आठवणी रंजक आहेत आणि नोकरशाहीच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणाऱ्याही.

रिझर्व्ह बॅंक म्हटले, की अर्थ मंत्रालय आणि गव्हर्नर यांच्यातील एक वाद लगेचच डोळ्यासमोर येतो. तो म्हणजे विकासवाढ आणि महागाई नियंत्रण या मुद्यावरून होणारा वाद. चलनवाढ होऊ न देण्याची जबाबदारी रिझर्व्ह बॅंकेवर असते, तर विकासाला गती देण्यासाठी सरकारची खटपट सुरू असते. हा वाद सर्वज्ञात आहे. परंतु इतरही अनेक विषयांबाबत मतभिन्नता असू शकते. रेड्डी यांनी आपले स्वतंत्र मत वेळोवेळी नोंदवले, एवढेच नव्हे तर त्याचा पाठपुरावा केला. मग तो परकी बॅंकांना भारतात प्रवेश देण्याचा विषय असो, वा सार्वजनिक बॅंकांचे सीईओ नेमण्याच्या पद्धतीचा प्रश्न असो.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी अणुचाचणी केली. त्यानंतरच्या काळात अपेक्षेप्रमाणे अमेरिकेने निषेध नोंदवत आर्थिक निर्बंध लादण्याची तयारी सुरू केली. तत्कालिन अध्यक्ष क्लिंटन यासंदर्भातील आदेश काढणार हे ज्या दिवशी स्पष्ट झाले, त्यावेळी डॉ. विमल जालान रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर तर रेड्डी डेप्युटी गव्हर्नर होते. हो दोघेही काश्मिरातील एका समारंभात होते. क्लिंटन यांचा आदेश जारी होताच परकी चलन विनिमय बाजारपेठेला हेलकावे बसून दर खाली येईल, अशी भीती वाटत असल्याने सरकारने रिझर्व्ह बॅंकेला ताबडतोब निवेदन जारी करण्याची सूचना केली. ‘निर्बंधांच्या परिणामांविषयी अवाजवी भीती बाळगू नये, आमचे परिस्थितीवर पूर्ण लक्ष आहे’ अशा आशयाचे निवेदन अपेक्षित होते. रेड्डी यांनी असे काही करण्याची घाई करू नये, असे मत व्यक्त केले.

बाजारपेठेवर नेमका काय परिणाम होत आहे, याचा अंदाज न घेताच असे काही केले तर आपल्याला जे अपेक्षित आहे, त्याच्या उलटा परिणाम होईल, असा विचार रेड्डी यांनी केला. पण यात जोखीम होती. जर खरोखर काही परिणाम झाला तर रिझर्व्ह बॅंकेने काहीच हालचाल केली नाही, असा ठपका आला असता.त्यामुळे डॉ. जालान हा सल्ला ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तो काळ कमालीच्या तणावाचा होता. पण डॉ. जालान दुसऱ्या दिवशी रेड्डी यांना फोनवर म्हणाले, ‘माझे अभिनंदन कर.’ का, असे विचारल्यावर ते उत्तरले, ‘तुझा सल्ला ऐकण्याचा निर्णय घेतल्याबद्दल!’ अमेरिकेने निर्बंध लादले होते, पण त्याविषयीची भीती अवाजवी होती. निवेदन प्रसिद्धीस न देण्याचा रेड्डी यांचा अंदाज बरोबर ठरला होता. अशा स्वरूपाचे अनेक प्रसंग रेड्डी यांनी डोळ्यापुढे उभे केले आहेत. त्या निमित्ताने एन.टी. रामाराव, पी. चिदंबरम. सी. रंगराजन, डॉ. जालान,जसवंतसिंह, प्रणव मुखर्जी अशा राजकारण आणि प्रशासनातील अनेक दिग्गजांची व्यक्तिवैशिष्ट्येही त्यांनी कौशल्याने रेखाटली आहेत. व्यापक आर्थिक-राजकीय स्थित्यंतराच्या काळाची त्याला पार्श्वभूमी असल्याने या निवेदनाचे मोल वाढले आहे.

पुस्तक : ॲडव्हाइस अँड डिसेंटः माय लाइफ इन पब्लिक सर्व्हिस.

लेखक : डॉ. वाय. व्ही. रेड्डी

प्रकाशक : हार्पर बिझिनेस

पृष्ठे : ४७७ मूल्य : रुपये ५९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT