camera sakal
संपादकीय

आम्ही जगतो बेफाम..!

बिनधास्त, बेफाम जगण्याची झिंग अनुभवायलाच हवी. फक्त ती तशी अनुभवताना मेंदू ताळ्यावर ठेवावा.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या दीड-दोन दशकात स्मार्टफोनचा सुळसुळाट झाल्यानंतर जगभरातल्या मनुष्यमात्रांच्या हातात कॅमेऱ्याचे खेळणे आले. तोवर कॅमेऱ्यातून फोटो काढणे ही एक विशेष कला मानली जायची. आजही उत्कृष्ट छायाचित्र काढायचे असेल तर चांगला कॅमेरा हाताशी लागतोच. भिंगातून पाहात, छायाप्रकाशाचा परिणाम टिपत अचूक अंदाजात काढलेले छायाचित्र स्तिमित करते.

एक छायाचित्र हजार शब्दांचा परिणाम करुन जाते, असेही म्हटले जात असे. पण तशी प्रभावी छायाचित्रकला जोपासण्यासाठी कल्पकता आणि प्रतिभा दोन्हींचा कस लागतो. कॅमेरा हा जगाकडे बघण्याचे अनोखे भिंग होते व आहे. मोबाइल फोनमधल्या कॅमेऱ्याने मात्र हे जग अक्षरश: उलटे केले. कॅमेऱ्याचे भिंग दुनियेकडे रोखण्याऐवजी स्वत:कडे रोखले गेले, आणि ‘मी दुनियेला नाही, तर दुनियेने मजला पहावे’ हे उच्चरवात सांगितले जाऊ लागले. या छायाचित्राला ‘सेल्फी’ म्हणायचे. २००२मध्ये ऑस्ट्रेलियातील एका महाभागाने मद्यधुंद अवस्थेत जिन्यावरुन कोलमडताना स्वत:लाच टिपले, आणि त्या दुर्घटनेतूनच पहिल्या ‘सेल्फी’चा जन्म झाला, अशी एक डिजिटल आख्यायिका सांगितली जाते. पुढे फ्लिकर नामे एका संकेतस्थळाने ‘सेल्फी’ या विशेष संबोधनासह छायाचित्रांचा स्वतंत्र विभाग सुरु केला. तेव्हापासून हे सेल्फीचे वेड वाऱ्याच्या वेगाने पसरले. आजकाल तर ‘सेल्फी’च्या पुढली, ‘रील्स’ची पायरी गाठली गेली आहे. ‘सेल्फी’ हे तर क्षणचित्र झाले, ‘रील’, म्हणजे लघुचित्रफित म्हणजे आपणच नायक किंवा नायिका असलेला लघुचित्रपटच. मुंबईतील एक सुशिक्षित तरुणी याच रीलच्या नादात कड्यावरुन कोसळून प्राणास मुकली. सेल्फी आणि रीलचे हे वेड आता आत्मघाताच्या थराला जाऊ लागले आहे, याची पुन्हा एकवार दाहक जाणीव करुन देणारी ही दुर्घटना.

मुंबईत राहणारी सुखवस्तू घरातली, चार्टर्ड अकाऊंटंट असलेली अन्वी कामदार ही मुलगी रील बनवण्याच्या नादात धबधब्यानजीक कड्यावरुन तीनशे फूट दरीत कोसळली. हे रील तिने बनवले नसते, तर जगाचे काहीच नुकसान होणार नव्हते. कुठलीही नेत्रदीपक कामगिरी तिच्या नावावर नोंदवली जाणार नव्हती. तिचे ‘लाइक्स’ मात्र नक्की वाढले असते. ‘फॉलोअर्स’ची संख्या वाढली असती. तरुणांच्या भाषेत सांगायचे तर ती ‘ट्रॅव्हल इन्फ्लुअन्सर’ होती. आजकाल ओपिनियन मेकर्स, इन्फ्ल्युअन्सर्स, स्वयंघोषित खवय्यांचे समाजमाध्यमांवर बारमाही पीक असते. त्या डिजिटल जगात त्यांचा त्यांच्या वर्तुळात दबदबा, लोकप्रियता वगैरे असते. काही तर सोशल मीडिया स्टार असतात. जे कालपर्यंत फक्त फिल्मी सिताऱ्यांपुरतेच मर्यादित होते, ते वलयांकित आयुष्य या सोशलसिताऱ्यांनाही अनुभवता आले.

भरपूर फॉलोअर्स असलेल्या एखाद्या सोशल सिताऱ्याला मॉल किंवा ‘इव्हेंट’ मध्ये चाहत्यांचे गराडे पडू लागले. नाही म्हणायला वाढत्या लोकप्रियतेसोबत पैकाही मिळवण्याची संधी हाती आली. वास्तवातले नीतिनियम लांबवर फेकून देऊन ‘माझ्याकडे या’ असे आवाहन करणारे हे विश्वामित्री आभासी जगच नवे वास्तव बनू लागले. त्या विश्वातल्या वलयासाठी अन्वी कामदारने आपले मर्त्यलोकातले जीवन मात्र अकारण संपवले. काही दिवसांपूर्वी बीडच्या एका तरुणाने भरधाव मोटारसायकल चालवत रील बनवण्याच्या खटाटोपात जीव गमावला होता. त्याही आधी संभाजीनगरातील एक युवती रिव्हर्समध्ये मोटार चालवत रील चित्रित करता करता खाईत पडली होती. सेल्फीच्या नादात दगावणाऱ्यांची जगभरातली संख्या मोजली तर ती काही लाखांच्या घरात जाईल. अक्षरश: हजारो जणांचे प्राण या बिनबुद्धीच्या, आणि बिनमहत्त्वाच्या खटाटोपामुळे आपण गमावले आहेत.

भारतात पाण्याशी खेळताना सेल्फी आणि रील चित्रित करताना कित्येकांनी मरण कवटाळले. माणूस स्वत:मध्ये गुंतला की बाकीचे जग ‘आऊट ऑफ फोकस’ होते. वास्तवातील जगात भौतिकशास्त्राचे, गतीचे नियम पाळावे लागतात. निसर्गाशी जपून वागायचे असते. ज्या आभासी जगासाठी अन्वीसारख्या युवती रील बनवतात, त्या दुनियेत हे कुठलेच नियम नसतात. समाजमाध्यमांवरले आपले आभासी अस्तित्व वास्तवातील जगण्यापेक्षाही अधिक आकर्षक का वाटत असेल, हा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोशल मीडियाचा जन्मच मुळी उन्मुक्त अभिव्यक्तीला प्रतिसाद देण्याने झाला. ‘जहा गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले’ अशा ‘गगन के तले’ असलेल्या या आभासी विश्वाने जालीम दुनियेचे निर्बंध झुगारुन नवी विश्वामित्री जीवनशैली विकसित केली. वास्तव आणि आभास यात गल्लत झाली की दुर्घटना होणारच. समाजमाध्यमांनी आणलेल्या क्रांतीमुळे जग जवळ आले. सरहद्दी धूसर झाल्या. संपर्काचे महानद वाहू लागले, हे अगदी खरे. वरदान म्हणून आलेली माध्यमे चुकीच्या हातात गेली की त्यांची संहारक अस्त्रे होतात, हेदेखील दिसले. स्मार्टफोन हे जगाशी जोडणारे यंत्र आहे. त्याचा वापर जपून केलेला बरा. तरुण पिढीने सदासर्वकाळ घरात बसून राहावे, किमान ‘सातच्या आत घरात’ यावे, असे आता कोणीही म्हणत नाही. बिनधास्त, बेफाम जगण्याची झिंग अनुभवायलाच हवी. फक्त ती तशी अनुभवताना दोन कानांच्या मधला मेंदू ताळ्यावर ठेवावा, येवढेच कळकळीने सांगायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT