- पल्लवी यादव
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ व लोकनेते, जीवाश्म इंधनापासून अक्षय्यतेकडे वेगाने बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत. तसे करणे अर्थातच आवश्यकही आहे; परंतु हे संक्रमण करताना दृष्टिकोन विचारपूर्वक आणि सर्वसमावेशक हवा.
‘टूबी ऑर नॉट टू बी’ या शेक्सपिअरियन विधानासारखी काहीशी गत जीवाश्म इंधनाची झाली आहे. ऊर्जा संक्रमण, हवामान बदलाच्या या काळात, ऊर्जा उद्योग व या क्षेत्राशी निगडित विविध घटक गेल्या काही वर्षांत परिवर्तनशील स्थितीत आहेत. जीवाश्म इंधनाची नियोजित समाप्ती हा जागतिक पातळीवर विवादाचा व गंभीर विश्लेषणाचा विषय बनला आहे.
नुकतीच दुबईत पार पडलेली COP २८ ची परिषद काय, ऊसापासून इथेनॉल उत्पादनावर तात्पुरती बंदी घालण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय काय किंवा रण ऑफ कच्छ सौर आणि पवन प्रकल्प काय, एकूणच ऊर्जेचा प्रश्न प्रकाशझोतात आला आहे.
जीवाश्म इंधन हा आजच्या आधुनिक, औद्योगिक युगासाठी ऊर्जेचा एक प्रमुख स्त्रोत आहे. तो मानवी जीवनाचा, जागतिक अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. जीवाश्म इंधनावर आधारित जीवनशैलीत बदल घडवून आणणे हे सोपे नाही. परिणामतः हे संक्रमण सोपे असणार नाही. जीवाश्म इंधन - वापराद्वारे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे होणारे हरितगृह परिणाम आणि हवामान बदल ही वैज्ञानिक वस्तुस्थिती जरी असली तरी, तपशीलात काही मतभेद आहेत.
जीवाश्म इंधने ही हवामानबदलाचे दोषी नसून हवामानबदल हा सृष्टीतील एक नैसर्गिक बदल आहे, असे वादाकरिता गृहीत धरले तरीही आपल्या जीवनशैलीत पर्यायी ऊर्जास्त्रोतांचा समावेश करणे आवश्यक आहे. याचे कारण जीवाश्म इंधने तांत्रिकदृष्ट्या पुनर्नवीकरणाची क्षमता राखत नाहीत. म्हणजेच जीवाश्म इंधनाची उपलब्धी सीमित आहे.
कार्बन डायऑक्साईड, मिथेन, व इतर हरितगृह वायूंचे पृथ्वीभोवती आवरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे जागतिक तापमान वाढून आजची हवामानबदलाची स्थिती निर्माण झाली आहे. निव्वळ शून्य राखण्यासाठी किंवा १.५ अंशांच्या सुरक्षित मर्यादेत जागतिक तापमानवाढ स्थिर ठेवण्यासाठी हे कार्बन डायऑक्साईड व इतर हरितगृह आवरण काढून टाकणे अथवा कमी करणे आवश्यक आहे.
१९८१मध्ये शास्त्रज्ञांनी ग्लोबल वॉर्मिंगची नोंद घेण्यास सुरुवात केल्यापासून डीकार्बनायझेशनच्या (वातावरणातून कार्बनचे प्रमाण कमी करणे) विविध पद्धती व उपक्रम राबवले गेले आहेत. सुरुवातीस त्यात जंगलतोड कमी करणे, वनीकरण, काही प्रमाणात सौर ऊर्जा व पवन ऊर्जेचा विकास व वापर, इत्यादीसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तरीही अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांचा विकास आणि व्यापक वापर ही डेकार्बनायझेशनच्या उद्दिष्टाच्या दिशेने काम करण्याची सर्वात वास्तविक पद्धत आहे.
गेल्या शतकाच्या अंती, सौर व पवन ऊर्जेचा विकास केला गेला. विविध पद्धतीद्वारे डीकार्बनायझेशन वाढवणे, ऊर्जाप्रणालीत अक्षय ऊर्जास्त्रोतांचा समावेश वाढवणे व त्याचबरोबर जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे हा ऊर्जा संक्रमणासाठी योग्य रोड मॅप ठरवला गेला आहे. हे उद्दिष्ट समोर ठेऊन आज जगातील ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ व लोकनेते, जीवाश्म इंधनापासून अक्षय्यतेकडे वेगाने बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत,.
हे आवश्यक आहे; परंतु या बदलाबाबत दृष्टिकोन विचारपूर्वक आणि सर्वसमावेशक हवा. ऊर्जा प्रणालीतील बदल, ऊर्जा संक्रमण हे जबाबदारीने होणे आवश्यक आहे. कोणतीही ऊर्जाप्रणाली ही समाजमान्य होण्यासाठी ती मुळात सामान्य माणसास सहज, सुलभरीत्या उपलब्ध असणारी व परवडणारी असणे गरजेचे असते.
गेल्या १०० वर्षांत जागतिक स्तरावर ऊर्जेचे प्राथमिक स्त्रोत म्हणून जीवाश्म इंधनाची प्रगती, त्याचे आज वातावरणावर होणारे परिणाम याचा तज्ज्ञ, धोरणकर्ते यांनी काळजीपूर्वक अभ्यास करून निर्णय घ्यायला हवेत. सध्या जरी नूतनीकरणक्षम ऊर्जा स्त्रोतांचा एकूण ऊर्जावापरात केवळ २० टक्केच समावेश असला तरी, हवामान कृती अंतर्गत, पुढील दशकांमध्ये ऊर्जावापरात अक्षय ऊर्जा स्त्रोतांची उपस्थिती अनेक पटींनी वाढवावी लागेल. त्यासाठी ऊर्जासंबंधित सामाजिक-आर्थिक धोरण बदलावे लागेल.
अविवेकी वापर नडला
जेव्हा जीवाश्म इंधने प्रथम वापरात आली, तेव्हा ती तात्काळ लोकप्रिय होणे, यामागे कारणे विविध होती. स्वस्त, सुलभ उपलब्धता ही कारणे महत्त्वाची. औद्योगीकरण, कृषी क्षेत्र, वाहतूकप्रणाली हे कोणत्याही देशाची प्रगती व अर्थकारण चालवणारे घटक जीवाश्म इंधनावर धावू लागले. मात्र या वाटेवर कुठेतरी, जागतिक पातळीवर ऊर्जेचा प्राथमिक स्त्रोत म्हणून जीवाश्म इंधनाचा घाईघाईने अविवेकीपणे वापर केला गेला.
भांडवलशाही दृष्टिकोन आणि विकासाचे स्वीकारलेले प्रारूप यामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल वेगाने वाढत गेले. तीच चूक पुनः होणे, हे अविवेकी ठरेल व आजचे ऊर्जा संक्रमणासाठीचे प्रयास भविष्यात फलस्वरूपी निरर्थक ठरू शकतील. त्यामुळेच आज येथे एक सावध विराम आवश्यक आहे.
आज पुन्हा ऊर्जाप्रणालीबाबत विचार करायला हवा. सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि यासारख्या अक्षय्य ऊर्जास्त्रोतांच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. जीवाश्म इंधन कधीतरी संपुष्टात येणारच, ज्यामुळे पर्यायांची गरज आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल ही वस्तुस्थिती असल्याने वातावरण प्रदूषित न करणाऱ्या ऊर्जास्रोतांची गरज आहे. पण ऊर्जा संक्रमणाचा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने सामाजिक, लोकतांत्रिक असला पाहिजे.
भविष्यात उभ्या राहणाऱ्या विस्तीर्ण सोलर फार्म्स व पार्क्स, विंड फार्म्स इत्यादींच्या संभाव्य दुष्परिणामांचा अंदाज लावू शकतील अशा वैज्ञानिक व त्याचबरोबर सामाजिक - आर्थिक प्रारूपांचा तपशीलवार अभ्यास करणे आवश्यक आहे. कर्नाटकातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सामाजिक- आर्थिक दुष्परिणामांचे अहवाल दुर्लक्षिता येणार नाहीत.
विविध अक्षय ऊर्जाप्रणालीचा मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार जी आर्थिक गुंतवणूक करते, ती अत्यंत मोठी असते. या गुंतवणुकीत देशाच्या करदात्यांच्या पैशांचाही समावेश आहे. त्यामुळे मोठ मोठ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यापूर्वी, एक पाऊल मागे सरून, भविष्यातील चांगल्या व वाईट दोन्ही परिणामांचा खोलवर अभ्यास असावा.
त्यामुळे सरकार, धोरणकर्ते, उद्योग नेत्यांनी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सखोल संशोधन आणि विकासाच्या प्रश्नाकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि केवळ सौर, हायड्रोजन, पवन इत्यादी ऊर्जास्त्रोतांच्या सध्या उपलब्ध साधनांवरच फक्त लक्ष केंद्रित न करता, इतर नवीन कल्पना, पर्यायदेखील विकसित करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न हवेत.
भविष्यात अक्षय्य ऊर्जास्त्रोतांच्या व्यापक वापराचा नकारात्मक परिणामाचा अभ्यास केवळ पर्यावरणापुरता मर्यादित न ठेवता, वाढत्या लोकसंख्येशी थेट निगडित असलेले अन्न, निवारा, यासारख्या मानवी जीवनातील इतर महत्त्वाच्या घटकांचाही विचार झाला पाहिजे. प्रत्येक देशात समान गतीने ऊर्जा संक्रमण घडवून आणण्याची सक्ती चुकीची ठरेल. आर्थिकदृष्ट्या कमकुवत राष्ट्रे ऊर्जा संक्रमणाची गतिमान जबाबदारी पेलू शकतीलच, असे नाही.
अशा राष्ट्रांना धनाढ्य विकसित राष्ट्रांनी आर्थिक सहाय्य पुरविणे हे केवळ चर्चा व कागदोपत्री असणे ठीक नाही. हवामान बदल हा जगाच्या हिताचा प्रश्न आहे. तथापि ऊर्जा संक्रमणाची जबाबदारी पार पाडण्यास हरेक राष्ट्राने आपापली भूमिका ओळखून हा संक्रमणाचा मार्ग सर्वांसाठी सुलभ केला पाहिजे.
१.५ अंश तापमानाचे लक्ष्य साध्य करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने विकास जाणीवपूर्वक व सातत्यपूर्ण असावा.अन्यथा शाश्वत व न्याय्यपूर्ण अशा पर्यावरणीय आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षित ऊर्जा मॉडेल अंतर्गत १.५ अंश लक्ष्य गाठणे अशक्य होईल. ऊर्जा संक्रमणाचे युग, हे जीवाश्म इंधनाच्या युगाप्रमाणेच तात्पुरते ठरेल. या संक्रमणातून मानवतेला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी जागतिक लोकनेते, ऊर्जातज्ज्ञ तसेच धोरणकर्त्यांनी विवेकाने निभावली पाहिजे.
(लेखिका ऊर्जा क्षेत्राच्या अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.