narendra modi and agriculture scientist dr ms swaminathan sakal
संपादकीय

विशेष : शेतकऱ्यांचा शास्त्रज्ञ

कृषी क्षेत्रातील नवोन्मेष आणि शाश्वततेच्या मार्गावर वाटचाल करत असताना डॉ. स्वामिनाथन यांचे योगदान आपल्याला निरंतर प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.

नरेंद्र मोदी

कृषी क्षेत्रातील नवोन्मेष आणि शाश्वततेच्या मार्गावर वाटचाल करत असताना डॉ. स्वामिनाथन यांचे योगदान आपल्याला निरंतर प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. शेतकऱ्यांच्या हिताला पाठबळ देणे आणि वैज्ञानिक शोधाची फलनिष्पत्ती कृषिविस्ताराच्या मुळांपर्यंत पोहोचेल हे सुनिश्चित करणे, पुढील पिढ्यांसाठी विकासाची वाटचाल करीत राहणे, या त्यांनी जपलेल्या तत्त्वांप्रती आपली बांधिलकीही आपण सुनिश्चित करायला हवी.

काही दिवसांपूर्वी आपण प्राध्यापक एम. एस. स्वामिनाथन यांना गमावले. कृषिविज्ञानात क्रांती घडविणाऱ्या एका द्रष्टया वैज्ञानिकाला आपण मुकलो. सुवर्णाक्षरात ज्यांची नोंद होईल, असे महान व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले. प्रा. स्वामिनाथन यांचे आपल्या देशावर खूप प्रेम होते आणि आपला देश, विशेषतः देशातील शेतकरी समृद्ध व्हावेत, असे त्यांना मनापासून वाटत असे.

त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व अत्यंत उमदे होते आणि त्या बळावर खरे तर ते सहज कोणत्याही करियरची निवड करू शकले असते. मात्र, १९४३ मध्ये बंगालमध्ये आलेल्या भीषण दुष्काळाने ते हेलावून गेले आणि त्याचा त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. त्यानंतर त्यांनी एक गोष्ट मनाशी पक्की केली, आपण कृषिक्षेत्राचा अभ्यास करायचा.

अगदी तरुण वयात, ते अमेरिकी कृषिशास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या संपर्कात आले आणि त्यांचा आदर्श ठेवत स्वामिनाथन यांनी आपली वाटचाल सुरू केली. १९५०मध्ये अमेरिकेत व्याख्यातापदी काम करण्याची त्यांना संधी मिळत होती. मात्र त्यांनी ती विनम्रपणे नाकारली. कारण, त्यांना भारतात आणि भारतासाठी काम करायचे होते.

भारतासमोर असलेल्या आव्हानात्मक परिस्थितीत, ते एखाद्या अविचल पर्वतासारखे अढळ राहून देशाला आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासपूर्ण बनवण्याचे काम करत होते, ती परिस्थिती आपण सर्वांनी समजून घ्यायला हवी.

स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकांत, भारताने खडतर अशा आव्हानांचा सामना केला आणि त्यातील एक प्रमुख आव्हान म्हणजे अन्नटंचाई. साठच्या दशकाच्या सुरुवातीला देशावर दुष्काळाचे काळे सावट पसरले होते. त्यावेळी प्रा. स्वामिनाथन यांची अढळ बांधिलकी आणि दूरदृष्टी यामुळे देशात कृषी समृद्धीचा नवा अध्याय सुरू झाला.

कृषी क्षेत्रातील विशेषतः गहूविषयक संशोधन हे त्यांचे दिशादर्शक कार्य होते. त्यांनी गव्हाची नवी सुधारित वाणे विकसित केली. या त्यांच्या अग्रगण्य कार्यामुळे गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. अशाप्रकारे अन्नटंचाई असलेल्या भारताला त्यांनी अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण राष्ट्र बनवले. या अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीमुळे त्यांना ‘भारतीय हरित क्रांतीचे जनक’ अशी उपाधी मिळाली.

हरित क्रांतीने भारताच्या ‘अशक्य ते शक्य’ करून दाखवण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवले. आपल्यासमोर जर अब्जावधी आव्हाने असतील, तर त्या आव्हानांवर मात करण्यासाठी अभिनवतेच्या ज्योतीने तेवणारी अब्जावधी मनंही आपल्याकडे आहेत. हरितक्रांती सुरू झाल्याच्या पाच दशकांनंतर भारतीय शेती खूपच आधुनिक आणि प्रगतशील झाली आहे. मात्र प्रा. स्वामिनाथन यांनी रचलेला पाया कधीच विसरता येणार नाही.

वर्षानुवर्षे, त्यांनी बटाटा पिकांवर परिणाम करणाऱ्या परजीवींचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे संशोधन केले. त्यांच्या संशोधनामुळे बटाटा पीक थंड हवामान जगवणे शक्य होऊ शकले. आज जग भरडधान्य किंवा श्रीअन्न हे ‘सुपर फूडर’ असल्याची चर्चा करत आहे; पण प्रा. स्वामिनाथन यांनी १९९० च्या दशकापासूनच भरडधान्याला प्रोत्साहन मिळावे, यासाठी चर्चा सुरू केली होती.

प्रा. स्वामिनाथन यांच्याशी माझे खूप बोलणे होत असे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे २००१ मध्ये मी हाती घेतल्यानंतर या संवादाला सुरुवात झाली. त्या काळात गुजरात शेतीक्षमतेसाठी ओळखला जात नव्हता. लागोपाठचा दुष्काळ, मोठे चक्रीवादळ आणि भूकंप यांचा राज्याच्या विकासावर परिणाम झाला होता. आम्ही सुरू केलेल्या अनेक उपक्रमांपैकी, मृदा आरोग्य कार्ड हा एक उपक्रम होता.

यामुळे आम्हाला शेतातील मातीसंदर्भात अधिक चांगल्या प्रकारे माहिती समजून घेता आली आणि समस्या उद्भवल्यास त्या सोडवता आल्या. याच योजनेच्या संदर्भात मी प्रा. स्वामिनाथन यांची भेट घेतली. त्यांनी या योजनेचे कौतुक केले आणि त्यासाठी बहुमोल माहितीही पुरवली. ज्यांना या योजनेबद्दल शंका होत्या, त्यांना योजना पटवून देण्यासाठी स्वामिनाथन यांचे समर्थन पुरेसे होते.अंतिमतः यामुळे गुजरातच्या कृषी क्षेत्रातील यशाचा पाया रचला गेला.

माझ्या मुख्यमंत्रि‍पदाच्या कार्यकाळात आणि मी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावरही आमच्यामधील संवाद सुरू राहिला. २०१६ मध्ये मी त्यांना आंतरराष्ट्रीय कृषी-जैवविविधता काँग्रेसमध्ये भेटलो आणि पुढील वर्षी २०१७ मध्ये मी त्यांनी लिहिलेली दोन भागांची पुस्तक मालिका प्रकाशित केली. शेतकऱ्यांचे वर्णन करताना ‘कुरल’ या तमिळ भाषेतील प्राचीन छंदबद्ध रचनेत म्हटले आहे की, शेतकरी हा जगाला एकत्र ठेवणारा एक घटक(एक टाचणी)आहे.

कारण शेतकरीच सर्वांना जगवतात. हे तत्त्व प्रा.स्वामिनाथन यांना चांगलेच समजले. अनेक जण त्यांना ‘कृषी वैज्ञानिक’ म्हणून संबोधतात. मात्र, ते त्याहूनही अधिक काही होते. ते खरे ‘किसान वैज्ञानिक’, शेतकऱ्यांचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या हृदयात शेतकरी होता. त्यांच्या कामाचे यश केवळ त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेपुरते मर्यादित नसून, प्रयोगशाळेच्या बाहेर, बागांमध्ये आणि शेतांमध्ये त्याचा प्रभाव दिसून आला. त्यांच्या कामाने वैज्ञानिक ज्ञान आणि त्याचा व्यावहारिक उपयोग यामधील अंतर कमी केले.

मानवी प्रगती आणि पर्यावरणीय शाश्वतता यांच्यातील नाजूक संतुलनावर भर देत त्यांनी शाश्वत शेतीचे सातत्याने समर्थन केले. या ठिकाणी मी हेही नमूद करतो की, प्रा. स्वामिनाथन यांनी लहान शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यावर आणि त्यांना नवोन्मेषाची फळे मिळावीत, यावर विशेष भर दिला. विशेषत: महिला शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्याची त्यांना तळमळ होती. प्रा. स्वामिनाथन यांच्याबाबत आणखी एक पैलू उल्लेखनीय आहे. तो म्हणजे, नवोन्मेषाचे पुरस्कर्ते आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे स्थान नेहमीच अढळ राहिले.

जेव्हा त्यांनी १९८७ मध्ये जागतिक अन्न पुरस्कार पटकावला,तेव्हा हा प्रतिष्ठित सन्मान मिळवणारे ते पहिले व्यक्त्ती होते. त्यांनी पुरस्काराची रक्कम नफाविरहीत संशोधन फाउंडेशन स्थापन करण्यासाठी वापरली. आजपर्यंत, ही संस्था विविध क्षेत्रांमध्ये व्यापक कार्य करत आहे. त्यांनी असंख्य लोकांना शिकण्याचे आणि नवोन्मेषाचे संस्कार देत याबद्दल यांच्यामध्ये आवड निर्माण केली. झपाट्याने बदलणाऱ्या जगात, त्यांचे जीवन आपल्याला ज्ञान, मार्गदर्शन आणि नवोन्मेष या त्यांच्या चिरस्थायी सामर्थ्याचे स्मरण करून देते.

त्यांनी अनेक महत्त्वाच्या संस्था उभारल्या, उत्साहपूर्ण संशोधन करणाऱ्या अनेक संशोधन केंद्रांचे श्रेय त्यांना जाते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मनिला येथील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे संचालक म्हणूनही कार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र २०१८ मध्ये वाराणसीमध्ये सुरु करण्यात आले.

डॉ. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुन्हा मी ‘कुरल’ या तमिळ भाषेतील प्राचीन साहित्यरचनेचा हवाला देईन. त्यात लिहिले आहे की, ‘‘ज्यांनी योजना दृढतेने आखल्या असतील, ते त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांना पाहिजे त्या मार्गाने, फलित प्राप्त करतील.’’ स्वामिनाथन यांचे व्यक्तिमत्व डगमगून न जाणारे होते. आयुष्याच्या सुरुवातीलाच त्यांनी ठरवले होते की, त्यांना शेतीला बळ द्यायचे आहे आणि शेतकऱ्यांची सेवा करायची आहे.

त्यांनी हे काम अनोख्या पद्धतीने, नावीन्यपूर्ण रीतीने आणि उत्कटतेने केले. कृषी क्षेत्रातील नवोन्मेष आणि शाश्वततेच्या मार्गावर वाटचाल करत असताना डॉ. स्वामिनाथन यांचे योगदान आपल्याला निरंतर प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.

शेतकऱ्यांच्या हिताला पाठबळ देणे आणि वैज्ञानिक शोधाची फलनिष्पत्ती आपल्या कृषिविस्ताराच्या मुळांपर्यंत पोहोचेल हे सुनिश्चित करणे, पुढील पिढ्यांसाठी विकास, शाश्वतता आणि समृद्धी वृद्धिंगत करणे या त्यांनी जपलेल्या तत्त्वांप्रती आपली बांधिलकीही आपण सुनिश्चित करत राहिली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT