Rajinikanth 
संपादकीय

तमिळनाडूत राजकीय उलथापालथीचे वारे

प्रा. अविनाश कोल्हे

एखाद्या प्रादेशिक पक्षाचा सर्वेसर्वा काळाच्या पडद्याआड जातो, तेव्हा त्या पक्षात अंदाधुंदी माजते. आज तमिळनाडूत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डिसेंबर 2016 मध्ये अण्णा द्रमुकच्या नेत्या, मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाले, तेव्हापासून तेथे सुंदोपसुंदी सुरू आहे. जयललितांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये तीन गट पडलेले दिसतात. तमिळनाडूतील दुसरा महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष म्हणजे द्रमुक. या पक्षाचे नेते एम. करुणानिधी आता 93 वर्षांचे आहेत. त्यांचे दोन पुत्र स्टॅलिन व अळिगेरी यांच्यात पक्षाच्या नेतृत्वावरून संघर्ष होण्याची शक्‍यता आहे. थोडक्‍यात म्हणजे लवकरच तमिळनाडूच्या राजकीय पटलावर बरेच बदल दिसणार आहेत.

तमिळनाडूच्या राजकारणाचा विचार केल्यास काही बाबी ठळक होतात. या राज्यात चित्रपटांचे जग व राजकीय क्षेत्र यांचे घनिष्ठ संबंध आहेत. एम. जी. रामचंद्रन, जयललिता, अण्णा दुराई व आता द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी तमीळ चित्रपटांमध्ये नाव कमावले. हा प्रकार इतर राज्यांत आढळत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंतांनी राजकारणात प्रवेश करून पाहिला, पण त्यांना एक तर साफ अपयश आले (अमिताभ बच्चन) किंवा किरकोळ यश मिळाले (हेमामालिनी, विनोद खन्ना). ज्यांना यश मिळाले त्यांनासुद्धा मुख्यमंत्री वगैरेसारखी सत्तेची स्थाने मिळवता आली नाहीत. तो मान दक्षिणेतील तमिळनाडू आणि थोड्या प्रमाणात व थोड्या काळासाठी आंध्र प्रदेशातील (कै.) एन. टी. रामाराव वगैरेंच्या नशिबी होता.

दुसरी बाब म्हणजे तमिळनाडूत गेली अनेक दशके ब्राह्मणेतरांचे राजकारण जोरात आहे. याची सुरवात विसाव्या शतकाच्या सुरवातीला झाली. यासाठी रामस्वामी पेरियार यांनी पुढाकार घेतला होता. तमिळनाडूत 1967 च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला सत्ता मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत एकही राष्ट्रीय पक्ष तेथे सत्तेत आलेला नाही. हीसुद्धा तमिळनाडूच्या राजकारणाची खासियत म्हटली पाहिजे. आता मात्र यात बदल होण्याच्या शक्‍यता आहेत.

तमीळ चित्रपटसृष्टीचे आजचे सुपरस्टार म्हणजे रजनीकांत. ते कमालीचे लोकप्रिय आहेत. ताज्या बातम्यांनुसार ते राजकारणात प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तमिळनाडूचे राजकारण ढवळून निघण्याची शक्‍यता आहे. दोन दशकांपूर्वी त्यांनी "मथ्थू'ची केलेली भूमिका प्रचंड गाजली होती. तसे पाहिले तर रजनीकांत हे मराठी आहेत. त्यांचे खरे नाव आहे शिवाजीराव गायकवाड व त्यांचा जन्म बंगळूरमध्ये झाला. म्हणून ते कर्नाटकीही आहेत. मद्रासमधील "मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट'मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर 1975 मध्ये एका तमिळी चित्रपटात त्यांना अभिनयाची संधी मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे कौतुक झाले आणि बघता बघता रजनीकांत तमिळी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार झाले.
तमिळी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश केला. ज्यांना जमले नाही ते अभिनेते थोडासा प्रयत्न करून परत गेले. 1988 मध्ये शिवाजी गणेशन यांनी राजकीय पक्ष स्थापन करून बघितला. त्यांच्या पक्षाने 1989 च्या निवडणुका लढवल्या. पण या पक्षाचे सर्व उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे त्यांनी लवकरच पक्ष विसर्जित केला.

द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यांच्यातील यादवीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष उत्सुक आहे. त्याचप्रमाणे रजनीकांत यांच्यासारखे सुपरस्टारसुद्धा आपले नशीब आजमावून बघण्याची शक्‍यता आहे. तसे पाहिले तर रजनीकांत यांनी या अगोदर राजकारणात हात-पाय मारून बघितले आहेत. त्यांनी 1996 च्या निवडणुकीत द्रमुक व तमीळ मनिला कॉंग्रेस यांच्या युतीला जाहीर पाठिंबा दिला होता.

आता पुन्हा एकदा रजनीकांत राजकारणात नशीब आजमावून पाहण्याची शक्‍यता आहे. आता ते 66 वर्षांचे आहेत. त्यांचे अक्षरशः हजारो चाहते आहेत. पण राजकीय क्षेत्रासारख्या पूर्ण वेळेच्या कामाला ते कितपत वेळ देऊ शकतील याबद्दल रास्त शंका घेतल्या जात आहेत. 2008 मध्ये त्यांच्या चाहत्यांनी कोईमतूरमध्ये त्यांच्यासाठी पक्षाची स्थापना केली; पक्षाचे नाव व झेंडा निश्‍चित केले होते. पण कोठे माशी शिंकली ते कळले नाही. रजनीकांत यांनी पत्रक काढून या पक्षाशी आपला काहीही संबंध नाही असे जाहीर केले. त्यामुळे हा पक्ष जन्मण्याअगोदरच मृत झाला. आता पुन्हा एकदा ते राजकारणात येण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसते.

येथे रजनीकांत यांची तुलना एन. टी. रामाराव यांच्याशी करण्याचा मोह आवरत नाही. रामाराव यांनीसुद्धा वयाच्या 60 व्या वर्षी राजकारणात उडी घेतली व राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांनी 1982 मध्ये स्थापन केलेला तेलुगू देसम पक्ष पुढच्याच वर्षी सत्तेत आला. याचे कारण आंध्र प्रदेश व तमिळनाडूचा राजकीय इतिहास वेगळा आहे. तमिळनाडूमध्ये गेली अनेक दशके केंद्राविरुद्धचे राजकारण जोरात आहे. तसेच आंध्राचे नव्हते. रामाराव यांनी पक्ष स्थापन केला, तेव्हा तो पहिलाच प्रादेशिक पक्ष होता. तमिळनाडूत आजही अनेक छोटे-मोठे प्रादेशिक पक्ष आहेत.
आज देशाच्या राजकीय जीवनात प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी झालेले दिसते. हे महत्त्व 1990 व 2000 च्या दशकांत अतोनात वाढले होते. पण मे 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवल्यापासून प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी झाले आहे. त्यानंतर भाजपने उत्तर प्रदेश व आसाममध्ये स्वबळावर सत्ता हस्तगत केली. या दोन्ही राज्यांत प्रादेशिक पक्ष जोरात होते. पण भाजपने या दोन्ही राज्यांतील प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी करण्यात यश मिळवले. आता भाजपने तमिळनाडूवर लक्ष केंद्रित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT