Finland 
संपादकीय

राजकारणात तळपणारे ‘अर्धे आकाश’

प्रज्ञा शिदोरे

फिनलंड या देशातल्या अनोख्या शिक्षणपद्धतीविषयी आपण अनेकदा वाचलं असेल. पण सध्या हा देश चर्चेत आहे, तो तिथल्या नवनिर्वाचित पंतप्रधान सना मरिन यांच्यामुळे. मागच्या आठवड्यात फिनलंडमध्ये सना मरिन (वय ३४) यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हा त्या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या. ३२-२९ अशा थोड्या फरकानं त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला हरवलं. मरिन यांना सरकार स्थापनेसाठी इतर चार पक्षांनी मदत केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या चारही पक्षांच्या प्रमुख महिलाच आहेत; तेदेखील ३५ वर्षांखालील महिला. फिनलंडला राजकारणात स्त्री-पुरुष समानतेचा दांडगा इतिहास आहे. १९०६ मध्ये महिलांना मतदानाचा, तसेच राजकीय उमेदवारीचा अधिकार देणारं फिनलंड हे युरोपातलं, कदाचित जगातलंही पहिलं राष्ट्र ठरलं. या शतकात फिनलंडला सना मरिन यांच्यासह आतापर्यंत तीन महिला पंतप्रधान लाभल्या आहेत. तीन महिला पंतप्रधान आणि बारा वर्षे कारकीर्द असलेल्या लोकप्रिय अशा एक राष्ट्राध्यक्ष. फिनलंडमध्ये आज नऊ प्रमुख राजकीय पक्ष आहेत. यापैकी सहा पक्षांच्या प्रमुख महिला आहेत. सना मरिन या अशा समाजाचा भाग आहेत.

मरिन यांचं बालपण सर्वसामान्य नव्हतं. त्यांच्या लहानपणीच आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या आईनं आणि आईची मदतनीस यांनी मिळून त्यांना वाढवलं. सना मरिन म्हणतात, की अशी ‘रेनबो’ कुटुंबं सध्या अनेक दिसतात, त्याचं आता वेगळेपण जाणवत नाही. पण लहानपणी याचं दडपण यायचं. मरिन ही त्यांच्या कुटुंबातील राजकारणात गेलेली, एवढंच नव्हे तर उच्च शिक्षण घेतलेली पहिलीच व्यक्ती. सना मरिन हे नाव आपल्याला नवं असलं, तरी फिनलंडसाठी ते नवं नाही. २००६ मध्ये मरिन यांनी फिनलंडमधील सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाचं सदस्यत्व घेतलं. या पक्षाच्या युवक संघटनेचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना २०१० मध्ये मिळाली. त्याआधी २००८ मध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये त्या उमेदवार म्हणून सहभागी झाल्या, पण म्हणावं तसं यश त्या मिळवू शकल्या नाहीत. २०१२ नंतर त्यांच्या राजकीय प्रवासाचं चित्र बदललं. वयाच्या २७ व्या वर्षी त्या टॅंपेराच्या सिटी कौन्सिलमध्ये निवडून आल्या. २०१२-१७ या पाच वर्षांत त्यांनी टॅंपेराच्या सिटी कौन्सिलचं अध्यक्षपद भूषवलं. तिथं त्यांची कौन्सिलमधील भाषणं, चर्चा याला ‘यू-ट्युब’वर बरीच प्रसिद्धी मिळाली होती. 

२०१५ मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी त्या फिनलंडच्या संसदेवर निवडून गेल्या. त्या पीरकाननमा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. याच वर्षी जूनमध्ये त्यांना वाहतूक आणि दळणवळण मंत्रिपद मिळाले. टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांचा ‘बंद’ नीट हाताळू न शकल्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या अँटी रिने यांना पदच्युत व्हावं लागलं. पक्षामधील अंतर्गत निवडणुकीनंतर त्यांच्या जागी मरिन या फिनलंडच्या पंतप्रधान बनल्या. या निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध लढत असलेल्या त्यांच्या ३७ वर्षीय पुरुष प्रतिस्पर्ध्यानं आता कुटुंबाकडे लक्ष द्यायला हवं म्हणून कोणतंही राजकीय पद घेण्यास नकार दिला आहे. 

मरिन यांच्या पंतप्रधानपदाची घोषणा झाल्यावर लगेच त्यांना जगभरातील अनेक प्रसारमाध्यमांकडून मुलाखतीसाठी विचारणा होऊ लागली. तेव्हा त्या स्त्री असण्याविषयीचे सर्व प्रश्‍न त्यांनी धुडकावून लावले. त्या म्हणाल्या, ‘मला माझ्या नियुक्तीविषयी फार काही बोलायचं नाही; आम्ही फिनलंडमध्ये बदल घडवून आणू याची ग्वाही दिली होती. आता ते साध्य करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे. प्रत्यक्ष कामामुळेच आमच्यावर जनतेनं टाकलेल्या विश्‍वासाला आम्ही जागलो असं म्हणता येईल.’ पण निवडून आल्यावर त्यांनी केलेल्या ‘ट्‌विट’मध्ये वातावरणातील बदल, समानता आणि सामाजिक कल्याण या मुद्‌द्‌यांशी बांधीलकी राखत आपण आपलं सरकार चालवू, असं म्हटलं आहे. सध्या जगभरातील महत्त्वाच्या देशांना भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे मतांच्या, विचारधारणेच्या ध्रुवीकरणाचा. हाच प्रश्‍न फिनलंडलाही भेडसावतो आहे. ‘लेफ्ट लिबरल’ आणि ‘काँझर्वेटिव्ह नॅशनॅलिस्ट’ असे दोन तट तिथेही आहेत.मरिन यांना आणि त्यांच्या सरकारमधील घटक पक्षांना ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ही कसोटी त्या कशी पार पाडतात, त्यांचं वय, त्यांच्या सहकारी पक्षांतील पक्षप्रमुखांचं वय आणि लिंग या गोष्टी त्यांना उपयोगी ठरतात की मारक? फिनलंडमधील दोन-तीन पिढ्यांमध्ये समन्वयाचं काम त्या करू शकतील काय, हे  येणारा काळच सांगेल. 

तुलना करायची नाही म्हटलं तरी ती केल्यावाचून राहवत नाही! कारण फिनलंड आणि महाराष्ट्र यांच्यात क्षेत्रफळ सोडलं तर कशातच साम्य नाही. क्षेत्रफळ सारखं असलं तरी महाराष्ट्राची लोकसंख्या फिनलंडच्या २२ पट आहे! पण याचा अर्थ महाराष्ट्रात राजकारणात महिलांचा सहभाग २२ पट अधिक आहे काय? तर निश्‍चितच नाही. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना महाराष्ट्रात मोठं राजकीय यश संपादन करणाऱ्या स्त्रिया हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच असतील. त्यामुळेच फिनलंडच्या सना मरिन यांचं उदाहरण महाराष्ट्रातील सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT