त्रिपुरा येथील मशिदीची मोडतोड झाल्याची बातमी समाजमाध्यमांतून पसरल्यानंतर स्थानिक नेत्यांची जबाबदारी ही त्या बातमीचा खरा खोटेपणा तपासून पाहण्याची होती. मात्र, वर्षाचे ३६५ दिवस आणि दिवसाचे २४ तास केवळ विद्वेषाचे राजकारण करून ध्रुवीकरणाची आस धरणाऱ्या नेत्यांना हे सांगायचे कोणी?
भारतात २०१० मध्ये ‘व्हॉट्सॲप’ नावाचं एक नवंच साधन तुमच्या-आमच्या हातातील सेलफोनवर उपलब्ध झालं आणि संदेशवहनाचे एक नवेच ‘सब से तेज’ दालन हाती आल्याचा आनंद तमाम जनतेला झाला. त्यानंतर लोटलेल्या १०-११ वर्षांत या साधनाचं रूपांतर अफवा, विद्वेष तसेच ‘फेक न्यूज’ पसरवणाऱ्या साधनात होऊन गेलं. आता भारतातील किमान ४०-४५ कोटी जनता याच ‘व्हॉट्सॲप’ विद्यापीठातून प्रसारित होणारं ज्ञानामृत रोजच्या रोज प्राशन करत आहे आणि त्यातून समाजात मोठी दरी निर्माण होत असल्याचं, असलेल्या दऱ्या रुंदावत असल्याचं दिसत आहे. अमरावतीमध्ये शुक्रवार आणि शनिवारी जे काही घडलं त्यास याच विद्यापीठानं प्रसारित केलेल्या खोट्या बातम्या आणि अफवा जबाबदार असल्याचं दिसत आहे.
झालं असं, की अमरावतीपासून तब्बल दोन हजारांहून अधिक किलोमीटर अंतरावरील त्रिपुरामध्ये एका मशिदीची मोडतोड झाल्याची माहिती या ‘विद्यापीठा’तून सर्वदूर पोचली. लगोलग अमरावती तसेच नांदेड आणि मालेगावातील मुस्लिमांची माथी भडकली. या बातमीची शहानिशा न करताच अशा प्रकार मोर्चे काढण्याचे, रस्त्यावर उतरण्याचे प्रयोजन काय? ना या मोर्चेकऱ्यांनी ती शहानिशा केली, ना त्यांना उत्तर देऊ पाहणाऱ्या भाजपच्या कोण्या नेत्याने केली! मग तापलेल्या डोक्यांच्या मुस्लिमांनी लगोलग मोर्चे काढले. अमरावतीतील मोर्चास काहीसे हिंसक वळण लागले आणि तुरळक ठिकाणी दगडफेक आणि पाच-सात ठिकाणी दुकानांची मोडतोड आदी प्रकार घडले. या मोर्चाबाबत पोलिसांचा अंदाज सपशेल चुकला. तो अपेक्षेपेक्षा मोठा म्हणजे २५-३० हजारांचा होता आणि त्यास खऱ्या अर्थानं नेतृत्वही नव्हतं. त्या समाजातील विविध गट-तटांचे आणि विविध संघटनांचे तसेच वेगवेगळ्या पक्षांशी बांधीलकी असणारे लोक त्यात सामील झाले होते. तरीही एक फुटाणेवाला किरकोळ जखमी होण्यापलीकडे त्यात फार काही हिंसाचार झाला नव्हता. मात्र, काही ठिकाणी मुस्लिमांनी तलवारी बाहेर काढून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पोलिसांना मोर्चा पांगवण्यात यश आलं आणि शुक्रवारचा दिवस मावळला.
अमरावती जिल्हा परिषद तसेच महापालिका यांच्या निवडणुका येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या हातात मग हा मुद्दा अलगद येऊन पडला! -आणि नेते मंडळींनी शनिवारी ‘अमरावती बंद’ पुकारला. शनिवारी सकाळी शहराच्या मध्यवर्ती भागातील राजकमल चौकात अनिल बोंडे, जगदीश गुप्ता, प्रवीण पोटे असे तीन माजी पालकमंत्री मोठी कुमक घेऊन दाखल झाले. त्यांच्या पाठीशी अत्यंत आक्रमक झालेले विविध हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे जत्थे होते. मोर्चाने पुढे हिंसक वळण घेतले. भाजपच्या या मोर्चास व्यापारी संघटनांचा पाठिंबा होता आणि त्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळेच उसळलेल्या हिंसाचाराचा फटका मुस्लिम समाजालाच बसला अणि मग अमरावतीत संचारबंदी पुकारण्यात आली. अमरावती महापालिका भाजपच्या ताब्यात असली तरी अन्य परिसरात आजवर भाजपला मोठे यश मिळालेले नाही. त्यामुळेच भाजपने हे जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, असाही प्रश्न यामुळे सामोरा आला आहे. दरम्यान, त्रिपुरात कोणत्याही मशिदीची मोडतोड झालेली नाही, असा खुलासा केंद्रीय गृहखात्यानं केला आहे. खरं तर भाजपनं हे डोकी तापलेल्या मुस्लिमांना समजावून सांगायला हवं होतं. त्याऐवजी मुस्लिमांच्या शक्तिप्रदर्शनाला आपली ताकद दाखवून उत्तर देण्याचा प्रयत्न भाजपनं केला आणि त्याची झळ अमरावतीतील सर्वसामान्य जनतेला बसली.
ध्रुवीकरणाचे दुष्परिणाम
‘व्हॉट्सॲप’वरील अफवांमुळे हिंसक दगली होण्याचे प्रकार आपल्या देशात अनेकदा घडले आहेत. दिल्लीत गेल्या दशकातील हिंसक दंगल अलीकडेच घडली आणि त्यात ५० जणांचा हकनाक बळी गेला. त्यास अशाच प्रकारचा अफवांचा प्रसार कारणीभूत होता.२०१३ मध्ये उत्तर प्रदेंशात मुझफ्फरनगर येथे ६० जणांचा बळी घेणारी दंगलही एका ‘फेक व्हीडिओ’नंतरच सुरू झाली होती. त्यामुळे त्रिपुरा येथील मशिदीची मोडतोड झाल्याची बातमी याच माध्यमावरून आल्यावर स्थानिक नेत्यांची जबाबदारी ही त्या बातमीचा खरा खोटेपणा तपासून पाहण्याची होती. मात्र, वर्षाचे ३६५ दिवस आणि दिवसाचे २४ तास केवळ विद्वेषाचे राजकारण करून ध्रुवीकरणाची आस धरणाऱ्या नेत्यांना हे सांगायचे कोणी? शिवाय, मस्लिमांनी शुक्रवारी काढलेल्या मोर्चामुळे आता राज्यात २०१४ पासून शांत राहिलेला हा समाज आक्रमक होऊ पाहत आहे, असेही बघावयास मिळाले. त्या वास्तवाचे राजकारण करू पाहणारे बेजबाबदारपणा करीत आहेत. नेतेमंडळींचा हा सारा खेळ सर्वसामान्यांना मात्र वेठीस धरणारा आणि शिवाय हिंसाचाराचा फटका देणाराही आहे. मालेगावसारखे दंगलप्रवण शहर नंतर शांत राहते आणि अमरावतीत मात्र आगडोंब उसळतो, याचा हाच अर्थ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.