Radhakrishna Narvekar Sakal
संपादकीय

हाडाचा पत्रकार!

सत्तरचं ते दशक मुंबईकरांसाठी खूपच धकाधकीचं होत. शिवसेनेनं मुंबईच्या राजकारणात नवा बाज उभा केला होता. कामगार वर्गही आंदोलनाच्या पवित्र्यात होता.

प्रकाश परांजपे

प्रश्‍न कामगारांचा असो, नाही तर ग्रामीण भागाचा... राधाकृष्ण नार्वेकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांची तड लावण्यावर भर दिला. ते हाडाचे पत्रकार होते. ‘सकाळ’ (मुंबई)चे संपादक म्हणून काम करताना त्यांनी आपल्या खास शैलीचा ठसा उमटवला.

सत्तरचं ते दशक मुंबईकरांसाठी खूपच धकाधकीचं होत. शिवसेनेनं मुंबईच्या राजकारणात नवा बाज उभा केला होता. कामगार वर्गही आंदोलनाच्या पवित्र्यात होता. कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांच्या हत्येमुळे पत्रकारांना बरेच काम लागले होते. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ माध्यम समूहा’नं मुंबईत पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला होता. दस्तुरखुद्द नानासाहेब परूळेकर मुंबईत दाखल झाले होते. त्यांचं लक्ष मग ‘नवाकाळ’मध्ये खणखणीत बातमीदारी करणाऱ्या राधाकृष्ण नार्वेकर या युवकाकडे न जातं तरच नवल! सकाळी अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करणारे नार्वेकर दुपारनंतर बातमीदाराचा वेश परिधान करत. तेव्हा कृष्णा देसाई खून खटल्याची सुनावणी सुरू होती आणि नार्वेकरांच्या वृत्तांतावर वाचकांच्या उड्या पडत. पुढे यथावकाश नार्वेकर ‘सकाळ’मध्ये दाखल झाले. त्यांची हाडाची बातमीदारी ‘सकाळ’मध्ये सुरू झाली. चंद्रकांत घोरपडे, माधव गडकरी आणि आत्माराम सावंत अशा संपादकांसमवेत काम करताना पुढे नार्वेकर वृत्तसंपादक आणि नंतर संपादकही झाले. पण तळागाळातील मुंबईकर तसंच कामगार यांच्याशी जुळलेली नाळ त्यांनी कधीच तोडली नाही. शिवाय, स्पर्धेत काही बडी वृत्तपत्रे असतानाही आपला अभिमान आणि ‘सकाळ’वरील निष्ठा त्यांनी कधीच सोडली नाही.

बांधिलकी समाजाशी

मुंबई महापालिका, मंत्रालय, विधानभवन असा त्यांचा सर्वत्र मुक्त संचार असे. महापालिकेची सभा सुरू होण्याआधी घडलेला प्रसंग आजही डोळ्यांसमोर आहे. नार्वेकर बहुधा पहिल्यांदाच पालिकेत बातमीदार म्हणून आले होते. सभागृहात महापौर आसनाचा समोरच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात पत्रकारांसाठी असलेल्या कक्षात ते आले, रिकाम्या असलेल्या पहिल्या खुर्चीत बसू लागले; तेव्हा बाकी पत्रकारांनी ‘अहो, ती खुर्ची टाइम्स ऑफ इंडियासाठी राखीव आहे,’ असे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिकडे लक्ष न देता ते त्याच खुर्चीत हक्काने विराजमान झाले. काही क्षणांत टाइम्सचे भीष्मा देसाई यांचे आगमन झाले. त्यांनी नार्वेकरांना ही खुर्ची ‘आरक्षित’ आहे, असे सांगितले. पण त्यांनी आरक्षण वगैरे काही चालणार नाही, असे ठणकावलेच, पण जो येईल त्याने पाहिजे त्या खुर्चीवर बसावे, असे जाहीर करून टाकले आणि टाइम्सची मक्तेदारी मोडून काढली. नार्वेकरांची पत्रकारिता सामाजिक बांधिलकीतून फुलत गेली. १९९० नंतर कोकण रेल्वे होणार याचे स्पष्ट संकेत मिळाले. यासाठी रेल्वेने बॉण्ड काढले. ते जास्तीत जास्त लोकांनी घ्यावे म्हणून नार्वेकर भरपूर फिरले. लोकजागृतीची मोहीमच हाती घेतली आणि काही लाखांचा फंड रेल्वेला उपलब्ध करून दिला. नार्वेकरांची काही श्रद्धास्थानं जरूर होती, पण ते अंधश्रद्धेविरुद्ध होते. मुख्यमंत्री असताना, मनोहर जोशी यांनी केलेल्या ‘गणपती दूध प्यायला!’ या वक्तव्याने मोठे वादंग उठले होते. त्या वेळी ‘सर, तुम्हीसुद्धा...’ हा नार्वेकरांचा लेख गाजला होता. याच काळात पोस्ट खात्याने मुंबईत प्रत्येक इमारतीत तळमजल्याला प्रत्येकाने एक पेटी ठेवावी, त्यात पोस्टमन टपाल ठेवतील, जिने चढणार नाहीत, असा निर्णय घेतल्याने प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. नार्वेकर बातमी देऊन थांबले नाहीत, तर लोकचळवळ उभारली आणि ते फर्मान रद्द करणे पोस्टाला भाग पाडले.

गेल्या ४०वर्षांत मला नार्वेकर यांच्याकडून आई, वडील यांच्याप्रमाणे प्रेम मिळाले. नार्वेकर हे परांजपे कुटुंबाचा आधारवड होते. आयुष्यातील अनेक कसोटीच्या क्षणी ते पाठीवर हात फिरवत आणि नवी उमेद देऊन जात. नार्वेकर हे माणुसकीचा गहिवर होते, याचा प्रत्यय १९७५पासूनच होता.

गावे काढली पिंजून

संपादक झाल्यापासून ‘मुंबई सकाळ’च्या क्षेत्रात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे नार्वेकर फिरले, स्थानिक वार्ताहराकडून प्रश्न समजावून घेतले. ‘सकाळ’मध्ये त्याला प्रसिद्धी दिली. तालुकावार माहितीपूर्ण पुरवणी काढायची ही कल्पना त्यांचीच. त्यामुळे वाचकांना तालुक्‍याची चौफेर माहिती एका ठिकाणी मिळे. तेव्हा ते अनेकदा गावागावांत फिरले; पण ‘संपादक’ हा भाव त्यांच्यात कधीच दिसला नाही. त्यामुळे मुंबई आवृत्तीच्या क्षेत्रातील ग्रामीण भागात ‘सकाळ’ कमालीचा लोकप्रिय झाला.

साधारणत: १९८०ची घटना असावी. कसारा घाटात खासगी बसला मोठा अपघात होऊन ३० जण ठार झाले होते. मी बातमी व फोटो घेऊन शहापूरला आलो. त्या वेळी फॅक्‍स नव्हते की मोबाईल आणि लोकलही नव्हती. मी नार्वेकरांना फोन केला आणि माहिती सांगितली. ते म्हणाले ही हेडलाईन होणार, तू साडेनऊपर्यंत खास कार करून पोहोच! त्या वेळी वाहनव्यवस्था नव्हती, पण सुदैवाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता खान शहापूरला आले होते. त्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी प्रभादेवी येथे असलेल्या ‘सकाळ’ कार्यालयापर्यंत सोडण्याचे मान्य केले. नार्वेकरांना भेटलो, तेव्हा ‘तू पहिले काही तरी खा’, असं म्हणून माझ्याबरोबर समोरच्या हॉटेलमध्ये आले, आग्रह करून खाऊ घातले. ‘सकाळ’च्या वृत्तसंपादकाची माझ्यासारख्या कनिष्ठ वार्ताहराबद्दल इतकी आपुलकीची वागणूक! तेव्हाच मला हा माणूस आपला वाटला. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. काळाच्या ओघात मला त्यांनी मित्र कधी मानले, हेही कळलेच नाही. असे अनेक मित्र त्यांनी समाजाच्या विविध स्तरांत जोडले. त्यातून मुंबईत ‘सकाळ’ परिवार वाढत गेला.

नार्वेकर यांच्या निधनाने पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT