rohini-godbole 
संपादकीय

प्रयोगशील संशोधन मोलाचे!

सम्राट कदम

भारत आणि फ्रान्समधील संशोधन सहकार्यातील भरीव योगदानाबद्दल बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या (आयआयएससी) भौतिकशास्त्रज्ञ प्रा. रोहिणी गोडबोले यांना फ्रेंच ‘नॅशनल ॲवॉर्ड ऑफ मेरिट’ हा सन्मान घोषित झाला आहे. फ्रान्स सरकारच्या वतीने परदेशी नागरिकांना मिळणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. त्यानिमित्ताने प्रा. गोडबोले यांच्याशी केलेली बातचीत... 

प्रश्‍न - तुमचे मूलभूत कणांसंबंधीच्या संशोधनाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कारण ‘हिग्ज बोसॉन’च्या शोधानंतर तुमच्या संशोधनाची जगभर चर्चा झाली. 
प्रा. गोडबोले - आपले विश्‍व हे एक ‘इमारत’ आहे असे मानले; तर ते कोणत्या विटा, सिमेंट आणि वाळूपासून बनले आहे. त्यासंबंधीचे प्रश्‍न विचारण्याचे आणि त्याची उत्तरे शोधण्याचे काम कणभौतिकशास्त्र करते. विश्‍व ज्यापासून बनलंय तो मूलभूत कण नक्की कोणता, तो एकत्र येऊन प्रोटॉन, इलेक्‍ट्रॉन्स व अणू कसे तयार झाले, अशा मूलभूत प्रश्‍नांची उत्तरे कणभौतिकशास्त्रज्ञ शोधतात. आजवर जे मूलभूत कण सापडले, त्यांच्याबद्दल जी माहिती मिळाली, ती बरोबर आहे का नाही हे तपासण्याचे काम प्रवेगक निरीक्षक (कोलायडर) वापरून केल्या जाणाऱ्या प्रयोगांमध्ये होते. अशा प्रकारचे प्रयोग १९६०पासून होत आहेत, फक्त कणांची ऊर्जा वाढत गेली आहे. हे संशोधन आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या कोणत्याही एका देशाला परवडत नाही. त्यामुळं आंतरराष्ट्रीय सहकार्याने संशोधन होते. जिनिव्हातील सर्न प्रयोगशाळेत शोधलेला ‘हिग्जबोसॉन’ हे याच संशोधनाचा भाग आहे. अशा मूलभूत कणासंबंधीच्या सैद्धांतिक संशोधनामध्ये १९७४मध्ये मी संशोधक विद्यार्थी म्हणून सहभागी झाले. हा ‘हिग्जबोसॉन’ नक्की कसा असेल, तो शोधायचा कसा, त्याचे गुणधर्म नक्की कसे तपासायचे यासंबंधी मी फ्रेंच सहकाऱ्यांसोबत केलेल्या दोन-तीन कल्पनांचा समावेश आहे. 

प्रत्येक कणाला न फिरताही स्वतःची कोनीय गती (अँग्युलर मोमेंटम) असते. त्याला आपण ‘स्पीन’ म्हणतो. इलेक्‍ट्रॉनसाठी ही ‘एचक्रॉस गुणिले १/२’ आणि हिग्जबोसॉन या कणासाठी ती शून्य असते. या स्पीनशी निगडित एक समानतेचा गुणधर्म (पॅरिटी) आहे. कणांचा ‘पॅरिटी’संदर्भातील गुणधर्म तपासण्यासाठी आम्ही संशोधकांना २००७ मध्ये प्रयोग  सुचविला होता. 

तेंव्हा हिग्ज बोसॉन सापडलेला नव्हता. पण तोपर्यंत आम्हाला हा मूलभूत कण नक्की अस्तित्वात आहे, असा विश्‍वास होता. हिग्ज बोसॉनचे रूपांतर (डिसइंटीग्रेटेड) इतर मूलकणांमध्ये झाल्यावर त्यांचे वितरण कसे असेल आणि त्यावरून त्याच्या समानतेच्या गुणधर्माचा कसा अभ्यास करता येईल, आदी सैद्धांतिक संशोधनात माझा  सहभाग आहे. 

मूलभूत कणांसाठी ‘स्टॅंडर्ड मॉडेल’ पुरेसे आहे का? 
आजवरच्या संशोधनातून कणांचे गुणधर्म सांगणारे ‘स्टॅंडर्ड मॉडेल’ कणभौतिकशास्त्रज्ञांनी विकसित केले. प्रयोगावरून ते तंतोतंत बरोबर असल्याचेही सिद्ध झाले. या मॉडेलच्या माध्यमातून मूलभूत प्रश्‍नांची उकल होण्यास मदत होते. विश्‍वाच्या उत्पत्तीनंतर पहिल्या तीन मिनिटांत काय घडले, सूर्य ऊर्जा कशी तयार करतो, विश्‍वामध्ये हायड्रोजन, लिथीयम किती आहे अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे ‘स्टॅंडर्ड मॉडेल’च्या सहकार्याने मिळतात. पण असे स्टॅंडर्ड मॉडेल विश्‍वातील ‘अँटी मॅटर’संदर्भात फार काही सांगत नाही. विश्‍वाची निर्मिती झाली तेव्हा मॅटर आणि अँटीमॅटर दोघांचे समान अस्तित्व होते. पण ‘मॅटर’ विश्‍वात ‘डॉमिनेट’ होत गेलं आणि अँटीमॅटर ‘अनडॉमिनेट’ होत गेले. अँटीमॅटरचे अस्तित्व नक्की कसे, यासंबंधीच्या माहितीसाठी ‘स्टॅंडर्ड मॉडेल’पलीकडे काही मूलकण अथवा ‘अन्योनक्रियां’ची (इंटरॅक्‍शन्स) गरज आहे. हिग्स बोसॉनला ‘इव्हन पॅरिटी’सोबतच थोडी ‘ऑड पॅरिटी’ असणे हे या प्रश्नाचे एक उत्तर असू शकते. त्यामुळे हिग्स बोसॉनचा हा गुणधर्म काय आहे हे ठरविणे महत्त्वाचे. 

भारतीय वैज्ञानिकांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान, नवीन शैक्षणिक धोरण आणि पीएचडीधारकांमधील बेरोजगारीकडे तुम्ही कसे पाहता? 
कणभौतिकशास्त्रात भारतीय शास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जीनिव्हातील ‘सर्न’ प्रयोगशाळेच्या ‘सर्न-इंडिया’ कोलॉब्रेशन टास्क फोर्सची मी सदस्य होते. यासंबंधीच्या संशोधनाची दिशा निश्‍चित करण्यासाठी हा गट आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था, आयसर, आयआयएस्सी आदी संस्थांत शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. कोलायडरचा डिटेक्‍टरचे काही भाग विकसित करणे, त्यांची चाचणी घेणे आणि ते परदेशात पाठविण्याचे काम भारतीय शास्त्रज्ञांनी केलंय. हिग्ज बोसॉनच्या संशोधनातही त्यांचे मोठे योगदान आहे. भविष्यात ते वाढेल. 

उच्चशिक्षणामध्ये प्रयोगशील संशोधन गरजेचे आहे. पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधन काळातच विषयांची ओळख झाली, तर त्यांना भवितव्य निश्‍चित मिळते. देशात विज्ञानाशी निगडित अनेक प्रकल्प येताहेत. त्यासाठी आवश्‍यक कुशल मनुष्यबळ यातून निर्माण होईल. प्रगत देशांच्या तुलनेत आपल्याकडे विज्ञानात पीएचडी करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्या देशांत समाजातील १०हजार लोकांमध्ये १००शास्त्रज्ञ असतील, तर आपल्याकडे फक्त दहाच असतील. पीएचडीनंतर संशोधकांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग होईल अशा व्यवस्था कमीच आहे. विद्यापिठीय संशोधन वाढविले गेले, तांत्रिक संशोधन संस्था उभ्या राहिल्या, उद्योगांनी सहभाग वाढविला तर नवीन संशोधकांना योग्य रोजगार मिळेल. 

तुमची भौतिकशास्त्रातील आवड कशी निर्माण झाली? 
पुण्यातच जन्मलेली मी ‘हुजुरपागे’त अकरावीपर्यंत शिकले. शिक्षणासाठी पूरक वातावरण कुटुंबात होतंच. शिक्षण, तेही उच्च दर्जाचं मिळविणे घरात नवीन नाही. सातवीला असताना मेरिट स्कॉलरशिप परीक्षेनिमित्ताने मी आमच्या शिक्षिकांच्या पतीकडून ‘शास्त्र’ शिकले. माझी विज्ञानाची आवड त्यांच्या शिकविण्यातून सुरू झाली. शास्त्राचा आग्रह तेव्हापासून आहे. संशोधनाची आवड ‘नॅशनल टॅलेंट सर्च’मधून झाली. मला तेव्हा वाटत होते, मी गणित किंवा संस्कृतमध्ये पीएचडी करेन. पण या परीक्षेमुळे माझी विज्ञानाबद्दलची क्षितिजे रुंदावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur School: कोल्हापुरात मनपा शाळेत पालकांचा गोंधळ; ‘यह मत कहो खुदा से’ प्रार्थनेवर घेतला आक्षेप

IND vs AUS: ते असतील हुशार, पण...! पॅट कमिन्सने दिले टीम इंडियाला ओपन चॅलेंज, वाचा काय म्हणाला

Assembly Election: बारामतीत घड्याळ की तुतारी? कोणते मुद्दे ठरणार वरचढ? कोण जिंकणार गड? वाचा सविस्तर...

Heavy Earrings Tips: वजनदार कानातले घालून कानात होणार नाही वेदना, फॉलो करा 'या' ट्रिक्स

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांना संपर्क सुरू

SCROLL FOR NEXT