पुष्पा सिनेमाने तरुणाईला सध्या वेड लावलंय. त्याला मार्क द्यायचे झाले किंवा ग्रेडिंग करायचं झालं तर तसा हा सिनेमा ड दर्जाचा. ‘पुष्पा’चं मॅजिक चाललंय, हे मात्र नक्की. डेव्हिड वॉर्नर जिथे श्रीवल्लीवर नाचतो, यात ‘पुष्पा’चं व्यावसायिक यश अधोरेखीत होते. साधारण ४९ वर्षांपूर्वी ‘जंजीर’ चित्रपट आला होता. तेव्हाच्या पिढीच्या मनात असलेली नैराश्याची भावना सलीम-जावेदनी पडद्यावर सक्षमपणे साकारली होती.
अमिताभच्या भूमिकेला नकारात्मक छाया होती, तरी त्यात अनैतिक शक्तींचा विजय तेव्हा साकारला गेला नाही. आता अनैतिकतेच्या विजयाचा उन्माद दाखवून सिनेमे समाजाला कुठे नेऊ पाहतात, हा विचार करण्याचा मुद्दा. ‘पुष्पा’ चित्रपटात तस्करीचे उदात्तीकरण दाखवले आहे. येन-केन-प्रकारे यशस्वी व्हायचंच या विचारामुळे चुकीच्या गोष्टींना समाजमान्यता मिळू लागली आहे. ‘पुष्पा’ पाहिल्यानंतर साधारण दोन तास आपण जगातला कोणताही प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकतो, असा पोकळ आत्मविश्वास निर्माण होतो. जशी हळुहळू चढलेली नशा उतरते, तसंच नंतर वास्तवाचे भान येऊ लागते, असा अनुभव हा सिनेमा बघणाऱ्या अनेकांना येतो.
पुष्पा साकारलेला अल्लू अर्जुन हा दक्षिणेतील सध्याचा सर्वाधिक अॅटिट्यूड असलेला हिरो मानला जातो. अॅटिट्यूड नसलेला हिरो या पिढीला मान्य नाही. अॅटिट्यूड थोडा बहुत गरजेचा असला तरी अतिअॅटिट्यूड धोक्याचा ठरतो, हे ‘पुष्पा’च्या अधिकांश प्रेक्षकांना कोण समजावणार? जसे रणबीरचा ‘सिंबा’ विचारी लोकांशी अजिबात रिलेट करत नाही. तसंच ‘पुष्पा’ पाहतानाही अनेकदा हसू आवरत नाही. हा सिनेमा पाहिल्यावर गुन्हेगारी पलीकडे जग नाही, असा एक समज पाहणाऱ्या काही बालीशबुद्धी प्रेक्षकांचा बनू लागतो. सध्याचा जमाना वेब सीरिजचा आहे. गेल्या दोन वर्षांत वेब सीरिजचा ओव्हरडोस झाला आहे. ‘फॅमिली मॅन’चा पहिला सीझन अप्रतिम होता, नंतर तोही गडगडला. ‘पुष्पा’बाबत स्टाईल आणि श्रीवल्ली हे चित्रपटाचे यूएसपी ठरले. ‘पुष्पा’ने आत्तापर्यंत ‘स्पायडरमॅन’लाही मागे टाकलंय. कुणालाही मागे टाकताना ‘‘मैं रुकेगा नय साला...’’ असंच अल्लू म्हणत असावा. दक्षिणेतीलच केजीएफनं ‘एन्ड गेम’चे रेकॉर्ड मोडले.
प्रादेशिक भाषेतील चित्रपट ग्लोबल होताहेत, हे व्यावसायिक यश वाखाणण्यासारखे आहे. पण सिनेमाच्या नियमांसंदर्भात म्हणाल तर दक्षिणेतील चित्रपट कशातच बसत नाहीत. लॉजिक नावाची काही चीज असते, हे बाजूला ठेवून हे चित्रपट पाहिले जातात आणि डोक्यावरही घेतले जातात.
‘जयभीम’ या चित्रपटाचा उल्लेख ‘पुष्पा’च्या अनुषंगानं आवर्जून करायला हवा. प्रेरणादायी आणि वास्तवदर्शी चित्रपट म्हणून ‘जयभीम’कडे पाहिले गेले. हाही चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. बॉलीवूडमधील शाहरुख खान आणि आमीर खानमध्ये जो फरक करता येतो, तोच फरक अल्लू अर्जून आणि सुरिया शिवकुमार यांच्यात करता येईल. थोडक्यात नायक आणि अभिनेत्यामधील फरक या दोघांत आहे. सुरियाही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. ‘जयभीम’ चित्रपटाचा संदेश प्रभावी व दूरदर्शी आहे. सामाजिक विषयांना थेट हात घालणारा हा चित्रपट समाज जडणघडणीत मोठे योगदान देणारा आहे. तर पुष्पा तरुणाईच्या डोक्यात हवा घुसवून वाममार्गाकडे नेणारा ठरू शकतो. सद्सद्विवेकबुद्धीचा शोध दुर्मिळ ठरत असताना एखादा पुष्पा त्यावर पाणी फेरून जातो, अन् मग पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागते, एवढंच!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.