Raghoba Assassination of Narayanrao Peshwa Book Maratha History esakal
संपादकीय

Sakal Editorial Article : पुस्तक - सफर : वस्तुनिष्ठ... तरीही रंजक इतिहासलेखन

Raghoba Assassination of Narayanrao Peshwa Book Maratha History : परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटिशांच्या भूमिकेलाही पुस्तकात न्याय दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मराठ्यांच्या इतिहासाचा (History of the Marathas) अभ्यास एकतर १७ व्या शतकापुरताच केला गेला, किंवा एकदम १८ व्या शतकाचा उत्तरार्ध ते १९ व्या शतकाच्या आरंभीचा काळ एव्हढाच मर्यादित ठेवला गेला आहे.

-डॉ. गौरव गाडगीळ

इतिहासाचे आकलन करून घेण्याच्या प्रयत्नात अनेक अडथळे असतात. त्यातील विवादास्पद कालखंडावर लिहिण्याचा प्रयत्न करणे ही तर आणखी निराळी गोष्ट. १८ व्या शतकातील भारताचा इतिहास हा आधुनिक कालखंडाच्या प्रारंभीचा एक रोमांचकारी अध्याय. प्रगतीबरोबरच कितीतरी विरोधाभासही या कालखंडात दिसतात. या इतिहासासंबंधी बरेच संशोधन केले गेले असले तरी त्याचा जास्त भर भारतीय उपखंडातील सामाजिक व सांस्कृतिक अंगांवर आणि सर्वोच्च सत्ता बनलेल्या ब्रिटिशांच्या उदयावरच राहिल्याचे आढळते.

मराठ्यांच्या इतिहासाचा (History of the Marathas) अभ्यास एकतर १७ व्या शतकापुरताच केला गेला, किंवा एकदम १८ व्या शतकाचा उत्तरार्ध ते १९ व्या शतकाच्या आरंभीचा काळ एव्हढाच मर्यादित ठेवला गेला आहे. वस्तुत: १७३० पासून १७७०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंतच्या काळात, पेशव्यांच्या अंमलाखालील ‘मराठा परिसंघ’ हा एक अखिल भारतीय महासत्ता म्हणून उदयास आला. त्याबद्दलची नवी तथ्ये आणि संसाधने आता उजेडात येत असूनही या विशिष्ट कालखंडाचा फारसा अभ्यास झाला नाही. या पार्श्वभूमीवर ‘मराठा परिसंघा’चा उदय हा देशातील एका प्रभुत्वसंपन्न महासत्तेचा आरंभ असल्याचे वास्तव स्थापित करण्याचा प्रयत्न डॉ. उदय कुलकर्णी यांनी आपल्या प्रारंभीच्या लिखाणातून केला आहे.

प्रस्तुत पुस्तकात मराठा राज्याचा हा राजकीय प्रवास आणखी पुढे नेलेला आहे. आपल्या सामूहिक स्मृतीत तिरस्करणीय मानले गेलेले एक पात्र त्याच्या केंद्रस्थानी आहे, ते म्हणजे राघोबादादा (Raghoba- Assassination of Narayanrao Peshwa). १७७० च्या दशकाच्या पूर्वार्धातील त्या रोमांचक घटनांनी भरलेल्या काळापूर्वी, मराठा राजकारणातील घडामोडींचाही धावता आढावा त्यांनी घेतल्याने वाचकांना पूर्वपीठिका कळायला मदत होते. लेखकाची शैली प्रासादिक आहे. महत्त्वाच्या विधानांमागचे पुरेसे संदर्भ ठिकठिकाणी उद्धृत केलेले आहेत. त्यामुळे लिखाणाला विश्वसनीयता प्राप्त होते.

राघोबादादा, नारायणराव, तुळाजी पवार, गारदी मंडळी, नागपूरचा सत्तासंघर्ष, प्रभू, होळकर, शिंदे आदी व्यक्तींची आजवर अज्ञात असलेली अनेक तथ्ये त्यांनी दिली आहेत. नारायणराव पेशव्याच्या अधिकृत निवासस्थानात घडवल्या गेलेल्या त्यांच्या हत्येने कलंकित झालेल्या मराठा इतिहासाच्या काळ्याकुट्ट कालखंडातील या साऱ्या व्यक्तिरेखा वेगवेगळ्या धूसर रंगछटातून आपल्यासमोर अवतरतात. मराठा राज्यांतर्गत एक शक्ती म्हणून ‘गारदी’ लोक कसे पुढे आले आणि मराठी समाजात प्रभू लोकांचे काय स्थान होते, याविषयीची माहिती थक्क करून सोडते. नारायणराव, सखारामबापू, नाना फडणवीस आणि राघोबा या प्रमुख पात्रांचे व्यक्तित्व आणि त्या प्रत्येकाच्या कृतीमागचे त्यांचे त्यांचे संभाव्य उद्दिष्ट जाणून घेण्याचा लेखकाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटिशांच्या भूमिकेलाही पुस्तकात न्याय दिला आहे. १७७३ च्या ‘रेग्युलेटिंग ॲक्ट’ची अंमलबजावणी होऊ लागल्यानंतरच्या काळात तत्कालीन बॉम्बे आणि कलकत्ता शासनामधील गुंतागुंतीच्या संबंधांचे मौलिक विश्लेषण हाही या विवेचनाचा विशेष. आनंदीबाई आणि गोपिकाबाई या स्त्रियांची भूमिका आणि त्यांच्या प्रभावाचे यथोचित चित्रण वाचायला मिळते. ‘ध’ चा ‘मा’ केल्याची कथा खरी आहे का?” या प्रश्नाचे समर्पक उत्तरही हे पुस्तक देते. पुस्तकाच्या मध्यावरच त्याचा उत्कर्षबिंदू येत असला तरी कथनशैली चित्तवेधक आहे. ही रंजक शैली इंग्रज आणि मराठा युद्धांच्या रूपाने कथानकात पुढे फिरत राहणाऱ्या घटनाचक्राच्या आरंभापाशी वाचकाला अलगद नेऊन सोडते.

विविध वंशावळी देण्यात आल्या आहेत. नेटका पात्रपरिचय, माहितीपर परिशिष्टे, शनिवारवाड्याचा नकाशा आणि आकर्षक चित्रे यांचा समावेश हे पुस्तकाचे वैशिष्ट्य. मराठा इतिहासातील एक काळा कालखंड या पुस्तकात करड्या रंगाच्या विविध छटांमध्ये चितारला गेल्याचे सूचन मुखपृष्ठातून होते. प्रामुख्याने १७७० च्या दशकाच्या सुरुवातीच्या आणि मध्यावरच्या प्रक्षुब्ध कालखंडातील राजकीय घटनांचे कथन यात आहे.

जात, धर्म; तसेच आदिवासी समाज आणि त्यांच्या रियासतींची भूमिका याबद्दलच्या प्रश्नांचे संदर्भ तुरळक येतात. लोकस्मृतीत आणि लोककथनात इतिहास हा बहुदा कर्तबगार महापुरुष आणि दुष्ट खलपुरुष यांच्या संघर्षकथांच्या स्वरूपात चितारला जातो. असे चित्रण कृष्णधवल रंगात केलेले असते. या पुस्तकात मात्र लेखक सर्व पात्रांचे आणि घटनांचे वास्तवाधारित दर्शन घडवतो. पात्रांच्या वर्तनावर न्यायनिवाडा तो करत नाही. यातच या लेखनाचे श्रेष्ठत्व दडलेले आहे. निखळ ऐतिहासिक तथ्ये मांडत लेखक चित्ताकर्षक कथानक गुंफत जातात.

पुस्तक : राघोबा- ॲसेसिनेशन ऑफ नारायणराव पेशवा

लेखक : उदय कुलकर्णी, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स, पाने : ३४०, मूल्य : ८२५ रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT