maharashtra sakal
संपादकीय

विश्‍लेषण : मराठी अस्मितेचे राजकीय इतिकर्तव्य

मराठी माणूस आज विनोदाचा विषय झाला आहे. मुंबईसारख्या जागतिक शहरात तो नामशेष व्हायला लागला आहे. परप्रांतीयांनी त्याच्या जागा काबीज केल्या आहेत.

राहुल गडपाले

मराठी माणूस आज विनोदाचा विषय झाला आहे. मुंबईसारख्या जागतिक शहरात तो नामशेष व्हायला लागला आहे. परप्रांतीयांनी त्याच्या जागा काबीज केल्या आहेत.

जगासमोर ‘वसुधैव कुटुंबकम्’चा डंका पिटणाऱ्या भारतीय समाजमनास अजूनही प्रांतिक राजकारणातच अधिक रस आहे. बाहेरच्या जगासमोर आम्ही कितीही विविधतेतली एकता जपणारे वगैरे भासवत असलो तरी प्रत्यक्षात भारतीयत्वाचे मुखवटे केवळ दिखाव्याचे आत्मस्तोम माजविण्यासाठी असतात, हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच. मुळात ते आमचे राजकीय इतिकर्तव्य आहे आणि वास्तवाशी त्याचा छदामही संबंध नाही, अशी खुणगाठच जणू आपण बांधलीये. त्यामुळेच जगासमोर विविधतेतील एकतेच्या नाट्याचा प्रयोग झाला की प्रत्येकजण आपापल्या प्रांतिक अस्मितांना गोंजारायला लागतो. कोसाकोसावर भाषा बदलणाऱ्या देशात असे झाले नसते तर नवलच. तसा स्वाभिमान अंगी बाळगायला लागतोच लागतो. त्यात हरकतही नसते. पण अस्मितांच्या झुल्यावर स्वाभिमानाचे झोके घेताना तो दोरखंड मजबूत असायला लागतो.

महाराष्ट्राच्या अस्मितेची सुरुवात आणि शेवट दोन्हीही एकाच नावाने होते. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवसेना वगैरे स्वतःला हिंदुत्त्ववादी संघटना म्हणवून घेणारे पक्ष तर या आणि केवळ याच एका नावावर तरले आहेत. किंबहुना आज सत्तेच्या गाद्यांची ऊब त्यांना भोगायला मिळते आहे ती निव्वळ याच जोरावर. पण देशाला वडीलकीचे नाते सांगणाऱ्या महाराष्ट्रात अवघ्या देशाचा अभिमानबिंदू असलेल्या शिवरायांवर कुणीतरी तोंडसुख घेतं आणि स्वत:ला मावळे म्हणवून घेणारे त्यावर ‘ब्र’देखील उच्चारत नसतील तर हे न समजण्या इतपत महाराष्ट्रातील जनता खुळी नाही.

मराठी माणूस आज विनोदाचा विषय झाला आहे. मुंबईसारख्या जागतिक शहरात तो नामशेष व्हायला लागला आहे. परप्रांतीयांनी त्याच्या जागा काबीज केल्या आहेत. त्याला मुंबईत राहणे आता परवडणारे नाही. याला तो जितका जबाबदार आहे तितकेच त्याची पुढारकी करणारे देखील जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनाही यासाठी तेवढाच दोष द्यावा लागेल. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून शिवाजी महाराज यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना गेला महिनाभरात महाराजांबद्दल अपमानकारक, मानहानी करणारे वक्तव्य करणाऱ्यांना लगाम लावता आला नाही, यावरुनच ते आपल्या महापुरुषाशी किती एकनिष्ठ आहेत हे दिसून येते. याच लोकांनी महाराष्ट्रातील सीमाप्रश्न कायम जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला.

आज मात्र त्यांना तो जड वाटायला लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे आशेने डोळे लावून बसलेल्या कर्नाटक शेजारच्या मराठीजनांना त्यांचा आधार वाटण्याचे काहीच कारण नाही. मध्यंतरी यातील काही लोकांनी कर्नाटकात जाण्याची देखील मागणी केली, ती याच रोषापायी. पण तरीही त्यांच्याकडे प्रेमशून्य संबंधांपासून उत्पन्न झालेली प्रजा अशाच रोखाने पाहण्याची सवय या राजकारण्यांना झाली असावी. त्यामुळेच आपल्याच राज्यातील लोकांना भेटण्यासाठी त्यांना तारखांवर तारखा काढाव्या लागतात. कर्नाटकी नाकदुऱ्या काढण्यासाठी एकही निधड्या छातीचा मावळा पुढे येत नाही. कुणासमोरही न झुकणारा मराठी बाणा कर्नाटकी धमक्यांना घाबरतो की काय असा प्रश्न आता पडायला लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात भरडल्या जाणाऱ्या मराठी माणसांच्या पाठीशी हे उभे राहतील का, हा आता मुळ प्रश्न आहे.

एरवी महाराजांच्या नावाने कळ दाबल्यासारखे पेटून उठणारे शिवभक्त गेल्या काही दिवसांत कुणीही येऊन काहीही बरळतो तरी नशा केल्यासारखे निपचीत पडून आहेत. एकाही मराठी धमनीतले रक्त मराठीपणाची मर्दुमकी काढूनही पेटून उठत नाही. याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय. मराठी अस्मितेचा तळपणारा सूर्य निस्तेज करण्याचा प्रयत्न होतोय, हे अमान्य करून चालणार नाही. वाघनखे आणि भवानी तलवार परत आणण्याच्या बाता मारणाऱ्यांनी मराठीजनांच्या अस्मिता संवर्धनाची जबाबदारी उचलायला हवी होती; त्यात मात्र ते कुचकामी ठरले.

एरवी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होणारे आज महाराजांचा अपमान होत असताना ताठ मानेने कसे चालू शकतात हे खरे कोडे आहे. याच लोकांच्या भरवशावर आपले सीमाप्रश्नात अडकलेले बांधव विसंबून आहेत. मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी लागणारी मर्दुमकी असणारा नेता कंदील घेऊन शोधला तरी सापडायचा नाही.

बाळासाहेब ठाकरेंनंतर सीमावासियांना वाली राहिलेला नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण बाळासाहेबांनंतर त्यांच्या बाजूने बोलणारा देखील कुणी दिसत नाही. गेल्या काही दिवसांत हा संघर्ष अधिकच जटील झाला आहे. किंबहुना तो आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशावेळी मराठी अस्मितेवर काम करणाऱ्या नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे. आता तरी कुणाकडेही अपेक्षेने पाहण्याची सोय नाही.

सीमाप्रश्न हा कितीही नाही म्हटले तरी अस्मितेशी निगडीत प्रश्न आहे. ज्या माणसांना महाराजांच्या दोषींना फटकारता येत नाही ते कर्नाटक सीमा प्रश्नाच्या अवघड जखमेवर मलमपट्टी कितपत करु शकतील, याबद्दल आता केवळ शंकाच व्यक्त केली जाऊ शकते. एखादा रोग अगदीच असाध्य झाला असेल आणि साध्या मलमपट्टीने त्याचा इलाज होऊ शकत नसेल तर कधीतरी शस्त्रक्रियेचा निर्णय हा घ्यावाच लागतो. हीच ती वेळ. पण त्याची जबाबदारी घेणारा मात्र दृष्टीक्षेपात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT