africa cheetah sakal
संपादकीय

कहाणी चित्ता प्रकल्पाची

आफ्रिकेतून चित्ते आणून त्यांना भारतातील वातावरणात जगवण्याचा आपला प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

- राजेश गोपाळ, मोहनिश कपूर

आफ्रिकेतून चित्ते आणून त्यांना भारतातील वातावरणात जगवण्याचा आपला प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. वन्यजीव संगोपनातील आपला अनुभव, तांत्रिक क्षमता हेदेखील यानिमित्ताने सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा नवा आदर्श घालून दिला आहे, तो आहे वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील. नामशेष झालेला चित्ता भारतात परत आला आहे. पंतप्रधानांनी १७ सप्टेंबर २०२२ रोजी, आपल्या जन्मदिनी  वन्य चित्त्यांचा पहिला कळप अभयारण्यात सोडला. जवळपास सत्तर वर्षांपूर्वी, भारतीयांनी आपला चित्ता (Acinonyx jubatus venaticus) गमावला.

चित्त्याबाबत भारतात निश्चितच सांस्कृतिक तसेच परिसंस्थात्मक वारसा आहे. गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात (मध्य प्रदेश) आढळणाऱ्या  गुंफा चित्रांप्रमाणेच इतर ठिकाणची गुंफा चित्रे, कधी काळी असलेले चित्त्यांचे मोठे अस्तित्व  दर्शवतात. चित्ता हा मांर्जारकुळातील, कुत्र्याचे गुणधर्म बाळगणारा वन्यप्राणी आहे. तो शिकार करण्यासाठी सावजाचा पाठलाग वेगाने करतो. ‘शिकारी चित्ता’ अशीही ओळख होती. माणसाळावून तो पाळलाही जात असे.

नंतर, राजघराणी आणि शिकाऱ्यांनी चित्त्यांना शिकारीचे प्रशिक्षणही दिले. चित्त्यांच्याच शिकारीचे प्रमाण वाढल्यामुळे देशातून चित्ता नामशेष होत गेला. १९४७ मध्ये कोरियामध्ये (छत्तीसगड) चित्ता आढळल्याची शेवटची  नोंद दिसते, त्याची शिकारही राजघराण्यानेच केली.

 चित्ता पुनर्वसनावर अनेकदा चर्चा झडल्या, काथ्याकूट झाला. पण कृती घडली ती आताच! जागतिक पातळीवर त्याचे यश अतुलनीय आहे. ‘धोक्यातल्या प्राण्याचे जगातील  पहिले खंडपार स्थानांतर’ (ट्रान्सकॉन्टिनेंटल ट्रान्स लोकेशन) म्हणून या घटनेचा उल्लेख होतो. हा चित्ता प्रकल्प उभारताना बराच अभ्यास आणि संशोधन केले गेले. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेने प्रमुख भूमिका बजावली.

चित्त्यांसाठी देशात योग्य अधिवास कुठे आहे, याचे मूल्यांकन केले आणि कुनो राष्ट्रीय उद्यानाचा कृती आराखडा तयार केला. अधिवासातील चित्त्यांसाठी सावजाची घनता (प्रमाण), चित्तासंवर्धनाची  क्षमता, विविध व्यवस्थापकीय संकल्पना व इतर संबंधित बाबींसह अधिवासाच्या व्यवहार्यतेसाठी योग्य त्या सूचनांसह कार्यपद्धती निश्चित करण्यात आली.

नामिबियातून आठ आणि दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते भारतात आणताना त्यांना अधिवासात अलगद सोडण्याची योजना आखली होती. ‘BOMA’ प्रकारच्या  नैसर्गिक मोठ्या खुल्या, पण कुंपण घातलेल्या अधिवासामध्ये त्यांना टप्प्याटप्प्याने सोडले.  चित्त्यांना रेडिओ कॉलर बसवले होते. ‘जीपीएस’वर आधारीत रेडिओ-टेलिमेट्री या पाळत ठेवण्याच्या प्रणालीद्वारे त्यांचे नियमित निरीक्षण होत होते.

मुक्तपणे वावरणाऱ्या प्रत्येक  चित्त्याचे एका नऊ व्यक्तींच्या समर्पित पथकाने वाहनाद्वारे निरीक्षण केले. हे चित्ते सावज टिपण्याचे काम नियमितपणे  करत होते. त्यांनी शिकार केलेल्या सावजांमध्ये ठिपक्यांचे हरीण, चौसिंगा, काळवीट, चिंकारा, नीलगाय, ससे आणि मोर यांचा समावेश होता.

मुक्त संचारी तीन  चित्ते पाच-सहा दिवसांच्या अंतराने शिकार करत होते. पाळीव प्राण्यांची शिकार करण्याची केवळ एकच घटना नोंदवली गेली. मात्र चित्त्यांचे एकंदर वर्तन-आचरणपद्धती समजून घेण्यासाठी वर्षाचा कालावधी खूप कमी आहे.

दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांच्या जीवन इतिहासाच्या वैशिष्ट्यांचे अभ्यासकांनी चांगल्या प्रकारे दस्तावेजीकरण केले आहे. चित्ता वयाच्या दोन वर्षांपर्यंत  लैंगिकदृष्ट्या प्रगल्भ होतो. मार्जारकुळाच्या वैशिष्ट्यानुसार, गर्भधारणा सुमारे नव्वद दिवसांची असते. गर्भपिशवीची क्षमता एकावेळी दोन ते चार गर्भांना सामावून घेणारी असते. चित्त्याची पिल्ले जन्मत: आंधळी असतात, जन्मानंतर काही महिने त्यांच्या आईवर अवलंबून राहतात.

ही प्रजाती निसर्गत: एकटीच असते, परंतु प्रणयकाळात अल्पकाळ सहवासासाठी नर-मादी एकत्र येतात.  प्रसूतीनंतरची काळजी ही आई (मादी चित्ता) एकटीच वाहते. चितळ, चिंकारा, काळवीट आणि नीलगाय असे लहान ते मध्यम आकाराचे साधारणपणे सस्तन प्राणी, हा त्यांचा आहार असतो.

चित्ता सर्वोच्च शिकारी नाही. सिंह, बिबट्या आणि तरस यांसारख्या इतर प्रजातींद्वारे त्याची शिकारही केली जाते. जंगलात त्याचे आयुर्मान दहा-बारा वर्षांपर्यंत असते. निसर्गात चित्त्यांना अधिवास नष्ट होणे, मानवाकडून शिकार होणे आणि मानवाशी संघर्ष यासारखे अनेक धोके भेडसावतात. 

मनोरंजक निरीक्षणे

मुक्त संचार करणाऱ्या चित्त्यांनी शिकारीसाठी प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात मारलेल्या रपेटींची निरीक्षणे मनोरंजक आहेत. दोन नर चित्ते एकत्र, १०१ दिवसांच्या कालावधीत, स्वतःच्या परिघातील  २९ ते १७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळासह १८४ ते २६६ किलोमीटरपर्यंत गेल्याचे आढळते.

एकटा नर चित्ता स्वतःच्या परिघातील ६१ ते दोन हजार८७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळासह दैनंदिन सरासरी ४.१ ते ६.८ किलोमीटर अंतर कापत  २९ ते ४८७ किलोमीटर दरम्यान फिरल्याचे आढळते. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील चित्त्यांच्या हालचालींच्या प्रकारांचे चांगले दस्तावेजीकरण केले आहे.

हालचालींच्या पद्धतींमध्ये लक्षणीय फरक दिसतो. एका ठिकाणी राहणाऱ्या नर चित्यांच्या स्वतःच्या क्षेत्राचा परीघ १२ ते ३५० चौरस किलोमीटर, तर भटके चित्ते १२५ ते चौदाशे चौरस किलोमीटरच्या परिघात फिरू शकतात. मादी चित्त्यांच्या रपेटीच्या परीघातही  फरक  दिसतो.

चित्ता रूक्ष प्राणी आहे. प्रथम दबकत जाऊन नंतर वेगवान पाठलाग करुन सावजावर झडप घालणे ही त्याची शिकारीची पद्धत. कुनोचे अभयारण्य हे खुरटी झुडपे आणि मोठे वृक्ष यांनी व्यापलेले आहे. ते बिबट्याशी  संघर्ष टाळत चित्त्यांना दबा धरून मग आपल्या भक्ष्याचा पाठलाग करणे या दोन्हीसाठी अनुकूल अधिवास ठरतो. कुनो उत्तर गोलार्धात आहे.

दक्षिण गोलार्धातल्या नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांचा स्वतःचा असा  हवामानाचा प्रकार आहे. प्राण्यांची दैनंदिनी त्याला जुळवून घेते. स्थानांतर झाल्यापासून त्यांच्या मृत्यूच्या (सात प्रौढ आणि तीन पिल्ले) घटना अनेक कारणांमुळे नोंदवल्या गेला. काही (तीन) सेप्टीसीमिक (जीवाणूंमुळे रक्तात होणारी विषबाधा) परिस्थितीमुळे मरण पावले.

प्राण्यांच्या पाठीकडील भागात  पाणी साठल्याने अशी परिस्थिती उद्भवते. (कुनोच्या मान्सूनची वेळ, दक्षिण आफ्रिका/नामिबियाच्या हिवाळ्यात लव येण्याच्या वेळेपेक्षा भिन्न असल्याने). सध्या तेरा प्रौढ चित्ते जिवंत आहेत. गेल्या वर्षीच्या एका पिल्लाव्यतिरिक्त, एकाच प्रसूतीमधील दोन पिल्लांची देखील अलीकडेच नोंद झाली असून, एकूण संख्या बावीस  आहे.

चित्ता, एक सभक्षक म्हणून खुल्या गवताळ प्रदेश आणि त्यात राहणाऱ्या वन्य प्राण्यांचे प्रतिक आहे. चित्त्यांच्या दीर्घकालीन पुनर्वसनाची मोहीम गवताळ प्रदेशातील परिसंस्थेचे अस्तित्व कसे चांगल्या प्रकारे राखता येईल, हे देखील  दर्शवते. चित्ता भारतात परत आणल्यामुळे अशा परिसंस्थांच्या पुनरुज्जीवनाच्या आशादेखील पल्लवीत होतात.

मध्य प्रदेशातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्य हे चित्त्यांचे दुसरे घर म्हणून ओळखले जाते. हा उत्कृष्ट अधिवास आहे. तो पूर्व आफ्रिकेच्या कुठल्याही सवाना भूप्रदेशाशी स्पर्धा करू शकेल, असा आहे. चित्त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि समयोचित आहे. पाच दशकांहून अधिक व्याघ्र प्रकल्पाच्या अनुभवासह प्रजातींच्या स्थानांतराचे व्यवस्थापन, जैवविविधतेचे बहुआयामी निर्देशक आणि चांगली मानवी वर्तणूक या दृष्टिकोनातून भारत सुयोग्य आणि सुसज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT