Ramoji Rao sakal
संपादकीय

सर्वोत्तमाचा ध्यास घेणारे रामोजी राव

रामोजी राव हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते. सातत्याने नावीन्याचा शोध घेत जे हातात काम हातात घेऊ ते सर्वोत्तमच असले पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता.

सकाळ वृत्तसेवा

- राजीव जालनापूरकर

रामोजी राव हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते. सातत्याने नावीन्याचा शोध घेत जे हातात काम हातात घेऊ ते सर्वोत्तमच असले पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना वाहिलेली आदरांजली.

रामोजी राव यांचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात विजयवाडा (आंध्रप्रदेश)मध्ये झाला. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर त्यांच्या कामाची पद्धत, शिकण्याची सवय पाहून त्यांच्या आई-वडिलांनी या मुलाला दिल्लीला पाठवले. तेथे ते प्रारंभी एका जाहिरात संस्थेत संहितालेखनाची कामे करत. पुढे ‘ॲल्युमिनिअन इंडिया’ या कंपनीत ते मुलाखतीसाठी गेले.

‘इंग्रजी चांगले नाही, व्यवस्थित बोलता येत नाही,’ असे सांगत कंपनीने नोकरी नाकारली. त्यानंतर त्यांनी निश्चय केला की, ‘मी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी कंपनी स्थापन करेन.’ ते थेट हैदराबादला आले. प्रथम त्यांनी होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला. त्याच काळात त्यांनी ‘मार्गादर्शी चिटफंड’ म्हणून एक कंपनी सुरू केली.

यामध्ये स्वच्छ, पारदर्शी कारभार ठेवत सर्वसामान्यांना उपयोगी होईल, अशी कंपनी नावारूपाला आणली. चिटफंडला साठ वर्षे झाली असून वार्षिक उलाढाल १० हजार कोटींच्यापेक्षा अधिक आहे. आंध्र, तेलंगण, कर्नाटक व तमिळनाडूमध्ये मिळून त्यांच्या शंभरपेक्षा जास्त शाखा आहेत.

शेतकऱ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून त्यांनी मुद्रित माध्यमात ‘अन्नदाता’ हे नियतकालिक सुरू केले. ‘अन्नदाता’ पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू असून शेतकऱ्यांची भगवद्‌गीता म्हणून त्याला ओळखले जाते. त्यांनी १९७४मध्ये ‘इनाडू’ दैनिकाची सुरुवात केली. ‘इनाडू’च्या ३४ आवृत्त्या प्रसिद्ध होत आहेत. व्यवसायाची सखोल जाण, जनसामान्यांच्या भावनांशी एकरूप आणि जगातील नव्या प्रवाहांचे अंदाज हे त्यांचे बलस्थान होते.

प्रादेशिक भाषेची ताकद ओळखून त्यांनी तेलुगु, कन्नड, मराठी, बंगाली, उडिया या भाषांमध्ये ‘ई-टीव्ही’ नावाने वाहिनी सुरू केली. मातृभाषेवरील त्यांचे प्रेम अमाप होते. जगभरातील अनिवासी तेलुगु भारतीयांनी त्यांच्या मुलाला तेलुगु कसे शिकवावे यासाठी त्यांनी ‘तेलगू-वेलगू’ नावाने मासिक सुरू केले. प्रत्येक भाषेत असे मासिक सुरू करण्याची त्यांची कल्पना होती. ‘उषाकिरण मूव्हीज’ नावाने चित्रपट पदार्पण केले.

त्यांच्या जोडीला ‘मयूर डिस्ट्रिब्युशन कंपनी सुरू केली. ‘तुम्ही चित्रपट तयार करा तो अत्यंत सुलभतेने चित्रपट रसिकांपर्यंत पोचवतो’ असा विश्वास त्यांनी चित्रपटनिर्मात्यांना दिला. निर्मात्यांना येत असलेल्या अडचणी, त्यांच्या गरजा समजून घेतल्या. ‘नाचे मयूरी’, ‘प्रतिघात’, ‘तुझे मेरी कसम’ अशा सुमारे शंभर चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली.

‘कथा घेऊन या आणि पूर्ण चित्रपट घेऊन जा’ अशा संकल्पनेवर आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध आणि जगातील सर्वात भव्य अशी चित्रपटनगरी तयारी करण्याचे स्वप्न पाहिले. ‘रामोजी फिल्म सिटी’ च्या रूपाने ते स्वप्न प्रत्यक्षात आणले. या ठिकाणी २६ वर्षांत पाच हजारांहून मोठे चित्रपट तयार झाले. सात हॉलिवूड त्यामध्ये ‘क्रॉकाडाईल-२’, ‘नाइट फॉल्स’ अशा पद्धतीचे चित्रपट तयार झाले.

आंध्रातील चित्रपटसृष्टीचा विकास रामोजी राव यांच्यामुळेच झाला. चित्रपट, दूरचित्रवाहिन्या, वर्तमानपत्र, मार्गादर्शी चिटफंड आणि त्यापुढचे त्यांचे पाऊल होते ‘प्रिया पिकल्प.’ दक्षिण भारतात लोणचे हा जेवणातील आवश्यक घटक आहे. रामोजी राव यांनी महिलांना सांगितले, मी सर्व कच्चा माल देतो, तुम्ही लोणचे तयार करून माझ्या गुणवत्ता तपासणी विभागाला द्या. या माध्यमातून हजारो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.

‘प्रिया पिकल्स’ची वार्षिक उलाढाल सातशे कोटींच्यावर गेली आहे. रामोजी राव यांना कोठेही लोक भेटले की म्हणत, ‘तुमच्यामुळे माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाले’, ‘तुमच्यामुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक घडी व्यवस्थित बसली’, ‘माझ्या मुलीचे लग्न होऊ शकले’. हे सगळे केवळ चिटफंडामुळेच आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळेच होऊ शकले.

राजकारणाला दिशा

आंध्रप्रदेशमध्ये स्वच्छ चारित्र्याचा लोकप्रतिनिधी असावा, अशी त्यांची भावना होती. चित्रपटअभिनेते एनटी रामाराव यांची प्रतिमा चांगली होती. रामोजी राव यांनी चांगला लोकप्रतिनिधी तयार होण्यासाठी त्यांच्यामागे शक्ती उभी केली. ‘टीडीपी’ची घटना लिहिणे, राजकीय पक्ष कसा चालवावा, उमेदवार कसा निवडावा यापासून ते एन.टी. रामाराव मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांना पूर्ण मदत केली.

ते मुख्यमंत्री झाल्याबरोबर रामोजी राव यांनी सांगितले की, मी आता पत्रकारितेच्या भूमिकेत जाणार आहे आणि तुमचा टीकाकार म्हणून मला काम करावे लागेल. चंद्राबाबू नायडूंच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीपर्यंत ते त्यांना मार्गदर्शन करीत होते. मी १९९० च्या दरम्यान रामोजी राव यांना भेटायला गेलो. त्यावेळी फिल्मसिटीची निर्मिती सुरू केली होती.

चित्रपट कलावंतांना शारीरिक स्वास्थ्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्यांनी मला बोलावले. जे काही करायचे ते जगातील सर्वोत्तम असायला हवे, असा त्यांचा ध्यास होता. केवळ ‘फिटनेस सेंटर’ विकसित करण्यासाठी मी गेलो होतो. माझे काम पाहून ते म्हणाले, ‘‘राजीव आज मला मोठा मुलगा मिळाला. तुम्ही इथून परत जाणार नाही.’’ त्या वेळेपासून २८ वर्षे रामोजी फिल्म सिटीशी माझे नाते जोडले गेले आहे.

या काळात अनेक वेळा डिस्ने लॅंड, युनिव्हर्सल स्टुडिओ, वॉर्नर ब्रदर्स तसेच अन्य ठिकाणी मला पाठवून शिकण्याची मुभा दिली. ‘अम्युझमेंट पार्क’ मध्ये त्यांनी मला तयार केले. या शब्दांची फारशी माहितीही नव्हती, त्या क्षेत्रात माझ्याकडून काम करून घेतले. मी आता जागतिक स्तरावर काम करतो, याचे पूर्ण श्रेय मी रामोजी राव यांना देतो.

कामाची पद्धत

  • प्रत्येक विषयाचा पूर्ण अभ्यास.

  • प्रत्येक प्रेझेंटेशन पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण वाचत. वाचण्याची क्षमता, ऐकण्याची कमालीची क्षमता.

  • पहाटे उठल्यानंतर रोज नवीन संकल्पना त्यांच्या डायरीत लिहीत. नवीन व्यवसाय आणि सध्या असलेल्या व्यवसायात कायम नावीन्याचा ध्यास.

  • सहा ते सात प्रमुख अधिकाऱ्यांबाबत ते वेगवेगळ्या रंगाच्या पेनाने डायरी लिहीत. मी विचारायचो...ते म्हणत, ‘‘एका रंगाच्या शाईने लिहायचा कंटाळा येतो, जी व्यक्ती मनात येते त्या रंगाने लिहितो.’’

  • सकाळी साधारण दहा वाजता डायरीमधील नोट्स संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहचत. इतकेच नव्हे तर २४ तासांत त्यांनी लिहिलेल्या संकल्पनेवर तुमची मते त्यांना सांगायची हा शिरस्ता.

  • स्वतः संशोधन करत. वयाच्या ८० व्या वर्षी कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया याचा अभ्यास करत.

(लेखक रामोजी राव फिल्मसिटीचे माजी सीईओ व माजी संचालक आहेत.)

शब्दांकन - आशिष तागडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT