Sri Lanka Election Result sakal
संपादकीय

भाष्य : श्रीलंका डाव्या वळणावर...

डॉ. राजेश खरात

श्रीलंकेतील निवडणुकांचा निकाल भारतासाठी अनपेक्षित होता. माजी राष्ट्राध्यक्ष रनिल विक्रमसिंघे निवडून येतील, असा इतरांबरोबर भारताचाही कयास होता. पण तसे झाले नाही. मात्र भारत आणि श्रीलंका यांच्या संबंधांत बाधा येईल, असे वाटत नाही.

श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत साम्यवादी विचारांच्या `जनता विमुक्ती पेरामुना’ पक्षाचे अनुरा दिसानायके यांचा विजय सर्वांनाच अचंबित करणारा आहे. ‘जनता विमुक्ती पेरामुना’ श्रीलंकेतील ‘मार्क्सवादी-लेनिनवादी’ पक्ष म्हणून ओळखला जातो.

या पक्षाची भूमिका आतापर्यंत भारताच्या हितसंबंधांच्या विरोधात होती, याचे कारण श्रीलंकेतील तामिळींना असलेला त्यांचा विरोध. परिणामी, तामिळींबाबत सहानुभूती असणाऱ्या राजकीय पक्षांनादेखील त्यांनी कडाडून विरोध केला. उदा. १९७१ आणि १९८७ च्या भारत-श्रीलंका करारानंतर १९८७-८९ या काळात या पक्षाने श्रीलंकेत सशस्त्र उठाव करण्याचा प्रयत्नही केला होता.

डाव्या विचारांचा प्रभाव असल्याने श्रीलंका आर्थिक संकटात असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडून आर्थिक मदत घेण्याच्या निर्णयालादेखील विरोध केला. याचबरोबर सिंघला (सिंहला) असल्याची वांशिक श्रेष्ठता, याच वृत्तीतून निर्माण झालेला प्रखर सिंघला राष्ट्रवाद यामुळे गेल्या पाच दशकांपासून श्रीलंकेच्या सक्रिय राजकारणात ‘जनता विमुक्ती पेरामुना’ या पक्षाला नेहमीच गौण ठरविले गेले होते.

तरीही ताज्या निवडणुकीत साम्यवादी विचारांच्या युती पक्षाला त्यांचा उमेदवार राष्ट्राध्यक्ष म्हणून जिंकवून आणता आला. याचाच अर्थ या निवडणुकीत सकारात्मकतेऐवजी नकारात्मक भूमिका महत्त्वाची ठरून प्रस्थापित पक्षांना जनतेने नाकारले, असा होतो. विभागलेला जनादेश ‘जनता विमुक्ती पेरामुना’ या साम्यवादी पक्षाच्या पथ्यावर कसे पडला, याच्या कारणांच्या मुळाशी जायला हवे.

आतापर्यंत, श्रीलंकेत ‘युनायटेड नॅशनल पार्टी’ आणि ‘श्रीलंका फ्रीडम पार्टी’ या प्रस्थापित पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना तेथील मतदारांनी नेहमीच भरभरून मतदान करून राज्य करण्याची संधी दिली; पण या वेळेस ते त्यांना टिकविता आले नाही. याचे कारण या पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना गृहीत धरून हे पक्ष स्वत:ची खासगी मालमत्ता म्हणून वापरले.

पक्षप्रमुखांचा पक्षांतर्गत कुटुंबवाद आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार, मनमानी पद्धतीचा राज्यकारभार यांचा त्यांना फटका बसलेला दिसतो. राष्ट्रहिताला तिलांजली देऊन वैयक्तिक हितसंबंधांना प्राधान्य दिले गेले. अनेक अतार्किक राजकीय व आर्थिक धोरणे, परराष्ट्रीय धोरणे, आणि विशेषत: शेतीबाबतची चुकीचे आणि सक्तीचे धोरण यामुळे ‘सोन्याची लंका’ म्हणविणारा देश आर्थिक गर्तेत सापडला. मदतीसाठी लाचार झाला.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना आणि हंबनटोटा, हिंद महासागरात सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले श्रीलंकेतील बंदर, चीनसारख्या साम्राज्यवादी देशाकडे गहाण ठेवावे लागले. एवढी नामुष्की या प्रस्थापित पक्षांच्या पुढाऱ्यांनी श्रीलंकेवर आणली, याचा सल तेथील तरुणाईमध्ये खदखदत होता.

विविध पक्षांनी फायद्याचे राजकारण करण्यासाठी तामिळी मतदारांचा केलेला वापर, तीन दशकांहून जास्त धुमसणारा वांशिक संघर्ष आणि नरसंहार, वित्तहानी यांनी त्रस्त झालेल्या सर्वसामान्य श्रीलंकन नागरिकाला हे सगळे कुठेतरी थांबायला हवे, असे वाटत होते. तामिळी; मग ते हिंदू असोत कि मुस्लिम, त्यांना सरसकट विरोध आणि सिंघला राष्ट्रवादाची भावना सतत जागृत ठेवण्याची भूमिका ही धोरणे ‘जनता विमुक्ती पेरामुना’कडे तरुणांना आकृष्ट करण्यास कारणीभूत ठरली.

हे घडत असताना वैचारिक पातळीवर श्रीलंकेतील श्रीलंकेतील विविध विद्यापीठांतून विद्यार्थी संघटना साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कार करताना दिसत होते. फिडेल कॅस्ट्रो,चे गवेरा, लेनिन, स्टालिन, माओ, हो-चि-मिन्ह यांची तैलचित्रे आणि विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या घोषणा रंगीबेरंगी चित्रांच्या माध्यमातून रेखाटलेल्या दिसत होत्या. या सर्व विद्यार्थ्यांनी साहजिकच साम्यवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाला मतदान केले असणार यात शंका नाही.

याचबरोबर श्रीलंकेच्या अवतीभवती आणि दक्षिण आशियात घडत असणारी राजकीय उलथापालथ याचादेखील परिणाम श्रीलंकेतील मतदारांवर झाला असणार. अगदी ताजे उदाहरण द्यायचे असेल तर विद्यार्थ्यांनी बांगलादेशात प्रस्थापित पक्षाची सत्ता उलटवून टाकली. तत्पूर्वी नेपाळमध्ये साम्यवादी मावळ गटाला सत्तेतून हद्दपार करून जहाल साम्यवादी सत्तेत आले. मालदीवमध्ये भारताशी मित्रत्वाची भूमिका घेणाऱ्या पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले.

द. आशियातील या देशांमध्ये ‘सत्तांतर’ होण्यासाठी जशी स्थानिक स्थिती कारणीभूत होती, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील अनेक घटक जबाबदार होते. यातील महत्त्वाचा एक घटक म्हणजे साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेने ग्रस्त झालेला चीन. निवडणुकीत चीनचा अप्रत्यक्ष का होईना पण हस्तक्षेप होता, असे म्हटले जाते. गेल्याच ऑगस्टमध्ये चीनने कोलंबो बंदरात आपल्या तीन लढाऊ नौका द्विपक्षीय नाविक सरावाच्या नावाखाली तैनात ठेवल्या होत्या.

भारतासाठी आव्हाने

निवडणुकांचा निकाल भारतासाठी अनपेक्षित होता. माजी राष्ट्राध्यक्ष रनिल विक्रमसिंघे निवडून येतील, असा इतरांबरोबर भारताचाही कयास होता. तसे झाले नाही. मात्र भारत आणि श्रीलंका यांच्या संबंधांत बाधा येईल, असे वाटत नाही. तामिळींबाबतचे या पक्षाचे धोरण भारतासाठी चिंतेचा विषय असला तरी अलीकडील काही वर्षांपासून ‘जनता विमुक्ती पेरामुना’ या पक्षाने आणि अनुरा दिसानायके यांनी तामिळींविषयक भूमिका मवाळ केलेली आहे.

संकटातील श्रीलंकेकडे जगाने पाठ फिरवली असताना भारताने त्यांना चार अब्ज डॉलरची आर्थिक मदत केली. याव्यतिरिक्त समुद्रमार्गे भारतीय जहाजांतून अन्नधान्याच्या स्वरूपात जी काही मदत केली गेली, ती तामिळनाडू राज्याच्या माध्यमातून झाली आहे. या मदतीसाठी श्रीलंका प्रशासन आणि सरकार आणि जनता नेहमी भारताविषयी आजही आदर बाळगून आहेत, हे तिथे गेल्यावर अनुभवयास येते.

ही जी सदिच्छा आहे, ती भारताने तशीच राहावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समुद्री-पर्यटन असो की आध्यात्मिक-धार्मिक पर्यटन असो, भारताने या श्रीलंकेतील पर्यटनक्षेत्रांमध्ये गुंतवणूक करून सांस्कृतिक आणि वांशिक नाळ भारताशी जोडली आहे. त्याला पुन:स्थापन करण्यात पुढाकार घेतला तर दोन्ही देशांसाठी प्राचीन आणि परंपरागत संबंध आणखीन घट्ट करण्यास मदत होईल.

तसेच नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष अनुरा हे शेतीतज्ज्ञ असल्याने आणि भारतातील शेती व्यवसाय हा जगासाठी एक प्रागतिक आणि शास्त्रीय असल्याने भारत -श्रीलंका यांची याबाबत बौद्धिक आणि संशोधनाची देवाणघेवाण होऊ शकेल. श्रीलंकेवर ओढवलेल्या आर्थिक संकटामागे शेतीविषयक धोरण हा एक भाग होताच. त्यामुळे भारताचे शेतीबाबतचे तंत्रज्ञान श्रीलंकेस मिळू शकेल. चहा, रबर, कॉफी अशा व्यावसायिक उत्पादनात भारत आणि श्रीलंका एकमेकांना मदत करू शकतील.

समुद्रातून उपलब्ध असलेल्या विविध संसाधन- सामुग्रीबाबत भारत भौगोलिकदृष्ट्या श्रीलंकेच्या अगदी जवळ असल्याने दोन्ही देशांना त्याचा फायदा होऊ शकेल. श्रीलंकेसाठी चीन ही सामरिक आणि आर्थिक अपरिहार्यता असल्याने ते काही कायमस्वरूपी नसणार आहे, हे भारताने समजून घेतल्यास भारत आणि श्रीलंका यांच्यात संबंधात एका नव्या पर्वाची सुरुवात होऊ शकेल.

(लेखक प्राध्यापक आणि ‘जेएनयू’मधील दक्षिण आशियाई केंद्राचे माजी प्रमुख आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच उपमुख्यमंत्री केलं; अजित पवारांचा उल्लेख करत केजरीवालांची मोदींवर टीका

Latest Maharashtra News Live Updates : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्सप्रेसचा शुभारंभ, 800 लाभार्थी अयोध्येला

अब मजा आयेगा ना भिडू! निक्की तांबोळीची बँड वाजवायला घरात आली राखी सावंत; नेटकरी म्हणाले- चला आता...

Coldplay Concert: 'बुक माय शो'च्या सीईओला अटक होणार? कोल्डप्ले कॉन्सर्टचे प्रकरण पडणार महागात

बन्ना शेख बनली रिया बर्डे...'त्या' बांगलादेशी पॉर्न स्टारबद्दल धक्कादायक खुलासा; राज कुंद्राशीही आहे कनेक्शन

SCROLL FOR NEXT