भाजपचे अध्यक्ष माननीय नड्डाजी म्हणाले की आता भाजपला संघाची गरज नाही. त्यामुळे संघ कार्यकर्ते भयंकर म्हणजे भयंकरच दुखावले. तुमचेही मन दुखले नाही का?
सुपर आम आदमी श्री अरविंदस्वामी केजरीवाल (Arvind Swamy Kejriwal) यांनी कारागृहातून बाहेर पडताक्षणी माननीय सरसंघचालकांना चंद सवाल केले. या सवालांची उत्तरे त्यांनी ताबडतोब द्यावीत, अशी त्यांची इच्छा आहे. परंतु, उत्तरांसाठी त्यांना दसऱ्यापर्यंत थांबावे लागेल. एवढी प्रतीक्षा सुपर आम आदमीला (Super Aam Aadmi) करायला लावणे प्रोटोकॉलला धरुन नाही. म्हणून सरसंघचालकांच्या वतीनेच आम्ही परस्पर त्यांच्या पाचही प्रश्नांची उत्तरे यथाशक्ती देत आहो. ही उत्तरे देण्याची चेष्टा करु का, असे आम्ही माननीय सरसंघचालकांना विचारणार होतो.
पण ‘‘ भारत में हर एक व्यक्ती को आचरण और विचारण एवं उच्चारण का स्वातंत्र्य है’’ असे त्यांनी आमचे बौद्धिक घेतले असते. हिंदीशत्रूंसाठी खुलासा : चेष्टा करणे म्हणजे शुद्ध तुपातील हिंदी भाषेत प्रयत्न करणे. हिंदीत चेष्टा ऊर्फ मस्करी करीत नाहीत.
प्रश्न पहिला : राजकीय पक्ष फोडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करण्याचे मोदी सरकारचे उद्योग आपणांस मान्य आहेत का?
उत्तर : यद्यपि, देश प्रथम, तदोपरांत दल यही हमारी धारणा होनी चाहिए. फिर दल कोई भी हो. (इथून पुढे नाइलाजाने मऱ्हाटी भाषेत) काही पक्ष आणि पक्षाचे पुढारी तपास यंत्रणांचा कांगावा करुन वेगळीच सेवा करतात, असे दिसून आले आहे. त्यांना तिहार तुरुंगात कोण पाठवणार? अतएव, मान्य है.
प्रश्न दुसरा : भाजपचा जन्म संघाच्या कुशीतून झाला हे तुम्हाला मान्य असेल तर सध्या त्या पक्षाचे जे काही चालू आहे ते रोखण्यासाठी आपण काही करणार का?
उत्तर : मुळात ते आम्हाला रोखायचे आहे, असे तुम्ही का समजता? आणि समजा, रोखायचे असले तरी हल्ली तरुण मुलगा आपल्या बापाचे कुठे ऐकतो? उदाहरणार्थ, पूज्य अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून आम आदमी पक्षाचा जन्म झाला, हे तुम्हाला मान्य असेल तर या प्रश्नाचे उत्तर अण्णांनाच विचारावे. ते जोडा काढतील! त्यात उत्तर मिळून जाईल.
प्रश्न तिसरा : संघाने ‘अशा’ भाजपची कल्पना केली होती का? भाजप चुकीच्या मार्गाने गेल्यास त्याला सुधारण्याची जबाबदारी संघाची नाही का?
उत्तर : ‘अशा’ आम आदमीची कल्पना तरी आम्ही कुठे केली होती? असे व्हायचेच. जगरहाटी आहे. मुळात आम्ही ‘अशा’ आणि ‘तशा’ भाजपची कल्पना अशी केली होती, ही तुमची कल्पना आहे. काल्पनिक गोष्टींवर काल्पनिक उत्तरच द्यावे लागेल.
प्रश्न चौथा : भाजपचे अध्यक्ष माननीय नड्डाजी म्हणाले की आता भाजपला संघाची गरज नाही. त्यामुळे संघ कार्यकर्ते भयंकर म्हणजे भयंकरच दुखावले. तुमचेही मन दुखले नाही का?
उत्तर : माननीय नड्डाजींच्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते दुखावले नाहीत. कारण ते सदैव कार्यरत असतात. दु:ख करायला टाइम कोणाकडे आहे? पण तुम्हाला भयंकर म्हणजे भयंकर दु:ख झाले हे ऐकून बरे वाटले. आम्हाला तर दु:ख तुम्हाला दु:ख झाले याचेच अधिक आहे.
प्रश्न पाचवा : पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्त करण्याचा भाजपमध्ये नियम करण्यात आला. तो मोदीजींना लागू नाही का?
उत्तर : हाहा! या प्रश्नाने भारतातील अनेक नेत्यांना प्रचंड छळले आहे. आपला बॉस कधी रिटायर होणार, याकडे लक्ष ठेवून काम (न) करणारे अनेक कर्मचारी असतात, त्यापैकीच हे! मोदीजींनी रिटायर व्हावे, हा तुमचा आग्रह समजण्याजोगा आहे. हाच प्रश्न अनेकांनी विचारला आहे. आज फायनल उत्तर देऊन टाकतो-
मोदीजींसाठी निवृत्तीचे वय नियमानुसार दीडशे वर्ष इतके आहे! खुश?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.