PM Narendra Modi Tour Cancelled esakal
संपादकीय

Sakal Editorial Articles : अग्रलेख - सांगे खड्ड्यांची 'कीर्ती'!

PM Narendra Modi Tour Cancelled : पुण्यातील खड्ड्यांची ‘कीर्ती’ अशी अ.भा.स्तरावर गेली. त्यातच पावसाने हाहाकार माजवल्याने रस्त्यांची स्थिती दयनीय बनली.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील खड्ड्यांची ‘कीर्ती’ अशी अ.भा.स्तरावर गेली. त्यातच पावसाने हाहाकार माजवल्याने रस्त्यांची स्थिती दयनीय बनली. वाहतूक कोंडीचा तर कहर झाला.

Sakal Editorial Articles : दुर्दशेवर काही कायमस्वरूपी उपायासाठी उत्तरदायित्वाचा जो सर्वात मोठा ‘खड्डा’ पडला आहे, तो आधी बुजवावा लागेल.

अनिर्बंध नागरीकरणाच्या प्रवाहात मातब्बर महानगरांचीही स्थिती कशी दयनीय बनते, याचा प्रत्यय गेल्या काही दिवसात आला. मग ती सांस्कृतिक राजधानी पुणे (Pune) असो, किंवा आर्थिक राजधानी मुंबई असो. राज्यात इतरत्रही काही फार वेगळी परिस्थिती नाही. पुण्यातील संस्था वा त्यांचे उपक्रम यांचे स्वरूप अगदी सहजपणे ‘अखिल भारतीय’ असते, ही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. पुण्यातील समस्यांनाही अभावितपणे का होईना, सध्या मिळत असलेले ‘अ.भा.’स्वरूप मात्र नवीन म्हणावे लागेल.

पावसाचे नुसते थेंब पडू लागले की शहरातील रस्त्यांची चाळण उडते आणि आपला जीव बचावत रस्त्यांमधून कसाबसा प्रवास करणारे नागरिक कधी उपरोधाने, उपहासाने, तर कधी संतप्त होऊन प्रशासनाचे वाभाडे वगैरे काढतात आणि काही होत नाही, हे पाहून आपल्या नित्य व्यवहाराला लागतात. या वार्षिक नित्य कहाणीत यंदा थोडासा ‘ट्विस्ट’ आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) पहिल्यांदाच पुण्यनगरीत आल्या. त्यांचा दौरा उत्तम रीतीने पार पडला. परंतु या शहराविषयी त्यांच्या मनात असलेल्या काही रम्य कल्पनांना बहुधा एका बाबतीत तडा गेला, तो इथल्या बेसुमार खड्ड्यांमुळे. त्यांनी पत्र लिहून नापसंती व्यक्त केली.

पुण्यातील खड्ड्यांची ‘कीर्ती’ अशी अ.भा.स्तरावर गेली. त्यातच पावसाने हाहाकार माजवल्याने रस्त्यांची स्थिती दयनीय बनली. वाहतूक कोंडीचा तर कहर झाला. ठिकठिकाणी रस्त्याला पडलेली भगदाडे, साचलेली तळी, पडलेले खड्डे आणि त्यामुळे काहींचे होणारे अपघात यामुळे एकाचवेळी या शहरात जलवाहतूक, रस्तेवाहतूक आणि हवाईवाहतूक यांचा एकत्रित अनुभव घेता येऊ लागला! अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पुणे दौरा होणार होता. हवामान खात्याने दिलेला अतिपावसाचा इशारा आणि हे जमिनीवरील ( रस्त्यांचे) वास्तव या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठीचे वाहतूक नियोजन हे अग्निदिव्यच ठरले असते. पण मोदींचा दौरा रद्द झाल्याने ते तात्पुरते टळले.

या दुर्दशेवर काही कायमस्वरूपी तोडगा निघणारच नाही, असे नाही. पण त्यासाठी उत्तरदायित्वाचा जो सर्वात मोठा ‘खड्डा’ पडला आहे, तो आधी बुजवावा लागेल. ‘अपघात, त्रास तुमच्यामुळे आणि विकास आमच्यामुळे’ असल्या ‘तू तू मैं मैं’ मध्ये न अडकता सर्व संबंधित यंत्रणा, राजकीय पक्ष, प्रशासन, मेट्रो प्राधिकरण आदींना समन्वयाने काम करावे लागेल. खाली खड्ड्यांचा रस्ता आणि त्याच रस्त्याच्या खांबाखांबांवर झळकत असलेल्या ‘आमचे प्रेरणास्थान’, ‘आमचे स्फूर्तिस्थान’ आणि त्यांच्या ‘शुभेच्छुकां’ना भान यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नसल्याने जाब कोणाला विचारायचा हा प्रश्‍नच आहे. या निवडणुका लवकर व्हाव्यात आणि त्यात जागरूक नागरिकांनी हे प्रश्न लावून धरावेत, तरच याबाबत गांभीर्याने काही हालचाल होईल.

महानगरी मुंबईत आधीच चुकीच्या पद्धतीने बांधलेले उड्डाणपूल, रस्तेदुरुस्त्यांच्या अहर्निश कामांमुळे वाहतुकीची लागलेली वाट यामुळे आधीच हैराणी पाचवीला पुजलेली असते. त्यात परतीच्या पावसाने गाठले. जिथे पोचायला एरवी वाहतूक, सिग्नल वगैरे ध्यानात घेऊनही अर्धाएक तास लागावा, तिथे वाहने पाच-सहा तासांनी पोहोचू शकली. कित्येक मुंबईकर तर मध्यरात्रीनंतरच घरी पोहोचू शकले. पावसाळी अधिवेशनाच्या काळात या मुजोर पावसामुळे वाहतुकीची इतकी दाणादाण उडाली होती की अनेक आमदारांना निमूटपणे रेल्वेमार्गाने कशीबशी दक्षिण मुंबई गाठता आली होती. कोस्टलरोड, अटलसेतु वगैरे पंचतारांकित रस्त्यांच्या साग्रसंगीत शुभारंभांनंतर सामान्य मुंबईकराचे मन आपली नेहमीची ‘ये-जा’ असलेल्या रस्त्यांची दुरवस्था आठवून काहीसे खट्टूच झाले असणार.

कारण त्याच्या दैनंदिन जीवनात हे रस्ते फार क्वचित येतात. वाहनांची मोठी संख्या, पार्किंगची उग्र समस्या, आणि त्यात खड्डे यामुळे एरवी जिकिरीला आलेल्या मुंबईकराने या वलयांकित रस्त्यांचे कवतिक किती करायचे? महाराष्ट्रातले बहुतेक रस्ते इतक्या दयनीय अवस्थेला आले आहेत की हा प्रश्न युद्धपातळीवर सोडवण्याची गरज आहे. दोनेक वर्षांपूर्वी सत्तेवर येताच मुख्यमंत्र्यांनी मुंबईतले रस्ते सिमेंट- काँक्रिटचे करुन खड्ड्यांचा प्रश्न कायमचा सोडवण्याचे आश्वासन दिले होते. काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण झालेही; पण वाहतुकीची समस्या सुटली नाहीच. परदेशी गुंतवणुकीबाबत मोठाले दावे करणाऱ्या सरकारचे उत्तरदायित्त्व पायाभूत सुविधा पुरवण्याचेही असते.

या सुविधांमध्ये चांगले रस्ते अभिप्रेत आहेत. ते आहेत तरी नेमके कुठे? स्थानिक रहिवासी नेहमीचे जगणे जगताना जिकिरीला येतो, तेथे परकी गुंतवणूकदार कशासाठी येतील, हा प्रश्न सरकारला विचारायला हवा. हे खड्डेमय वास्तव भोगल्यानंतर जेव्हा नागरी रहिवाश्यांना ‘ वीस मिनिटात ठाणे-डोम्बिवली, दीड तासात पुणे, चार तासात बंगळूर आणि सहा तासात गोवा’ असले स्वप्नबोल ऐकू येतात, तेव्हा हसू येते. त्या हास्याला कारुण्याची झालर असतेच, आणि संतापाची एक आठीदेखील असते. ‘दिल को खुश रखने को, गालिब ये खयाल अच्छा है’ ही शायरी आठवत आपापली कष्टकरी शरीरे पुन्हा खड्ड्यात झोकून द्यायची, एवढेच जनतेच्या हाती असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT