संपावर सदू-दादू! (ब्रिटिश नंदी)  
संपादकीय

संपावर सदू-दादू! (ब्रिटिश नंदी)

ब्रिटिश नंदी

दादू : (घाईघाईने फोन फिरवत) हलोऽऽ...म्यांव म्यांव!
सदू : (कंटाळून फोन उचलत) इस रुट की सभी लाइनें व्यस्त है.   कृपया थोडी देर बाद फिरसे कोशिश किजीए...
दादू : (उतावीळपणाने) हलो, सद्या...मी बोलतोय, ‘म्यांव म्यांव!!
सदू : (थंडपणाने) ओळखलंय मी! पत्ता कुठाय तुझा? आम्ही पेपरात जाहिरातसुद्धा देऊन आलो!!
दादू : (संशयानं) कसली?
सदू : (खुलासा करत) दादू, असशील तसा परत ये! तुला कोणीही रागावणार नाही!!..अशी!! आहेस तरी कुठे?
दादू : (खवचटपणे) हं...मी कुठेही असेन! मी सर्वत्र आहे...मी बांदऱ्यात आहे, मी पुणतांब्यात आहे, मी नाशकात आहे, मंत्रालयात आहे, दादरमध्ये आहे नि मी लंडनमध्येही आहे!!
सदू : (साफ दुर्लक्ष करत)...आख्खा महाराष्ट्र शोधतोय तुला इथे!!
दादू : (आश्‍चर्यानं) मला? का बरं?
सदू : (निर्विकारपणे) शेतकऱ्यांची लढाई पेटलीये इथे! महाराष्ट्राचा पोशिंदा संपावर गेला, आणि तुम्ही लंडनमध्ये थंड हवा खायला सहकुटुंब सुटीवर गेलात, असं म्हणतायत लोक! शेतकरी मंडळी फार निकराला आली आहेत! तुला शोधतायत! परवा चक्‍क माझ्याकडेसुद्धा येऊन गेली...
दादू : (कबूल करत) तुझ्याकडे येऊन गेली? म्हंजे चांगलीच निकरावर आली असणार!!
सदू : (दुर्लक्ष करत) ते म्हणत होते, आम्हा शेतकऱ्यांना तुमच्यासारखं आक्रमक नेतृत्व हवं आहे!!
दादू : (कुतूहलानं) मग तू काय म्हणालास?
सदू : (एक पॉज घेत) मी म्हटलं, सकाळी अकरानंतर मी आक्रमक असतो! जमत असेल तर पुढचं बोलू! मग ते निमूटपणे गेले!! मुख्य म्हंजे मीच स्वत: सध्या संपावर आहे!!
दादू : (सुटकेचा निश्‍वास टाकत) तुझ्या आसपास कोणी आहे का?
सदू : (सुस्कारा टाकत) गेली बरीच वर्षं माझ्या आसपास कोणीही नाही, दादूराया...तूसुद्धा नाहीस!...
दादू : (आवाज बारीक करत) हे बघ, कुणाला सांगू नकोस...मी लंडनहून बोलतोय!
सदू : (थंडपणाने) तू लंडनला गेलास कशाला? आणि इतके दिवस? इथं महाराष्ट्र पेटलाय!!
दादू : (छद्‌मी हसत) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपाची सूत्रं हल्ली लंडनमधून हलतात, हे तुझ्या लक्षात आलेलं नाही वाटतं!!
सदू : (आश्‍चर्यानं) काय सांगतायस काय? तू लंडनमध्ये बसून शेतकरी संपाचं नेतृत्व करतोयस?
दादू : (विजयी मुद्रेनं) अर्थात!! परवा मला इंग्लंडमधल्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं! ते म्हणत होते, आमचाही सातबारा कोरा करून द्या साहेब!
सदू : (आश्‍चर्याने कोलमडत) ते तुला ‘साहेब’ म्हणाले?
दादू : (फुशारकीने) आपल्या देशात काय, साहेबाच्या देशात काय...साहेब हा नेहमी साहेब असतो! कळलं?
सदू : (संतापाने धुमसत) मग केला का त्यांचा सातबारा कोरा?
दादू : (खुलासा करत) ह्या लोकांचे सातबारा इंग्रजीत असतात! आधी तो मराठीत करा, मग बघू असं त्यांना सांगितलंय!
सदू : (समाधानाने) ते एक बरं केलंस! सगळा कारभार मराठीतच व्हायला हवा! बाय द वे, परत कधी येणार आहेस?
दादू : (अनवधानाने) माझा इन्फ्रारेड क्‍यामेरा बिघडला होता! तो दुरुस्तीला टाकलाय! त्या गोऱ्या कारागीरानं उशीर केलान!! त्यामुळे परतीचं लांबलंय! पण येईन लौकरच! का रे?
सदू : (बजावून सांगत) कर्जमुक्‍तीचं प्रेझेंटेशन करायला कधी येऊ असं ते फडणवीसनाना विचारणारेत तुला!
दादू : (विचारात पडत) हंऽऽ..त्यांचा मेसज आला होता तसा ‘व्हॉट्‌सॲप’वर! मी त्यांना अंगठा पाठवला!! ते जाऊ दे!! पण तिथं सगळं आलबेल आहे ना?
सदू : (महाराष्ट्राचं बुलेटिन देत) सगळं शांत आहे...शेतकरी पेटलेत! दुधाचे टॅंकर रस्त्यात वाहताहेत! टमाटे, भाज्या रस्त्यावर फेकल्या जाताहेत! एस्ट्या जाळल्या जाताहेत!! सगळं मज्जेत आहे!! संपबिंप मिटला की तू येशीलच परत!! असंच ना?
दादू : (फुशारकीने) मीसुद्धा लंडनमध्ये संपावरच गेलोय, हे लक्षात आलंय का कुणाच्या? जय महाराष्ट्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray यांची बोंबाबोंब म्हणजे 'चोर के दाढी में तीनका', नेमकं कुणी केली अशी टीका?

Bombay High Court : तेलगोटे कुटुंबीयांची फाशीची शिक्षा रद्द, वडील-मुलाला सुनावली जन्मठेप,आईची निर्दोष सुटका

Arjun Tendulkar च्या संघाचा विक्रम! Ranji Trophy च्या ९० वर्षांच्या इतिहासात कुणीच केला नव्हता असा पराक्रम

Ulhasnagar Assembly Election : आयलानी यांचा जीव भांड्यात! योगी आदित्यनाथ यांची मीरा भाईंदरच्या सभेतून कुमार आयलानी यांच्यासाठी हाक

Narendra Modi: बाळासाहेबांची 'ती' इच्छा, पूर्ण कशी झाली सांगताना नरेंद्र मोदींचं 'मविआ'वर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT