अस्वस्थ करणारी परिस्थिती ‘कोरोना’ मुळे निर्माण झालीय. वाढणारे रुग्ण, टीव्हीवरच्या बातम्या,दृश्ये मन विषण्ण करणारी आहेत. शाळा बंद, ऑनलाइन शाळा, परीक्षा, वर्क फ्रॉम होम ... एकूणच सामाजिक आणि वैयक्तिक जीवन विस्कळीत होऊन गेलंय. ही परिस्थिती कठीण खरी; पण त्याला खंबीरपणे आणि शांतपणे तोंड द्यायला हवं. तेच मुलांना शिकवायला हवं. त्यासाठी विज्ञानाने सुचविलेल्या सर्वं स्वच्छतेच्या आणि सामाजिक शिस्तीच्या सूचनांचं पालन तर करायलाच हवं; पण मन शांत ठेवणं आवश्यक आहे. मन स्वस्थ ठेवून, हिंमत न हरता संकटांवर मात करण्याची क्षमता (Adversity Quotient ) कशी विकसित करायची हे मुलांना शिकवण्याची हीच वेळ आहे. या काळात मानसिक स्वास्थ्य जपणं महत्त्वाचं आहे. मनाच्या स्वस्थतेचा आणि शरीर स्वस्थ असण्याचा खूप जवळचा संबंध आहे. याच काळात मुलांच्या मन:स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला हवं. कारण वाढत्या वयातील मुलांचे अस्वस्थतेच्या आजारांचे, नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
नवे नेपथ्य, नवी आव्हाने : राज आणि नीती
मुलं-मुली वाढत असताना नुसतंच त्यांचं शरीर वाढत नाही, त्यांचं मन फुलत असतं. त्यांचं व्यक्तिमत्त्व उमलत असतं. पौगंडावस्थेत त्याला पैलू पडत असतात. उत्साह वाहात असतो; तरीही मुलांना गोंधळात टाकणारे प्रश्न पडतात. आपण अचानक बदलू का लागलो, या चिंतेने मुले अस्वस्थ होतात आणि त्यांना प्रश्न पडतो, इतरांपेक्षा माझ्यात काहीतरी कमी आहे का? जगरहाटीत माझं स्थान काय आहे? प्रत्येक गोष्टीत पालकांचा दबाव का? आईबाबांच्याच कलानं, त्यांना आवडेल तेच मी का करायचे? स्त्री-पुरुष संबंध म्हणजे काय व इतरही लैंगिक प्रश्नांनी तो हादरून गेलेला असतो. याच काळात मुलांना सांभाळायला हवं. त्याचा काही कारणानं नुसताच मूड गेला आहे की, हा अस्वस्थतेचा किंवा नैराश्याचा आजार आहे, यातील फरक तज्ज्ञ व्यक्ती ओळखू शकते. बरं, पौगंडावस्थेतील मुले निराश किंवा दुःखी दिसतीलच असंही नसतं. त्यामुळे त्यांच्या नैराश्याच्या, आजाराच्या अवस्थेकडे दुर्लक्ष होऊ शकते. बऱ्याच जणांमध्ये आक्रमकता, चिडचिडेपणाही दिसू शकतो. ही मुलांची शिक्षणाची महत्त्वाची पायाभरणीची वर्षे असतात. याच काळात अभ्यासातली एकाग्रता कमी होण्याची भीती असते. पूर्वीच्या हुशार असणाऱ्या मुलाची गुणवत्ता घसरायला लागते. याचं पर्यवसान म्हणून चिडचिड वाढते. निरुपयोगी असल्याची भावना, उत्साहाचा अभाव वाढतो. ही लक्षणे किती काळ व किती तीव्रतेने जाणवत आहेत हे पालकांनी, शिक्षकांनी व मित्रमैत्रिणींनी जाणीवपूर्वक पहायला हवे. त्याच बरोबर पौगंडावस्था हा एक सर्वार्थाने स्थित्यंतराचा कालावधी असतो. त्यामुळे काहीवेळा ही लक्षणे नॉर्मल असू शकतात. ज्याला वाढीच्या वयातील वेदना म्हणतात. पण ती तशी आहेत की आजाराचा भाग आहेत हे तज्ज्ञच ठरवू शकतात.
जीवनाच्या छटा टिपणारे चित्रकार
ब-याचदा अतिउत्साही वागणं किंवा दुराग्रही वृत्ती ही आजाराची लक्षणे असू शकतात. या वयात अस्वस्थता किंवा नैराश्य वाढण्याचं मुख्य कारण मेंदूतील रासायनिक बदलात असतं. आनुवंशिकता, हार्मोनल चेंजेस, परीक्षेतील अपयश, आई-वडिलांमधील सततच्या भांडणांमुळे येणारा ताण, जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का या सर्वातून निर्माण होणारा ताण, चांगले गुण मिळूनही अभ्यासक्रमाला नाकारला गेलेला प्रवेश, नकारात्मक व्यक्तिमत्व, स्वप्रतिमा क्षीण असणे यापैकी काहीही या आजाराला या वयात निमंत्रण देणारं ठरतं. पौगंडावस्थेतील अस्वस्थता तसेच नैराश्य दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही. त्यामुळे जरा दुर्लक्ष केलं की सगळं काही आपोआप ठीक होईल, वयाचा दोष असेल वगैरे गैरसमजुतीत न रहाणे चांगले. ताबडतोब तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगले. सर्वप्रथम अतिशय विश्वासात घेऊन, प्रेमाने आपल्या पाल्याशी बोला. तुम्हाला त्याच्याविषयी काळजी, प्रेम वाटतंय हे त्याला जाणवू द्या. विश्वासाचं वातावरण तयार करा. आवश्यक वाटल्यास तत्काळ तज्ज्ञाची मदत घ्या. पाल्याच्या वर्तनातले बदल हे नैराश्याच्या आजारापोटी आहेत किंवा कसे हे तज्ज्ञाला ठरवू द्या. आवश्यक औषधोपचार, समुपदेशन, विशिष्ट मानसोपचारपद्धती आणि मुलाला पालक व शिक्षकांकडून मिळणारा भावनिक आधार महत्त्वाचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.