भारताचे ‘चुलत शेजारी’ Sakal
संपादकीय

संपादकीय : भारताचे ‘चुलत शेजारी’

भारताच्या वायव्येला हिन्दुकुश पर्वताच्या रांगा ओलांडल्या, की लागणाऱ्या विस्तीर्ण भूभागाला मध्य आशिया म्हणतात.

प्रा. अशोक मोडक

भारताच्या वायव्येला हिन्दुकुश पर्वताच्या रांगा ओलांडल्या, की लागणाऱ्या विस्तीर्ण भूभागाला मध्य आशिया म्हणतात. कझाखस्तान, किरगीजस्तान, तजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान हीच ती पाच राष्ट्रे. १९९१मध्ये ही पाचही राष्ट्रे सोव्हिएत संघ कोसळल्यामुळे स्वतंत्र-सार्वभौम झाली. गेल्या चार महिन्यांत भारताच्या पुढाकाराने या राष्ट्रांबरोबर कैकवेळा संवाद झाले आणि या राष्ट्रांनी अशा संवादांना अनुकूल प्रतिसाद दिला. खरं म्हणजे पाकिस्तान व चीन यांनी एकत्र येऊन भारतासाठी कटकटी निर्माण केल्या आहेत; मध्य आशियातल्या मुस्लिम राष्ट्रांनी मात्र भारतासाठी राहू-केतू ठरलेल्या पाक-चीनला प्रतिसाद न देता नवी दिल्लीच्या बाजूने कौल दिला. (Sakal Marathi Editorial Article)

वर्तमानकाळात भारत सरकारला मध्य आशियातल्या पाच देशांशी अधिक जवळीक साधण्याची इच्छा आहे व हे पाचही देश भारताच्या बाजूने कौल देत असल्याने तुम्ही आम्ही खूष आहोत. वास्तविक धर्म एक असल्याने मध्य आशियाने पाकिस्तानशी मैत्री केली आणि त्याचबरोबर आपल्या विकासासाठी चीनशी गोत्र जुळविले तर ते स्वाभाविक आहे. प्रत्यक्षात त्यांचा कल भारताशी जुळवून घेण्याकडे आहे. १९९१ मध्ये ही राष्ट्रे स्वतंत्र झाली, तेव्हाच पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्र्याने शेखी मिरवली होती की ‘आम्हाला शेजारी म्हणून लाभलेली ही नवजात राष्ट्रे आमच्या भारतविरोधी व्यूहरचनेची पाठराखण करतील’. पण तेव्हाही या राष्ट्रांनी मौन बाळगले होते.

नंतरच्या दशकात त्या देशांनी आपापल्या प्राचीन मुळांचा शोध सुरू केला. या शोधप्रक्रियेत पाचही राष्ट्रांनी सांगून टाकले की ‘आम्ही केवळ सोव्हिएत पूर्वकाळात नव्हे, तर इस्लामपूर्व काळात अवतीर्ण झालो.आमचे त्या प्राचीन कालखंडाशी आजही विशेष नाते आहे.'''' एका उझबेकी कवीचे मनोगत खालील ओळीत कसे प्रकटले आहे पाहा -

""Every Nation has its own desire, its own song, its own epic

it has its own place - its own garden

Preserved so far for thousands of years.``

‘हजारो वर्षांपूर्वीच्या भूतकाळाशी माझी नाळ जुळली आहे’ असा सार्थ दावा करणारे मध्य आशियाई राष्ट्र काल परवा धूमकेतूप्रमाणे उगवलेल्या पाकिस्तानशी मैत्री करील का भारताशी? उझबेकिस्तानचे पहिले अध्यक्ष इस्लाम करिमोव्ह यांनीच या प्रश्‍नाचे उत्तर देऊन ठेवले आहे. ‘आम्हाला म. गांधींनीच प्रेरणा दिली आहे. गांधीजींनी ब्रिटिश साम्राज्याला अहिंसक साधनांनी सुरूंग लावला, तर आम्ही नेमक्‍या याच साधनांनी सोव्हिएत संघ संपुष्टात आणला.’

२००१मध्ये अमेरिकेतल्या जुळ्या मनोऱ्यांवर हल्ला झाला व हल्लेखोरांनी अफगाण भूमीत आश्रय घेतला. परिणामतः त्यांना अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेने आपल्या फौजा काबूलला धाडल्या. तेथील संघर्षाच्या झळा मध्य आशियातल्या पाचही देशांना बसल्या. तेव्हा या राष्ट्रांमधल्या अभिजनांनी व बहुजनांनीही स्वतःची स्वतंत्र ओळख अधोरेखित केली. ‘आम्हीही मशिदीतून जातो, नमाज पढतो; पण आमचा इस्लाम तालिबानी तालावर नाचणारा आहे, असे समजू नका. आम्हाला इस्लामची पंचसूत्री मान्य आहे; पण या सूत्रांची आमची मीमांसा खास ‘मध्य आशियाई’ आहे. उदाहरणार्थ, `शाहादा’ म्हणजे निष्ठा शिरोधार्य आहे; पण इतरांच्या निष्ठाही आम्हाला गैर वाटत नाहीत. नमाज पढणे आवडते; पण त्याची सक्ती रुचत नाही.

जकात म्हणजे दानधर्म. तर रोझे म्हणजे उपासतापास. या सूत्रांमुळे काही गैर मुस्लिमांशी संघर्ष उद्‌भवत नाही आणि हाज याचा अर्थ केवळ मक्का मदिनेला जाणे असा न घेता देशांतर्गत तीर्थक्षेत्रांची यात्रा करणे यात कृतार्थता वाटते.’ महिलांवर हिजाबचे निर्बंध लादण्यास कझाखस्तान आदि पाचही देशांनी स्पष्ट विरोध केला आहे. तिथल्या लोकप्रिय इस्लामी उपपंथाने म्हणजे नक्षबन्दियाने तर "Journey in the Homeland` हा मंत्र लोकांच्या गळी उतरविला आहे. या पंथाचा एक मंत्र तर योगवासिष्ठातल्या एका पंक्तीची स्मृती जागविणारा आहे. ‘Solitude in The crowd’ हा तो मंत्र. ‘अन्तस्त्यागी, बहिःसंगी लोके विहर राघव’'' ही ती पंक्ती आहे. वसिष्ठ मुनींनी या पंक्तीतून राघवाला म्हणजे प्रभू रामचंद्राला उपदेश केला आहे - ‘बाह्य जगांशी संबंध ठेवताना अंतरंगी विरक्त रहा.’ भारताला खेटून राहणाऱ्या मध्य आशियाई मुस्लिमांनी भारतीय भावविश्‍वाशी जवळीक साधली तर नवल नाही.

भारतात सहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सूफी संमेलन झाले, त्यावेळी उपस्थित असलेल्या सीरिया देशाच्या ग्रॅन्ड मुफ्तीने जाहीर मुलाखतीत विस्मय व्यक्तविला - ‘आमच्या देशात कोण कोणत्या धर्माचा या कसोटीवर रोज मुडदे पडताहेत, भारतात तर खेड्यापाड्यातून डझनावारी पंथ उपपंथ आहेत आणि तरीही सगळेजण गुण्यागोविन्दाने नांदताहेत।’ भारतापासून कित्येक मैल सुदूर राहणाऱ्या सीरियन स्वामीला भारताविषयी कुतूहल वाटते... मध्य आशियातले सहस्रो - लाखो मुस्लिम नागरिक तर भारतभूमीची पायधूळ झाडून आपापल्या ‘स्तानी’ परतले आहेत. शतकानुशतके हे भाग आणि भारतात वाखाणण्याजोगा वस्तुविनिमय झाला आहे. परिणामतः खान अब्दुल गफार म्हणजे सरहद्द गांधी या सर्व भागात लाडके आहेत... आपण तर अफगाणिस्तानसकट इतर पाच ‘स्ताने’ म्हणजे आपले चुलत शेजारी देश आहेत (extended neighbour) आहेत, असे म्हणतोच की!

वर्तमानातली समस्या

आज अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याने माघार घेतली आहे आणि तालिबानी राजवटीने मूळ धरले आहे. मध्य आशियाच्या एका बाजूला तालिबानी तानाशाही आहे, तर दुसऱ्या बाजूला पाक व चीन यांचे गूळपीठ. मध्य आशियाई राष्ट्रांचे यामुळे सॅन्डविच झाले आहे. अशा कासावीस जिवांनी भारताशी नाते सुदृढ करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतालाही हे नातेसंबंध वाढविण्यात स्वारस्य आहेच; कारण भारताचा सामना आहे तो चिनी वर्चस्ववादाशी. दुर्दैवाने म्हणजे भारतीय नागरिक पाकिस्तानच्या व चीनच्या परवानगीविना मध्य आशियात प्रवेश करू शकत नाहीत. काही वर्षांपूर्वी इराणच्या मार्गाने मध्य आशियात प्रवेश करावा, अशी व्यूहरचना आपण आखली; पण अमेरिकेने इराणशी संबंध जुळविणाऱ्या देशावर निर्बंध लादले आहेत व चिनी चक्रव्यूहातून सहीसलामत सुटण्यासाठी आपण अमेरिकेशी दोस्ती केली आहे. म्हणजे या दोस्ताला न दुखावता इराणच्या मार्गाने मध्य आशियात पदार्पण करावे हे आव्हान आपल्यासमोर आहे. अर्थात अमेरिकेने इराणप्रमाणेच रशियालाही वैरी मानले आहे व रशिया देशाशी मैत्री करण्यास भारताला मज्जाव केला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे अमेरिकेने भारतासाठी अपवाद केला आहे व भारताने रशियाकडून संरक्षण-यंत्रणा खरीदण्यास `आमची हरकत नाही'' असा पवित्रा घेतला आहे. खुद्द अमेरिकेलाही हिंद-प्रशांत क्षेत्रातली व एकूण जगातली चीनची दांडगाई भीषण वाटते. वर्तमानातल्या समस्येवर यामुळे भारताला तोडगा काढता येईल ही खात्री वाटते. समजा, अमेरिकेने भारताला निर्बंधातून सूट दिली तर आपली मालवाहू जहाजे मुंबईतून चाबहार बंदरापर्यंत प्रवास करतील, तिथे उतरविला जाणारा माल इराणच्या दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत रवाना केला की अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि पुढे रशिया या देशांपर्यंत पोचता येईल.तात्पर्य, भारतीय नागरिक इराणमार्गे मध्य आशियाला जाईल. मध्य आशियातल्या पाचही देशांना दहशतवाद मान्य नाही. या देशांबरोबर भारताची देवाणघेवाण वाढली, भारताला या देशांच्या विकासप्रक्रियेत भरघोस सहाय्य करता आले तर चीनच्या वसाहतवादी धोरणावरही अंकुश ठेवता येईल. भारताच्या पूर्वेकडे फिलिपिन्स, व्हिएतनाम इ. देशांना भारताने मौलिक सहकार्य दिले आहे.

श्रीलंकेलाही मदत देऊन भारताने चांगले संबंध निर्माण केले आहेत. हिंदी महासागरात पाय सोडून बसलेल्या मालदीव, रीयुनियन आणि मॉरिशस यांच्याशीही भारताने मैत्रीसंबंध विकसित केले आहेत. पश्‍चिमेला संयुक्त अरब आमिराती, सौदी अरेबिया हे मुस्लिम देश भारताच्या मैत्रीपाशात आले आहेत. मध्य आशिया व भारत यांच्यातही आता उल्लेखिलेल्या स्नेहसंबंधांची वेल सहज बहरू शकते...

आंतरराष्ट्रीय राजकारणात देशाच्या प्रतिमेला अनोखे स्थान असते. चीन व पाकिस्तान यांच्याशी भारताची तुलना केली तर भारताची प्रतिमा शंभर टक्के उजवी आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारतवर्षाला केवळ द. आशियाचेच नव्हे, तर मध्य आशियाचेही प्रेम मिळावे... अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, जपान यांच्याकडून संरक्षण सहाय्य मिळावे आणि आपल्या जवानांनी निर्धाराने चीनची कारस्थाने उधळून लावावीत, हीच तर आपली इच्छा आहे. भारताच्या व्यूहरचनेत मध्य आशिया आगळीवेगळी भूमिका पार पाडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

SCROLL FOR NEXT